December 2011

मंडळी नमस्कार. बघता बघता २०११ संपत आलं. १४ डिसेंबर १९९१ साली (२० वर्षांपूर्वी) ‘Land of the free & the home of the braves मध्ये मी नोकरीच्या निमित्ताने आलो. खिशात ८ डॉलर्स घे‌ऊन किंवा hardship पत्करून, वेळप्रसंगी बोटीनेही प्रवास करून माझ्या आधीची पिढी अमेरिकेत आली. पण आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या या बुद्धिजीवी लोकांनी अमेरिकेलाच आपली कर्मभूमी मानत आपलं स्वतःचं स्थान प्रस्थापित केलं. करमणुकीची, जिव्हाळ्याची, संस्कृतीची साधनं शोधली आणि त्यातूनच बृहन्महाराष्ट्र मंडळाचाही जन्म झाला.

      प्रत्येकाची इथे येण्याची पार्श्वभूमी, कारणं वेगवेगळी असतील पण आपल्या BMM च्या माध्यमातून आपल्या सर्वांचं नातं जोडलंय, जिव्हाळा जडलाय, आपुलकी वाढलीय. हीच आपुलकी, स्नेह कायम ठेवण्याचं आवाहन करत तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

      डिसेंबर महिना सुट्टीचा. College मधली मुलं Winter break मध्ये घरी येतात. X'mas च्या दरम्यान आप्तेष्ट, नातेवा‌ईक, मित्रमंडळी यांच्याबरोबर Get togethers होतात. ज्याप्रमाणे X'mas च्या निमित्ताने पाठवलेल्या Cards मध्ये काही जण वर्षभरातल्या प्रमुख घटनांचा आढावा घेतात त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय नोव्हेंबर-डिसेंबर मधल्या घडामोडी आणि नवीन वर्षातले प्रकल्प.

      बृहन्महाराष्ट्र मंडळाने झगमग-नेट च्या सहकार्याने अमेरिकेत ‘बालगंधर्व’ या चित्रपटाचे डॅलस, सॅन होजे, मिनियापोलिस, डेलावे‌अर, न्यू यॉर्क, फिनिक्स येथील संस्थांसाठी shows सादर केले. बालगंधर्व म्हणजे खरोखरच मराठी रंगभूमीला पडलेले गोड स्वप्न असे म्हटले तरी वावगे ठरू नये. नितीन चंद्रकांत देसा‌ई यांनी बालगंधर्वांना चित्रपटाद्वारे आमच्या पिढीसमोर सादर केलं आणि त्यातूनच मराठी संगीत नाटक ही काय चीज होती ते दाखवलं.

      मंडळी, ‘मैत्र’चे अधिवेशन जुलै २०१२ मध्ये डेट्रॉ‌ईट येथे होणार आहे. ‘मैत्र’ची कार्यकारिणी त्यासाठी कसून कामाला लागलीय. आमच्या मराठी शाळेची घोडदौडही चालू आहे. आतापर्यंत उत्तर अमेरिकेतल्या २७ शाळांनी BMM ने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवायला सुरवात केली आहे.

      तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला वृत्ताचा दिवाळी अंक आवडल्याचं कळवलं, त्याबद्दल तुमचे आभार. संजय गोखले यांच्या कुशल नेतृत्वाखाली गेली जवळजवळ २ वर्षे वृत्ताने नवनवीन उपक्रम हाती घेतले. जानेवारीपासून संजय गोखले वृत्ताच्या संपादनाची जबाबदारी विनता कुलकर्णी यांच्यावर सोपवत आहेत. वृत्ताची नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी आपण विनता कुलकर्णी यांना, तसेच काव्यविषयक नवीन उपक्रमासाठी संजय गोखले यांना शुभेच्छा दे‌ऊया.

      १४ नोव्हेंबरला न्यू यॉर्क मध्ये डॉ. शरदकुमार दीक्षित या एका महान व्यक्तीचा अस्त झाला. महाराष्ट्रात दोन लाख मोफत शस्त्रक्रिया केलेले, अनेक वेळा नोबेल पीस पारितोषिकासाठी नामांकित झालेले, Wheelchair वापरूनही कार्यरत असलेले एक ख्यातनाम सर्जन, पण त्यांच्या तरुणपणात ऑल इंडिया रेडि‌ओवरचे एक मुख्य गायक, असे त्यांचे चतुरस्र व्यक्तिमत्त्व! त्यांच्याशी वेळोवेळी बोलायची, त्यांच्या कार्याला खारीच्या वाट्याने का हो‌ईना पण हातभार लावण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य मानतो.

      नवीन वर्षात आखलेल्या उपक्रमांबद्दल थोडक्यात सांगायचं तर, एप्रिल-मे मध्ये आपण २ व्यावसायिक नाटकं आणतोय. Talent transfer उपक्रमात नवीन काम सुरू हो‌ईल. जानेवारी महिन्यात जागतिक मराठी अकादमी ने सादर केलेल्या शोध मराठी मनाचा या जगभरातल्या मराठी जनांसाठी समान व्यासपीठ असलेल्या अधिवेशनासाठी, तसेच इतर BMM उपक्रमांसाठी महाराष्ट्रात जातोय. तेथील वृत्तांत पुढील अंकी. तूर्त निरोप घेतो.

            कळावे, लोभ असावा.

            आपला

            आशिष चौघुले

            अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ

                  achaughule@gmail.com