March, 2013

बीन टाउनच्या बातम्या

नमस्कार मंडळी,

गेली जवळजवळ दोन वर्षे बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या सोळाव्या अधिवेशनाच्या तयारीची वार्ता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

हेतू हाच की अधिवेशनात ज्या विविध समिती, जे अधिकारी, आणि कार्यकर्ते आहेत जे गेली दोन वर्षे आपापली कामे वेळप्रसंगी मागे ठेवून, दिवसरात्र फोन, प्रत्यक्ष भेटी, चर्चा यातून मंथन करून एक सुंदर कार्यक्रम समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या त्या अथक परिश्रमांबद्दल, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी. आता खरोखरच फक्त चार महिन्यांवर अधिवेशन आले आहे. सारेगमच्या उपान्त्य फेरीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या फेरीमध्ये अमेरिकेतील ४२ गुणी कलाकारांची निवड झाली आहे. उपान्त्य फेरी बॉस्टन येथे पाडव्याच्या सणाबरोबर होणार आहे. सर्वांच्या प्रयत्नाने कार्यक्रमाची रूपरेषा तयार झाली आहे. मराठी मातीतील आणि जगभरातील यशस्वी आणि गुणी कलाकार, आणि विविध क्षेत्रे गाजवलेल्या मान्यवर मराठी व्यक्ती अधिवेशनाला येत आहेत हे खाली दिलेल्या कार्यक्रमावरून स्पष्ट होईलच. अनेकांनी आपापल्या जागा, हॉटेले बुक केली आहेत. रजिस्ट्रेशनची अर्धशतकाकडे जोमात घोडदौड सुरू आहे. एक्स्पोमधील ५०% बूथ आधीच बुक झाल्या आहेत. तेव्हा अधिवेशन यशस्वी होणार यात खरेच शंका नाही. पण खर्‍या अर्थाने अधिवेशन सुफळ संपूर्ण झाले असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तुमच्यासारखे मराठी भाषेचे, संस्कृतीचे समर्थक आपल्या वेळात वेळ काढून अधिवेशनाला आग्रहाने, प्रेमाने आणि आपल्या सर्वांमधील अदृष्य बंध जाणून हजेरी लावतील. तेव्हा अजूनही तुमच्यापैकी जाऊ का नको अशा कुंपणावर बसलेल्या काही जणांना आग्रहाची विनंती की कार्यक्रम खूप आकर्षक आहे, आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमातील आनंद वृद्धिंगत होणार आहे, तेव्हा जरूर अधिवेशनाला या.

अधिवेशनाबद्दल अधिक माहितीसाठी http://bmm2013.org/ येथे जाता येईल.
रजिस्ट्रेशन साठी थेट दुवा -http://bmm2013.org/registration/convention-regn.html
जेवणखाण/पानसुपारी http://bmm2013.org/registration/culinary-delights.html
मुलाबाळांची व्यवस्था http://bmm2013.org/culturalprograms/kids.html

कार्यक्रमाची काही आकर्षणे -

'हास्यमस्ती' - ' लोकांना हसवणे हे माझे स्वप्न आहे. मला त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद बघायचा आहे' असे म्हणणारे, आपल्या अभिनयाने आणि फिरत्या गात्या गोड गळ्याने मराठी रंगभूमी ज्यांनी गाजवली असे आणि चित्रपट रसिकांना गेली कित्येक वर्षे भुरळ घालणारे, १०.७०० रंगमंच प्रयोग करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये ज्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला असे रसिकमान्य कलाकार प्रशांत दामले यांची वेगळी ओळख करून देण्याची खरेतर गरज नाहीच. त्यांना न ओळखणारा मराठी प्रेक्षक/रसिक बहुदा नावालाही नसावा. महाराष्ट्र सरकार, नाट्यदर्पण, नाट्यपरिषद यांची विविध पारितोषिके ज्यांना प्राप्त झाली, आणि रसिकांकडून मान आणि प्रेमही मिळवले, आणि टिकवले, असे प्रशांत दामले रंगभूमीवरचे (आणि मागचे), आणि सिनेमातील आणि दूरदर्शनवरील त्यांचे अनुभव रसिकांना सांगतील. प्रशांत दामले यांच्याबरोबर "हास्यमस्ती" करायला प्रॉविडन्सला यावेच लागेल!

'युवांकुर' - दूरदर्शन आणि चित्रपट (सिनेमा) यातील आघाडीच्या गुणी कलाकारांनी सादर केलेला गाणी, नृत्ये आणि हास्यविनोद यांचा आकर्षक मेळ असलेला कार्यक्रम. 'नटरंग' मधील नृत्याने प्रकाशात आलेली गुणी अभिनेत्री आणि नृत्य कलाकार सोनाली कुलकर्णी, 'मी शिवाजीराजे बोलतोय' मधील प्रिया बापट, "आयडियाची कल्पना' मधील भाग्यश्री चिरमुले, 'अजब लग्नाची गजब गोष्ट' मधील उमेश कामत, 'फक्त लढ म्हणा' मधील अनिकेत विश्वासराव अशा उमेदीच्या तरूण कलाकारांनी सादर केलेला हा मनोरंजनाचा आकर्षक कार्यक्रम अधिवेशनाचे एक मुख्य आकर्षण असेल. फू बाए फू मधील वैभव मांगले आणि अतिशा नाईक ही विनोदी जोडगोळी याही आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात धमाल उडवून देणार आहे यात शंका नाही! 'रेडिओ मिर्ची', 'झी टीवी सुपरस्टार' मुळे प्रसिद्ध, तसेच चित्रपट अभिनेता अभिजीत खांडकेकर या कार्यक्रमाचे संचालन करणार आहे.

'फॅमिली ड्रामा' - विजय केंकरे दिग्दर्शित, अद्वैत दादरकर लिखित हे घरातील सर्वांनी एकत्र बसून बघण्यासारखे निखळ करमणूक करणारे विनोदी नाटक अधिवेशनात येते आहे. सुकन्या (कुलकर्णी)
मोने, अद्वैत दादरकर, अजित भुरे, भक्ती देसाई आणि नितील कुलकर्णी अशा रसिकमान्य कलाकारांनी सादर केलेली ही एका कुटुंबाची हलकीफुलकी कथा रसिकांना नक्कीच आवडेल, यात शंका नाही.

'Melange' - फ्रेंच मूळ असलेला हा शब्द परस्परपूरक किंवा विरोधी अशा अनेकविध घटकांना एकत्र आणतो. हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम आपल्या नावाला जागत विविध भारतीय संगीत परंपरांचा मेळ घालणार आहे. खयाल, तराणा, ठुमरी, बंदिश, गजल, सूफी, आणि भजन अशा विविध संगिताची बहार या कार्यक्रमात अनेक गुणी कलाकारांकडून तुम्हाला ऐकायला मिळेल. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक श्री. मंदार काळे यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला आहे. श्री. काळे आपल्या 'स्टेज प्रेझेन्स' आणि गायनकलेमुळे भारतात तसेच विदेशांमध्ये प्रसिद्ध आहेत. आपल्या अभिनयाने चित्रपट सृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री अश्विनी भावे या कार्यक्रमाच्या निवेदिका असणार आहेत.

'स्वरगंध' - पं. वसंतराव कुलकर्णी यांचे शिष्य, उत्तर अमेरिका आणि भारत येथे प्रसिद्ध असलेले गायक श्री. नरेंद्र दातार आपल्या अनुजा पंडितराव, रवी दातार, समिधा जोगळेकर अशा अनेक गुणी शिष्यांबरोबर हा मराठी नवीन आणि जुन्या भक्ती-भाव-चित्र-नाट्य संगीताचा कार्यक्रम पेश करणार आहेत. श्री. दातार यांनी बॉल्टिमोर, सियाटल, फिलाडेल्फिया अशा अनेक शहरांत पूर्वीच्या बृह्न्महाअराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनांमध्ये यापूर्वी कार्यक्रम सादर केले आहेत.

अधिवेशनाचे प्रमुख वक्ते (की-नोट स्पीकर ) असतील- प्रसिद्ध संशोधक, विज्ञान-प्रचारक, प्राध्यापक, आणि संपादक असलेले डॉ. बाळ फोंडके. डॉ. बाळ फोंडके यांची वैज्ञानिक विषयांवरची साठ पुस्तके आणि अनेक इतर साहित्यप्रकार प्रसिद्ध आहेतच. ते टाईम्स ऑफ इंडियाचे 'सायन्स एडिटर' तसेच 'चीफ एडीटर ऑफ सीएसआय आर रीसर्च जर्नल' म्हणून अनेक वर्षे काम सांभाळले आहे. डॉ. फोंडके यांचे मुख्य योगदान हे विज्ञान (सायन्स) सामान्यांपर्यंत नेणे हे असून त्यांना त्यासाठी इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे पारितोषिक मिळाले आहे. अधिवेशनात डॉ. फोंडके यांच्यासारख्या मान्यवर विचारवंतांचे यांचे भाषण आणि विचार ऐकायला मिळणार आहेत.

तर मंडळी, अगदी थोडे दिवस आपल्या अधिवेशनाला राहिले आहेत. तेव्हा लवकरात लवकर बुकिंग करा. काही प्रश्न किंवा शंका असल्यास आम्हाला जरूर कळवा. बाकी लवकरच अधिवेशनात भेटू अशी आशा आहे.
चित्रा देशपांडे
http://bmm2013.org/