May 2012

मंडळी नमस्कार,

नुकतीच, म्हणजे १ मे २०१२ रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेला ५२ वर्षे पूर्ण झाली. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे या पंचकाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्राची, मराठी अस्मितेची चळवळ पंडित नेहरुंनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती देऊन सफल झाली. तो दिवस होता १ मे १९६०.

कला, क्रीडा, संस्कृती, पराक्रम, परंपरा यांच्या रांगडेपणाचा आणि सौंदर्यदृष्टीचा अनोखा मिलाफ झालेला आपला महाराष्ट्र, त्या राज्याची संस्कृतीद्वारे नाळ जोडणारे आपले बृहन्महाराष्ट्र मंडळ (बृ. म. मं./BMM! ह्या BMM परिवारातल्या तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

उत्तर अमेरिकेत राहून आपण मराठी संस्कृतीची जोपासना करतोच. पण जेव्हा जागतिक मराठी परिषदेच्या निमित्ताने आम्ही जगभरातले मराठी भाषक एकत्र भेटतो, तेव्हा इस्त्रायलचे नोहा मस्सील, मॉरिशसच्या मधुमती कुंजल, चिलीचे बांदेकर, इंडोनेशियाचे कांचन निजसुरे आणि इतर अनेक परदेशवासियांकडून त्या त्या देशात मराठी संस्कृतीच्या जोपासनेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ऐकतो, तेव्हा मन अभिमानाने भरून येते. २०१३च्या बॉस्टन येथील बृ. म. मंडळाच्या अधिवेशनात जगभरातील मराठीच्या पाईकांना आग्रहाने आणि सन्मानाने बोलावण्याचा मानस आहे.

रिचमंड (व्हर्जिनिया) मराठी मंडळाच्या आग्रहाच्या निमंत्रणानुसार, एप्रिलमधे गुढीपाडव्याच्या कार्यक्रमासाठी तेथे उपस्थित रहाण्याचा योग आला. २००७ मधे स्थापन झालेल्या ह्या मंडळाने सातत्याने दर्जेदार कार्यक्रम करत अमेरिकेत आपला ठसा नक्कीच उमटवला आहे.

मंडळी, मागच्या महिन्यात तुम्हाला सांगायचं राहून गेले. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या विश्वस्त समितीवर, कै. आनंद जोशी यांच्या जागी श्री दिलीप थत्ते यांची बृ म. मंडळाने नियुक्ती केली आहे. विविध मंडळांवरील कामाचा त्यांचा अनुभव बृ. म. मंडळाच्या कामकाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. दिलीप यांना माझ्यातर्फे शुभेच्छा!

जुलै २०१२मधे डेट्रॉईट येथे आयोजित केलेले मैत्र अधिवेशन तूर्त रद्द केले आहे. Project Maagement’ आणि ’What if Analysis’ यांचा कुशलतेने वापर करून शिरीष सबनीस आणि त्यांच्या सहकार्यांनी वेळीच हा कटू पण योग्य निर्णय घेतला. त्या सर्वांच्या दूरदर्शीपणाचा आम्हाला अभिमान आहे. ह्या अधिवेशनाबाबत सिंहावलोकन करून त्याचे विश्लेषण तुम्हा सर्वांसमोर नक्कीच ठेऊ. हे रद्द केलेले मैत्र अधिवेशन आता २०१३ साली बॉस्टनमधे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाबरोबर घेतले जाईल.

पुढच्या वर्षी माझी मुलगी मैत्रच्या वयोगटात मोडेल. हे मैत्र अधिवेशन दर खेपेस बृ. म. मंडळाच्या अधिवेशनाबरोबर घेतले तर? मैत्र अधिवेशनाचे कार्यक्रम स्वतंत्रपणे दुसर्‍या हॉटेलमधे आयोजित करता येतील. सर्व कुटुंब अधिवेशनानिमित्त जाण्या-येण्याचा एकत्र प्रवास करू शकतील. आईवडील मोठ्यांच्या अधिवेशनात तर, मुले मैत्र अधिवेशनात आणि बँक्वे (Banquet) सारखा एखादा कार्यक्रम सामाईकपणे आयोजित करता येईल. मैत्र मधील ही युवा-पिढी आपली संस्कृती जर इथे त्यांच्यापरीने जोपासणार असेल तर हे क्रॉसओव्हर (Crossover) महत्त्वाचे आहे. मला वाटतं मैत्र संस्था वृध्दिंगत करण्यासाठी अशी पावलं उचलणं जरूरीचं आहे.

वाह गुरु नाटकाचे व्हिसाचे सर्व सोपस्कार करून संबंधित नाट्यसंच आणि कलाकार अमेरिकेत डेरेदाखल झाले. पूर्वनियोजित वेळांप्रमाणे अमेरिकेतील नऊ मराठी मंडळांमधे ह्या नाटकाचे प्रयोग होत आहेत. प्रत्येक प्रयोगाच्या आधी माझ्या मनांत एक अनामिक हुरहुर असते- एवढी ढोर मेहनत घेऊन बृ. म. मंडळाने हा दौरा आयोजित केला आहे, तो इथल्या रसिकांना आवडतोयं की नाही! पण मग प्रयोगानंतर फोन खणखणतो, आणि उच्च स्वरात ओरडून जेव्हा डेट्रॉईटचा हर्षद अण्णेगिरी, शिकागोचा नीलेश विळेकर प्रयोगाच्या सफलतेची Two Thumbs up’ म्हणून वाहवा करतो, तेव्हा वाटतं, याचसाठी केला होता अट्टाहास !!!

कळावे लोभ असावा,

आपला

आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com
फोन: 302-559-1367