Oct, 2013

नमस्कार!

भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना स्वतंत्र लढ्याचा मुख्य कणा मानले जात होते. मग ते रानड्यांचे ज्ञानप्रकाश, टिळकांचे केसरी, आगरकरांचे सुधारक अथवा गांधीजींचे Indian Opinion असू देत! या सर्व वृत्तपत्रांचा सामाजिक आणि राजकीय क्रांती घडवण्यात एक मोठा हात होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा प्रभाव हा इतर राज्यांपेक्षा जास्त होता. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वृत्ताचा इतिहास हा बृहन्महाराष्ट्र मंडळाइतकाच जुना आहे. कदाचित बृ. वृत्ताला बृ. म. मंडळाचा कणा म्हणता येणार नाही, परंतु बृ म. मंडळाचे हे मुखपत्र गेल्या ३२ वर्षांपासून अमेरिकेतील मराठी मनामनाचा ठाव घेत असते. मराठी विचारांना मांडण्याचे ते एक माध्यम ठरले आहे. बृ. वृत्ताची वाढ व प्रगती होण्यामागे अनेकांचा सहभाग आहे. पहिल्या संपादिका जया हुपरीकर यांच्यापासून आताच्या संपादिका विनता कुलकर्णी व इतर काळातील अनेक संपादक व सहसंपादक यांच्या सातत्यामुळे दर महिन्याला आपल्याला बृ. वृत्त बघायला मिळते आहे. याची अजून वाढ व्हावी व जास्त लोकांपर्यंत हे पोहोचावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

सांगायला विशेष आनंद होतो आहे की मागच्या आठवड्यात बृ. म. मंडळाशी संलग्न असलेल्या दोन संस्थांनी मराठीजनांसाठी अतिशय धडाडीचे व धाडसी पाऊल उचलले आहे. प्रथमच न्यू जर्सीच्या मराठी विश्व (किंवा त्यादृष्टीने कुठलेही मंडळ) यांनी मंडळाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या राजकीय व्यक्तीला आमंत्रित केले. न्यू जर्सीचे गव्हर्नर Mr. Chris Christie, (कदाचित अमेरिकेचे भावी अध्यक्ष) ह्यांनी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात मोठ्या आनंदाने भाग घेतला. विशेष म्हणजे मंडळातील बाल मंडळी व कुमार वर्ग गव्हर्नर क्रिस्तींना भेटायला फार उत्सुक होते. त्यामुळे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, मराठी मंडळांनी कार्यक्रमांसाठी आमंत्रितांच्या यादीचा विचार करतांना, मुलांना आवडेल, त्यांना भेटावेसे वाटेल अशा पाहुण्यांना जरूर बोलवावे. मराठी विश्व न्यू जर्सीचे अध्यक्ष विलास सावरगावकर व कार्यकारिणी ह्यांनी घातलेला हा पायंडा नक्कीच कौतुकास्पद आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने २२ सप्टेंबर २०१३ रोजी, न्यू यॉर्कमधील टाइम स्क्वेअर येथे महाराष्ट्रच आणून ठेवला आहे की काय असे वाटत होते. न्यूयॉर्कमधे प्रथमच मोठ्या प्रमाणात दहीहंडी, तुतारी, ढोलपथक अमेरिकन लोकांना बघायला मिळाले. त्यांनीही उत्साहाने या उपक्रमास प्रतिसाद दिला. मराठी संस्कृती व कला ह्यांचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सादर केलेले हे प्रदर्शन अमेरिकेतील लोकांच्या कायम स्मरणात राहील ह्याबद्दल शंका नाही.

बृ. म. मंडळाच्या प्रॉव्हिडन्स येथील २०१३च्या अधिवेशनाचे प्रमुख संयोजक बाळ महाले, व सहकारी कार्यकर्ते- अदिती टेलर, अविनाश पाध्ये, संजय सहस्रबुद्धे यांनी अधिवेशन आयोजनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत वेगवेगळे काय टप्पे असावेत याबद्दल स्वानुभवाने जमवलेली महत्त्वाची माहिती पुरवली, आणि लॉस अँजलिसमधील २०१५ च्या बृ. म. मंडळ अधिवेशनाच्या कार्यकर्त्यांनी त्या माहितीची आनंदाने व उत्साहाने दखल घेतली.
मागील अधिवेशनातील त्रुटी पुढील अधिवेशनात होवू नयेत हा पूर्वीच्या अधिवेशनातील कार्यकर्त्यांचा मनोमन प्रयत्न असतो. त्यादृष्टीने मागील अधिवेशनातील माहिती पुढच्या मंडळापर्यंत पोहोचावी ही कार्यकर्त्यांची इच्छा असते. त्यामुळेच आपले पुढचे अधिवेशन अधिकाधिक यशस्वी होत असते.

जय महाराष्ट्र, जय अमेरिका !

आपला,

सुनील सूर्यवंशी
अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ
suryawanshi@yahoo.com