April, 2013

बीन टाउनच्या बातम्या
नमस्कार मंडळी,
बॉस्टन मॅरॅथॉनसंबंधी बऱ्याच बातम्या तुमच्यापर्यंत आल्या असतील. १५ एप्रिलला बॉस्टन मॅरॅथॉनमधे अनेक निरपराध, बेसावध नागरिकांना आणि बॉस्टनवर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांना दोन तरुणांनी अमानुषपणे बाँबस्फोट करून शारीरिक आणि मानसिक नुकसान पोहोचवले. त्यानंतरचा आठवडा सावरण्यात गेला म्हणायला हरकत नाही. स्वतःच्या, आणि जिवलगांच्या जिवाची भीतीही वाटली, यात काही नवल नाही. पण अडचणी आल्या तरी पाणी जसे मधे आलेल्या दगडांना हळूहळू कापत वाट काढत पुढे जाते तसे, आयुष्यही पुढे जात असते हे आम्ही ह्या घटनेनंतर पाहिले.
यात सावधपणाचे महत्त्वही पुन्हा नव्याने शिकायला मिळाले. अनेक ऋणानुबंधांचे, प्रेमाचे धागे दृढ झाले, अशा दृष्टीने पाहिले तर हे या वाईटातून निघालेले चांगले म्हणायला हवे. ऱ्होड आयलंड येथे होणाऱ्या आपल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.) अधिवेशनात सुरक्षिततेचा विचार करावा, अशा प्रकारच्या सूचना आमच्याकडे आल्या आहेत. त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की, बॉस्टन मॅरॅथॉनच्या पार्श्वभूमीवर आम्ही अधिवेशन काळामधे ऱ्होड आयलंड येथील पोलिस आणि इतर सेवांचे अधिक सहकार्य मिळवत आहोत. या पार्श्वभूमीवर ऱ्होड आयलंडमधील सर्व सुरक्षायंत्रणा अधिवेशनासंबंधी जागरूक असतील. दिवसा, तसेच रात्री अधिक सुरक्षा व्यवस्था असेल. तुम्हा सर्वांना अधिवेशनास येताना निर्धोकपणे, मोकळेपणे येता येईल अशी काळजी आयोजक घेत आहेत. तेव्हा, जर कदाचित मनावर मळभ आले असले तर ते ह्या दिलाशाने लवकरच दूर सरेल, आणि ह्या कार्यक्रमासाठी दिवसरात्र राबत असलेल्या लोकांच्या श्रमांचे चीज होईल अशी आशा बाळगत कार्यक्रमाची अधिक माहिती देते. पण त्याआधी एक मुख्य सूचना! मे २५ रोजी अधिवेशनाच्या नांवनोंदणीचे (रजिस्ट्रेशन) शुल्क किंचित वाढणार आहे. तेव्हा, त्याआधी सध्याच्या शुल्काचा फायदा घ्या, आणि कार्यक्रमासाठी नोंदणी करा अशी आग्रहाची विनंती करते आहे. या अधिवेशन शुल्कात उत्तम भोजनव्यवस्थेचीही सोय आहे. तुमच्यापैकी अनेकजण आजवर झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कुठच्या ना कुठच्या तरी अधिवेशनाला आले असतीलच. पण आजवर कधीच अधिवेशनाला आला नसलात तर मात्र एकदा तरी तुम्ही या अधिवेशनाला येऊन पहा. तुम्हाला हा अनुभव न, आवडेल, असे मात्र माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. आता थोडेसे कार्यक्रमाविषयी.
बॉस्टनजवळ चेम्सफर्ड येथे १२ एप्रिल रोजी बृ. म. मंडळाचा सारेगम २०१३ चा कार्यक्रम सुंदर झाला. या स्पर्धेची अंतिम फेरी बृ. म. मं. अधिवेशन २०१३ च्या मुख्य (प्राईमटाईम) कार्यक्रमात होईल. अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांची नांवे आहेतः प्रतिभा दामले (रिचमंड), समिधा जोगळेकर (टोरांटो), रवी दातार (टोरांटो), प्रसन्न गणपुले (सिअ‍ॅटल), श्रेयस बेडेकर (डॅलस), अक्षय अणावकर (न्यू यॉर्क). जुलैमधे बृ. म. मं. अधिवेशनात अंतिम फेरीत या स्पर्धकांचा एकमेकांशी सुरेल सामना होणार आहे. तेव्हा सारेगम स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्यामधील गायनप्रेमींनी यायलाच हवे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना उपांत्य फेरीपर्यंत पोचलेल्या गुणी स्पर्धकांची नांवे घ्यायलाच हवीत. हे कलाकार होते: अमित देशपांडे, अमोल केळकर, अनुजा पंडितराव, अनुपमा चंद्रात्रेय, भावी शाह, दिव्या खांडेकर, जयंती आठवले, ओंकार देशपांडे, व रुपाली मेंहेंदळे. या स्पर्धेतील अंतिम फेरीत पोचलेल्या स्पर्धकांपैकी आपल्या आवडत्या, माहितीच्या स्पर्धकांना तुम्हाला आपले मत देऊन प्रोत्साहन देता येईल. ऑनलाईन मतदानाचे काही नियम आहेत ते अधिवेशनाच्या संकेतस्थळावर जरूर बघा.
बृ. म. मं. अधिवेशनामधे सर्व वयोगटांसाठी कार्यक्रम आहेत. त्यातही ३- १४ वर्षातील मुलांसाठी वयानुसार करमणुकीचे आणि खेळाचे काही कार्यक्रम असतील. आईबाबांना आनंदाने आणि काळज्या बाजूला ठेवून कार्यक्रम बघायचा असला तर त्यांच्या छोट्यांची देखील व्यवस्था चांगलीच व्हायला हवी असा आमचा प्रयत्न आहे. कार्यक्रमांबद्दल अधिक माहिती:
http://bmm२०१३.org/culturalprograms/cultural-grid.html.
अजय-अतुल ह्यांच्या कार्यक्रमाबद्दल आम्ही आपल्याला सांगितलेच आहे. जगभरातल्या रसिकांसाठी संजीवनी न्यूट्रास्यूटीकल अँड हेल्थ प्रॉडक्टस लिमिटेड आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांनी हा वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम प्रायोजित केला आहे. अजय आणि अतुल ह्यांना "जोगवा" ह्या चित्रपटासाठी (आणि मराठी चित्रपटांसाठी प्रथमच) सर्वोत्कृष्ट संगीत-दिग्दर्शनाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे. गाण्यासाठी गाजलेल्या सिंघम आणि अग्निपथ हिंदी चित्रपटांमधील गीतांना अजय-अतुलने संगीत दिलं आहे. त्यांच्यासह मृणाल कुलकर्णी, हृषिकेश रानडे, सावनी रविंद्र हे मराठी कलासृष्टीतले प्रसिद्ध कलावंत येत आहेत.
तुमच्यामधील डॉक्टरांसाठी खास आकर्षण असेल ते म्हणजे ऑकक२०१३ ॠealthcare conference. ही कॉन्फरन्स जुलै ५-७ काळात, सकाळी ७.३०- ९ दरम्यान मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होण्या आधी असेल. यात दुहेरी (आणि समांतर) कार्यक्रम असेल; तो म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसाठी कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशनची क्रेडिट मिळू शकतील असा (इकउ) आणि सर्वांसाठी खुला (non-इकउ) असा दुसरा कार्यक्रम. या कार्यक्रमात अतिशय उच्चपदांवर कार्यरत असलेले अनेक डॉक्टर आणि तज्ञ बोलणार आहेत.
आपल्यामधील तरुण पिढीलाही अधिवेशनात सहभागी व्हावे असे वाटावे यासाठी, खास त्यांच्यासाठी स्नेहबंधन, स्पीड-डेटिंग, आणि यूथ -कमिटीचे काही सकाळचे तसेच संध्याकाळचे अजून कार्यक्रम असतील. या तरुणांचा फेसबुक ग्रुपचा पत्ता आहे- https://www.facebook.com/groups/131610363648144/
तुमच्या जवळच्या तरुण मराठी मुलामुलींना या ग्रूपचे सदस्य होण्यास जरूर सांगा. अधिक माहिती: http://bmm2013.org/culturalprograms/youth
तुमच्या कॉलेजजीवनातील आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा द्यायचा असल्यास, कॉलेजचे क- आयोजित करू शकता. त्यासाठी तुमच्या मित्रपरिवाराला ऱ्होड आयलंडला येण्याचे आमच्यातर्फे निमंत्रण देऊन येण्याचं न, करा असं सुचवते.
अधिवेशनास केवळ दोन महिने राहिले आहेत, आणि त्यामुळे सर्व समितींचे काम अक्षरशः रात्रीचा दिवस करून चाललेले आहे. मराठीजनांचे आपापसातले ऋणानुबंध अधिक दृढ व्हावे, त्यातून उद्यमाचे, विकासाचे आणि प्रेमाचे संबंध तयार होण्यास मदत व्हावी अशी आयोजकांची भावना आणि प्रयत्न आहे. या सर्वाचे सार्थक व्हावे यासाठी तुम्हा सर्वांचा भरघोस प्रतिसाद अधिवेशनास मिळावा अशी इच्छा आहे.
धन्यवाद.
- चित्रा देशपांडे (बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स्)