January 2012

मंडळी, नमस्कार!

मुंबईच्या जानेवारीतल्या गुलाबी थंडीत बसून मी तुमच्याशी संवाद साधतोय. भारतभेटीला येऊन जवळ जवळ १० दिवस झाले. मित्र आणि आप्तेष्टांबरोबर अलिबागच्या किनाऱ्यावरुन २०११ला निरोप देताना सर्व वर्ष झर्रकन् डोळ्यासमोरून गेले. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, आशिर्वादाने २०१२ तेवढेच यशस्वी आणि आनंददायी घालवू या.

नवीन वर्षाची सुरुवात कोकण दौऱ्याने झाली. खेड, लोटे परशुराम, दाभोळ, गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी अशी ३ दिवसांची कोकणवारी. प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे. मीडियाने (प्रसार-माध्यमांनी) कोकणचे शहरीकरण झालेय अशी कितीही ओरड केली, तरी मी पाहिलेली ती छोटीछोटी गावे, गावातल्या खानावळी, फेसाळणारा समुद्र, जांभा दगड, लाल मातीचा धुरळा उडवत जाणारी एसटी सगळं काही अजूनही माझ्या लहानपणासारखेच आहे असे वाटते. konkan is and always will be pristine.

७ आणि ८ जानेवारीला विरार येथे जागतिक मराठी अकादमीने शोध मराठी मनाचा हे जगभरातल्या मराठीजनांसाठी संमेलन आयोजित केले होते. गेली ४ वर्षे मी या संमेलनात सहभागी होतोय.

जगाच्या पाठीवरून आलेल्या मराठी भाषकांनी एकमेकांशी नाट्य, कला, अर्थ, साहित्य, अशा विविध विषयांवर चर्चा करण्याचे हे एक समान व्यासपीठ. आजकाल राजकारणात मराठी आणण्याऐवजी मराठीचेच राजकारण केले जाते. शोध मराठी मनाचामध्ये नेमक्या याच बाबीला बगल देत महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला या जगभरातल्या मराठीजनांचे विचार ऐकण्याची संधी मिळते.

   यंदा विवा कॉलेज, विरार येथे आयोजित केलेल्या या संमेलनास बृहन्महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी हजर राहिलो. विरार वसईच्या तरुण पिढीसमोर माझे विचार मांडताना खूप समाधान वाटले. आमदार हिंतेंद्रजी ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ५ ते ६ हजार रसिकांची २ दिवस उत्तम बडदास्त ठेवली.

      ८ डिसेंबरला संध्याकाळी या संस्थेने आयोजित केलेल्या उद्योगबोध या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची आणि जगभरातल्या उद्योजकांसमोर बृहन्महाराष्ट्र मंडळ तसेच NAME  (North American Marathi Entrepreneur) या संस्थेबद्दल बोलण्याची संधी मिळाली.

     येत्या दहा दिवसात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या विविध उपक्रमांबद्दल महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांशी, सांस्कृतिक खात्याशी तसेच हितचिंतकांशी बोलण्याचा मानस आहे. महाराष्ट्रातले सध्या गाजत असलेले चित्रपट, नाटके, आणि काही कार्यक्रम उत्तर अमेरिकेत आणण्याविषयी बोलणी चालली आहेत. लवकरच त्याबद्दल तुम्हाला कळवू.

     १४ तारखेला मकर संक्रांत. दिवाळीनंतर २ महिन्यांच्या  ब्रेकनंतर उत्तर अमेरिकेतल्या विविध मंडळांत  संक्रांत  साजरी  होईल. तुमच्या आमच्यातला स्नेह तिळातिळाने वृध्दिंगत व्हावा  हीच  संक्रांतीनिमित्त शुभेच्छा.

           कळावे, लोभ असावा.

           आपला

           आशिष चौघुले ( अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
            
ईमेल: achaughule@gmail.com

                      फोन: 302-559-1367