November 2011

मंडळी नमस्कार. लाडू, करंज्या, चकली, चिवडा यांचे बोकाणे भरतच मी तुमच्याशी संवाद साधतोय. एरवी Coke मध्ये Sugar आणि Calories भरपूर म्हणून Diet Coke ला जवळ करणारा मी, दिवाळीचा फराळ म्हटला की हात आणि जीभ थोडी सैल सोडूनच त्याच्यावर ताव मारतो. कदाचित भारतीय पदार्थांवर Sugar आणि Fat चे Label नसल्यामुळे किंवा आपल्या पारंपरिक सवयींमुळे असेल पण आपले मराठमोळे पदार्थ दिसले की Diet, Calorie Consciousness को मारो गोली.

      यंदाच्या दिवाळीत मी ५ मंडळांना भेटी दिल्या. उद्देश हाच की मंडळांच्या Biggest Celebration मध्ये सभासदांबरोबर सहभागी व्हावं. त्यांना BMM च्या कामकाजाची माहिती द्यावी आणि त्याचबरोबर तिथल्या कलाकृती, पाककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन द्यावं.

      प्रत्येक ठिकाणची सजावट, कलाविष्कार, सभासदांचे ठेवणीतले कपडे, दागदागिने पाहिल्यावर शिरीष कणेकरांचं एक वाक्य आठवलं. ते म्हणायचे, "अहो थोरामोठ्यांची, टाटा-बिर्लाची (अमेरिकेतल्या भाषेत मराठी मंडळांची) दिवाळी वेगळी आणि आपली दिवाळी वेगळी." आपली दिवाळी (माझी) म्हणजे काय, इकडे बघायचं, तिकडे बघायचं आणि कोणी बघत नसेल तर शेजारच्याच्या पणतीतलं तेल आपल्या पणतीत ओतायचं. विनोद बाजूला ठेवला तरी या पाचही ठिकाणच्या दिवाळी महोत्सवांना स्वतःचं अस्तित्व होतं, भपका होता, नावीन्य होतं. आणि त्याचबरोबर एकमेकांबरोबर सण साजरा करण्याची जवळीक होती, ओलावा होता. Baltimore येथे नवीनच स्थापन झालेल्या मंडळात १४ ऑक्टोबरला दिवाळी साजरी झाली. तिथल्या मंडळाने स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम करताना Mainstream American मुलांनाही नाचात सहभागी केलं होतं. दिलीप परिख यांच्या कुशल दिग्दर्शनाने सादर केलेले नाटक तुफान रंगले. २२ ऑक्टोबरला मराठी विश्व, न्यू जर्सी यांच्या कार्यक्रमात सहभागी झालो. मराठी विश्व बद्दल मला नितांत आदर आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते अमेरिकेतलं एकमेव मंडळ आहे ज्यांची स्वतःची वास्तू आहे.

      २३ तारखेला Washington च्या मराठी कला मंडळाच्या कार्यक्रमाला गेलो असताना क्षणभर मी BMM Convention ला आलोय की काय असं वाटलं. सभासदांचा फेसाळणारा उत्साह, थिरकायला लावणारा गाण्यांचा कार्यक्रम, अद्ययावत सभागृह, एखाद्या Banquet Hall ला लाजवेल असा सुशोभित केलेला Dining Hall, उत्तम नियोजन. Kudos to Amol Phulambarkar & his team.

      २९ तारखेला आमच्याच Delaware मंडळातली दिवाळी गाजवली ‘सप्तसूर’ या कार्यक्रमाने. माझ्या मते ते सप्तसूर नसून तप्तसूर होते. ५ नोव्हेंबरला Boston च्या दिवाळीच्या कार्यक्रमात भाग घेतला. प्रथम Convention Center ची tour घेतली. सर्व सुखसोयी असलेलं, conveniently placed Convention Center २०१३ च्या अधिवेशनासाठी तुम्हाला नक्कीच आवडेल. संध्याकाळी ‘गुंजन’ या अंकाचं प्रकाशन केलं, त्यानंतर शशांक आणि मधू नेने यांचं ‘घोळात घोळ’ हे नाटक पाहिलं आणि Boston area मधल्या कलाकारांच्या परिपक्वतेची कल्पना आली.

      सर्व मंडळांचं उत्तम नियोजनाबद्दल अभिनंदन आणि मला आग्रहाच्या निमंत्रणाबद्दल आभार. तुमच्या मंडळात दिवाळी कशी साजरी केली हे आम्हाला जरूर कळवा. वृत्तात किंवा BMM Website वर नक्की प्रसिद्ध करू.

      हा अंक हातात पडेपर्यंत Thanksgiving ये‌ईल (Canada मध्ये गेल्या महिन्यात झाले). Thanksgiving हा सण युरोपियन आणि Native American लोक चांगल्या harvest साठी देवाला धन्यवाद देण्यासाठी साजरा करत आले. त्याचप्रमाणे मी आणि माझी कार्यकारिणी तुम्ही आम्हावर जो विश्वास दाखवलात तोच द्विगुणीत होवो याबद्दल आभार व्यक्त करतो.

      कळावे, लोभ असावा.

आपला

      आशिष चौघुले

अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ

            achaughule@gmail.com