June, 2013

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३च्या बीनटाउनच्या बातम्या या सदरात लिहिताना दोन वर्षे कशी निघून गेली हे कळलेच नाही. अधिवेशन आता अगदी जवळ म्हणजे एक महिन्यावर येऊन ठेपले आहे. मी पूर्वी म्हटले होते तशी न्यू इंग्लंडमधील कार्यकर्त्यांची लगीनघाई सुरू झाली आहे. आपले ऱ्होड आयलंड येथील कार्यकर्ते कार्यक्रमाची स्मरणिका तयार करत आहेत. कळवायला आनंद वाटतो की अधिवेशनापूर्वीच्या या शेवटच्या आठवड्यांमध्ये अधिवेशनाच्या जागा अतिशय जोमाने भरल्या जात आहेत!

तुम्ही जर अजूनही अधिवेशनाला येण्याबद्दल "येऊ का नको" अशा द्विधा मनस्थितीत असलात तर, मित्रमंडळींना भेटायला, सुग्रास भोजनासाठी, करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी, खरेदीसाठी, शाळाकॉलेजांच्या प्रवेशांबद्दल माहितीसाठी आणि हवे असल्यास अगदी वर किंवा वधू संशोधनासाठी देखील येण्याचा विचार करा.

तुमच्यापैकी ज्यांना चार दिवस राहता येणे शक्य नाही, पण अधिवेशनाच्या काही दिवसांसाठी हजेरी लावण्याची इच्छा मात्र आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आपण काही आकर्षक दैनिक तिकिटांचा (day pass) लाभ घेऊ शकता. त्याबद्दल अधिक माहिती पुढील प्रमाणे:

Day-Pass Option
दिवसाचा पास
(Event Date)
Rate for Adults
प्रौढ व्यक्ती
Rate for Youth
तरुण (१३-१७)
Rate for Kids
मुले (वय वर्षे ३-१२ पर्यंत )
July 5 (५ जुलै)
एक दिवसाचा पास
$139 $125 $100
July 6 (६ जुलै) एक दिवसाचा पास $159 $125 $100
July 6 + July 7 (६ व ७ जुलै) दोन दिवसांचा पास $195 $155 $135
July 5+6+7 (५, ६ व ७ जुलै) सर्व अधिवेशनाचा पास $300 $225 $160

*All sales are final.

जुलै ५ ची खास आकर्षणे: मराठी नाटक फॅमिली ड्रामा; मराठी नाटक चाहूल - कला, बे एरिया; स्वरगंगेच्या काठावरती - फिलाडेल्फिया (मीना नेरुरकर); कवितांवर आधारित कार्यक्रम एक मी अन् एक ता’ - किशोर कदम (सौमित्र), वैभव जोशी आणि दत्तप्रसाद रानडे; बीएमएम सारेगम २०१३, न्याहारी+ दोन वेळचे जेवण

जुलै ६ ची खास आकर्षणे: संगीत मानापमान - राहुल देशपांडे आणि इतर; मेलांज - महेश काळे; खेळ मांडला - प्रतीक आणि माधवी देवस्थळे (न्यू जर्सी); स्वरगंध - नरेंद्र दातार (टोरांटो); विशेष कार्यक्रम: अजय-अतुल मुलाखत, न्याहारी+ दोन वेळचे जेवण

जुलै ७ ची खास आकर्षणे: विक्रमवीर प्रशांत दामले यांची मुलाखत - दिग्दर्शक विजय केंकरे; युवांकुर - मराठी नाट्य/चित्र/टी.व्ही.सृष्टीतले अनेक उगवते तारे, न्याहारी+ एक वेळचे जेवण

अधिवेशनाच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक/सर्वासाधारण योजना पुढील प्रमाणे :
Programming Grid

तर, मंडळी, अशी अपेक्षा करते की आपली आपल्या कुटुंबीयांसह अधिवेशनात प्रत्यक्षच भेट होईल!

परत अधिवेशनानंतर बातमीदार म्हणून भेट होईल न होईल. असे म्हणावेसे वाटते की गेली दोन वर्षे हे सदर वाचणाऱ्या तुम्हा सर्व वाचकांची तसेच प्रतिक्रिया कळवणाऱ्या सर्वांचीही मनापासून आभारी आहे. तसेच हे सदर लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या अधिवेशनाच्या अधिकारी वर्गाचे, आणि सदराचे संपादन करणाऱ्या सर्वजणांचे मनापासून आभार.
सर्वात शेवटी, आणि महत्त्वाचे म्हणजे या पत्रकावरून मला दर महिन्याच्या पंचवीस तारखेची न चुकता डेडलाईन देणाऱ्या, मग मी त्या तितक्याच न चुकता ओलांडल्यावर माझा नेटक्या आणि सौम्य भाषेत पाठपुरावा करणाऱ्या, आणि त्यानंतरचे संपादन करणाऱ्या विनता कुलकर्णी यांचेही मनःपूर्वक आभार. या सर्वांच्या मदतीशिवाय हे सदर शक्य झाले नसते याची मला जाणीव आहे.
तसेच हे एक सांघिक कार्य असल्याने त्यामागील व्यक्तींची/ माझ्या सहकाऱ्यांची नावे आमच्या निर्णयानुसार मला या सदरामधे देता आली नाहीत, पण न्यू-इंग्लंड भागातील झटून काम करणाऱ्या आमच्या अनेक मराठी आणि अमराठी सहकाऱ्यांमुळे, आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यांना असणाऱ्या प्रेमळ आश्वासक पाठिंब्यामुळेच या अधिवेशनाचा डोलारा उभा राहू शकत आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. या सर्वांच्या अथक मेहनतीचे सार्थक होण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तेव्हा तुम्ही "अगत्य येण्याचे करा."
धन्यवाद.
- चित्रा देशपांडे (बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स्)