July, 2013

मंडळी नमस्कार,
ते योजले, ते पाहिले आणि त्याने सर्वांना जिंकले. प्रॉव्हिडन्स (ऱ्होड आयलंड)मधे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन दिमाखात पार पडले, आणि अधिवेशनाची अनुभूती घेतलेल्या प्रत्येकाच्या मनात असाच काहीसा भाव होता. साहित्य, कला, शिक्षण, संस्कृतीच्या अंगणात साडे तीन दिवस आकंठ बुडालेल्या रसिकांची न्यू इंग्लंड मराठी मंडळाच्या स्वयंसेवकांनी उत्तम बडदास्त ठेवली. बाळ महाले यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली काम केलेल्या माझ्या सर्व २००हून अधिक सहकाऱ्यांचे मी जाहीररित्या अभिनंदन करतो. झाले बहु होतील बहु परंतु या सम न हा ही उक्ती बृ. म. मंडळाच्या १६व्या अधिवेशनाला तंतोतंत लागू पडते. १० देशातून आलेल्या रसिकांना उत्तमोत्तम कार्यक्रम, सुग्रास भोजन आणि विनयशील आदरातिथ्य यांचा संगम पहावयास मिळाला. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सढळ हाताने मदत केलेल्या देणगीदारांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. २०१५च्या अधिवेशनासाठी शैलेश शेट्ये आणि त्यांच्या सहकार्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.
२०११ च्या शिकागो अधिवेशनात आमच्या कार्यकारिणीने सूत्रे हाती घेतली. गेल्या २ वर्षात एकजुटीने आणि सलोख्याने काम करत तुम्हा सर्वांशी समन्वय राखला. लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमधे होणाऱ्या changing of the guards सोहोळ्याप्रमाणे आता वेळ आलीयं ती तुम्हा सर्वांना अल्‌विदा म्हणण्याची, आणि नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा देण्याची! यंदाच्या अधिवेशनात निवडून आलेले बृ. म. मं. कार्यकारिणीवरील पदाधिकारी आहेत: सुनील सूर्यवंशी - अध्यक्ष, नमिता दांडेकर - सचिव, मोहित चिटणीस - कोषाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य: नितीन जोशी, अमोल फुलांबरकर, अंजली अंतुरकर, अनुपा देवगांवकर, सोना भिडे.
सल्लागार समितीचे सदस्य - गिरीश ठकार, आशिष चौघुले.
जो स्नेह आणि विश्वास तुम्ही आमच्या कार्यकारिणीवर दाखवलात तसेच प्रेम तुम्ही नवीन कार्यकारिणीला द्याल याची मला खात्री आहे.
कळावे, लोभ असावा आणि असलेला लोभ वृद्धींगत व्हावा असे म्हणून मी माझे तुमच्याबरोबरचे संभाषण इथेच थांबवतो.
वागीश्वर ज्ञानेश्वर ईश्वराला उद्देशून म्हणतात जे विचार माझ्या मनात आले त्यांना मी तुझ्यासमोर वाट करून दिली.
तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ।
करून घेयावे हे तुमते । विनवितसे ।
- आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ)