September 2011

      मंडळी नमस्कार, श्रावण महिन्यातली सणांची मालिका चालू ठेवत मराठी मनाचा मानबिंदू असलेला देवांचा राजा, श्री गणपती, याच्या आराधनेचा सोहळा म्हणजे गणेशोत्सव. जगभरात या आराध्यदेवतेचे पूजन होते. खरं तर महाराष्ट्रामध्ये हा उत्सव पेशव्यांच्या कारकिर्दीत सुरू झाला. या सोहळ्याला सामाजिक तसेच सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले ते १८९३ साली. ब्रिटीश सरकारच्या कालखंडामध्ये त्यांच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकांसारख्या दूरदर्शी समाजकारण्याने समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्याची, एकात्मतेची भावना जागवण्यासाठी, वाढवण्यासाठी हा गणेशोत्सव सुरू केला.

      त्याच टिळकांच्या राज्याशी, महाराष्ट्राशी नाते सांगणाऱ्या तुम्हा सर्वांना माझ्या गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

      २-३ महिने समर कँप्स, भारतभेटी, नातेवा‌ईक, आप्तेष्टांना भेटून, ताजेतवाने हो‌ऊन आपली तरुण पिढी शाळा-कॉलेजांमध्ये दाखल होतेय. शाळेच्या अभ्यासात पूर्णपणे बुडून जायच्या आधी प्रचंड मेहेनत घेत आपापल्या मंडळात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागीही होतेय. आपल्या मराठीचा, संस्कृतीचा वसा उत्तर अमेरिकेत टिकवून ठेवणाऱ्या या सर्व सभासदांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

      आपल्या प्रत्येक मंडळात महाराष्ट्रातल्या कलाकारांच्या तोडीची, कदाचित काकणभर सरस असलेली प्रतिभावंत मंडळी आहेत. आपली ही कला, अमेरिकन पद्धतीने जोपासलेली संस्कृती आपण Talent Transfer या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमाद्वारे विविध मंडळांतून पोहोचवणार आहोत.

      माय मराठी, सुंदरा मनामध्ये भरली अशा दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती इथल्याच मातीतली. थि‌एट्रीक्स, कला, झगमग, इ-प्रसारण, कलाभवन ह्यासारख्या संस्था, मायबोली, अंतराळ सारख्या websites तर एकता सारखे त्रैमासिक ही सर्व आपली उत्तर अमेरिकेतील शक्तीस्थानं. या सर्वांच्या मदतीने आपण एक सक्षम यंत्रणा तयार करणार आहोत.

      जेवढ्या उत्साहाने तुम्ही भारतातल्या कलाकारांचे स्वागत करता, तेवढ्याच उत्साहाने तुम्ही इथल्या स्थानिक कलाकारांच्या कलेलाही प्रोत्साहन द्या ही माझी सर्वांना नम्र विनंती. उत्तर अमेरिकेतला कलाकार हा त्याला मिळणाऱ्या कलेच्या दादीसाठी भुकेला आहे. जेव्हा तुमच्या मंडळाची कार्यकारिणी वर्षभराच्या कार्यक्रमांची आखणी करते तेव्हा आवर्जून २५% कार्यक्रम Local Talent चे ठेवा. ती Talent इतरत्र transfer कशी करायची यासाठी आमची BMM कार्यकारिणी झटेल.

      मंडळी तुम्हाला कदाचित माहीत असेल की महाराष्ट्रातला झी-मराठी हा चॅनेल सध्या उत्तर अमेरिकेत दाखल झालाय. गेल्या ५-६ वर्षांच्या अथक प्रयत्‍नांनंतर आपल्याला तो बघण्याची संधी मिळतेय. आपले इथले कार्यक्रम त्या चॅनेलवर दाखवण्यासाठी आमची झी च्या मॅनेजमेंट बरोबर चर्चा चालू आहे. Globalization च्या युगात Glocalization हेच एखाद्या Product ला यशस्वी करतं याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

      बोस्टन अधिवेशनाचे काम जोरात सुरू आहे. स्वयंसेवकांबरोबरच्या पहिल्या Kick off meeting साठी मी १७ तारखेला बोस्टनला जातो आहे. त्याचा वृत्तांत पुढच्या अंकी. तोपर्यंत अर्धविराम,

      कळावे, लोभ असावा.

आपला

आशिष चौघुले

अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ

achaughule@gmail.com