April 2013

बीन टाउनच्या बातम्या

अधिवेशनास १०० हून कमी दिवस उरले आहेत. सर्वच कार्यक्रम आता ठरले असले तरी त्यांचे वेळेप्रमाणे आयोजन करणे, त्याचा व्यवस्थेशी - जेवणाखाण्याशी मेळ बसवणे, कलाकारांचे आणि उपस्थित रसिकांचे स्वागत, लहान मुलांची सोय, रजिस्ट्रेशनची व्यवस्था, अडी-अडचणी अथवा "हरवले ते गवसले का" ची मदत कशी करायची, अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. त्यांचा आधिवेशन योजनेच्या विविध विषयांवर अथक काम करणार्‍या १८ समित्यांनी आजवर विचार केला असला तरी, संमेलनाच्या या विविध अंगांचे एकत्रीकरण करण्यास आता वेग आला आहे. समिती प्रमुखांच्या प्रत्यक्ष भेटी, कॉन्फरन्स कॉल्स, समित्यांच्या अंतर्गत भेटी, सर्व काही आता युद्धपातळीवर चालू झाले आहे. मराठी मनाला भुरळ घालणार्‍या वाद्ये, संगीत आणि खास तालबद्ध जोरकस नृत्यांनी, खास मराठमोळ्या जेवणाने तुमचे स्वागत करण्याची तयारी होते आहे.

हे असे संमेलन म्हणजे अनेक हातांनी, मनांनी आणि आवडी-निवडींनी साध्य होणारा प्रकल्प आहे. यात घर-संसार सांभाळत काम करणे आवश्यक असते, ते करत असताना, कधी कौतुक होत असते तर कधी कसले कुठच्यातरी लष्कराच्या भाकर्‍या भाजताहेत, असे कधीतरी मागून ऐकू येणारे उद्गार ऐकू येत असतात, पण तरी देखील स्वतःपलिकडे काहीतरी करण्याचे वेड असलेल्या अनेकांमुळे आणि स्वान्तसुखाय वृत्तीमुळे हे अधिवेशन आजवर घडत आले, वाढत गेले, आणि असेच यापुढेही मोठे होत रहाणार आहे... त्यासाठी आज देखील अनेक कुटुंबे वेगवेगळ्या समित्यांमधे समरसतेने काम करत आहेत. आमचा एक मित्र परवा गंमतीत म्हणाला, की ते दोघे पतीपत्नी अधिवेशनाच्या कामात इतके व्यस्त झाले आहेत की, साधा वाद घालायला सुद्धा वेळ मिळत नाही! त्यातला गंमतीचा भाग जरा लांब ठेवला तरी एक नक्की सांगावेसे वाटते, की असे उत्साही सदस्य अशा कामात सहकुटुंब समरस होऊ शकण्यामागे, नुसते पती-पत्नींनी एकमेकांना समजून घेणे, इतकेच कारण नसते, तर सर्वांची मुले-बाळेही तेवढाच पाठिंबा देतात म्हणून शक्य आहे. थोडक्यात असे सामाजि़क कार्य हे एका कुटुंबापासून ते अनेक कुटुंबाने बनलेल्या सामुदायिक कुटुंबाने घडत असते.

जरी हा कार्यक्रम दर दोन वर्षांनी एखाद्या विशिष्ट भागातला मराठी समुदाय जोमाने करत असला, या वर्षी हा कार्यक्रम बॉस्टनवासी मराठी जन घडवून आणत असले, तरी तो सर्व जगभरातील आपण सर्व मराठी माणसांसाठी असतो आणि त्यांच्या उत्साही सहभागानेच या सर्व श्रमांचे सार्थक होते. म्हणूनच जसे आपल्या लग्न कार्यात म्हणतात, तसेच म्हणावेसे वाटते की "कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच, पण तरी त्या कार्याचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही सर्व रसिकांनी सहकुटुंब सहपरिवार आणि आपल्या मित्रपरिवारासह अवश्य यावे हा मनापासून आग्रह!"

गेल्या महिन्यात रसिकांसाठी काय काय कार्यक्रम आणले गेले आहेत याची बर्‍याच अंशी कल्पना दिली आहेच, तरीही काही खास कार्यक्रमांबद्दल माहिती देत आहे.
प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचा संगीत आणि मुलाखतीवर आधारित कार्यक्रमः संगीताचे कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना, मराठमोळ्या अजय-अतुल यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपले नाव केले आहे. जाहिरात सृष्टीत सुरवात केलेल्या अजय-अतुल जोडगोळीचे नाव एक गाव, अग बाई अरेच्चा, जत्रा, जबरदस्त, विरुद्ध, शॉक, उलाढाल, जोगवा आणि नटरंग अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटसंगीतामुळे रसिकांच्या हृदयाला भिडले. हिंदी चित्रसृष्टीतील सिंघम आणि अग्नीपथ या चित्रपटांचे संगीत देखील असेच गाजले होते. "जोगवा" या मराठी चित्रपटसंगितासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपट संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले हे पहिलेच संगीतकार आहेत! कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी मृणाल कुलकर्णी तर ऋषिकेश रानडे आणि सावनी रविन्द्र हे गायक-गायिका देखील सोबत येत आहेत. कार्यक्रमाबद्दल आणि या संगीतकार जोडगोळीबद्दल अधिक माहिती मिळेलः http://bmm2013.org/ajay-atul.html येथे.

संगीत मानापमान: प्रेम सेवा शरण, मला मदन भासे हा, नाहीं मी बोलत आता, या नव नवल नयनोत्सवा, शुरा मी वंदीले, अशी एकापेक्षा सरस आणि पिढ्यामागून पिढ्यांमध्ये लक्षात ठेवलेली नाट्यगीते असलेल्या संगीत मानापमानाचे महाराष्ट्रातील मराठी रसिकांनी उत्साहाने स्वागत केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगितात सुप्रसिद्ध झालेले राहूल देशपांडे हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि बाल गंधर्वांच्या स्मृती जागॄत करत हे नाटक घेऊन येत आहे त.

नॉर्थ अमेरिकेतील कार्यक्रमः नॉर्थ अमेरिकेतील आपली सर्वांची विविध मंडळे वेगवेगळे कार्यक्रम सादर करतील. त्या सर्वांची माहिती एकत्र आम्ही पुढील वार्तेमध्ये देऊच. पण येथे काही कार्यक्रमांची झलक देण्याचा प्रयत्न करत आहे.
"उभ्या उभ्या विनोद” - मराठी विश्व न्यू जर्सी सादर करणार आहे त्यांचा स्टँड अप कॉमेडी अर्थात "उभ्या उभ्या विनोद" हा लोकप्रिय कार्यक्रम.

“स्वरगंगेच्या काठावरती” : डॉ. मीना नेरूरकर या ब्रॉडवे आणि 'मामा मिया' यावरून प्रेरणा घेऊन सादर करणार आहेत एक मराठमोळे म्युझिकल. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित हा कार्यक्रम आगळावेगळा असणार आहे, यात शंका नाही.

" ढोलकीच्या तालावर" : लॉस एंजेलिसचे मराठी मंडळ नव्या-जुन्या मराठी लावणी गीतांवर आधारित असा हा खास कार्यक्रम सादर करणार आहे.

"संगीत वस्त्रहरण" - शिकागोचे मराठी मंडळ पेश करत आहे मराठी-मालवणी फार्सची एक खुमासदार झलक!

"सेल्फ हिप्नॉसिस" - स्ट्रेस मॅनेजमेंट अर्थात आयुष्यामधील ताण तणावांवर मात करण्यासाठी उपयुक्त असलेले एक तंत्र शिकवतील बॉस्टनचे श्री. संजय सहस्रबुद्धे.

सा रे ग मा २०१३: बी एम एम अधिवेशन हे जरी ५-७ जुलै ला असले, तरी त्यातील एक कार्यक्रमाची सुरूवात गेल्या वर्षीच झाली. आणि तो म्हणजे सा रे ग मा २०१३. अमेरिकेतील विविध भागांमधील १३ मंडळांकडून या गायन स्पर्धेस भरघोस प्रतिसाद मिळाला. अमेरीकेत आलेली मराठी व्यक्ती केवळ डॉक्टर, इंजिनिअर, आयटी अथवा इतर नुसतेच व्यावसायिक काम करणारी नसते तर, तर त्यांच्या रक्तातच काव्य-शास्त्र-विनोदाची आवड असते हे सिद्ध झाले आहेच. १३ ठिकाणी प्राथमिक फेरी झाल्यावर आता गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर १३ एप्रिलला बॉस्टनमधे या सर्व गाननिष्ठांची मांदियाळीच उपांत्य फेरीसाठी जमते आहे. दिवसभर चालू रहाणार्‍या कार्यक्रमातून सहा स्पर्धक निवडले जाणार आहेत ज्यांच्यातील अंतिम स्पर्धा ही अधिवेशनात होणार आहे. तुमच्या भागातल्या मंडळांतून येणार्‍या उपांत्य फेरीतील स्पर्धकांना शुभेच्छा देण्यास विसरू नका आणि जर काही कारणाने आपण बॉस्टनवासी नसूनही बॉस्टन मधे १३ एप्रिलला असलात तर या कार्यक्रमास अवश्य या अशी आग्रहाची विनंती.

नॉर्थ अमेरिकेतील कार्यक्रमांची अधिक माहिती करून घेण्यासाठी हा दुवा जरूर पहा. http://bmm2013.org/culturalprograms/north-america-programming.html

कृपया अधिक वाट न बघता जुलैमध्ये अधिवेशनासाठी येण्याचे आजच नक्की करा. आणि आपण येत आहात, हे आम्हाला http://bmm2013.org/registration-welcome.html या पानावरून लवकरात लवकर कळवा, ही विनंती!
तर मंडळी, तुम्हाला होळीच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! बीएमएम अधिवेशनात आपली उपस्थिती असेल असे गृहित धरते.
धन्यवाद.
चित्रा देशपांडे, बॉस्टन , मॅसॅच्युसेट्‌स्‌)