Jan, 2014

अध्यक्षीय
नमस्कार मंडळी,
माझी भारतभेट ही नेहमीच धावपळीत असते. परंतु यंदाच्या भेटीत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म मं.) निमित्ताने अनेकांना भेटायचे होते. त्यामुळे दोन/अडीच आठवडे कसे गेले ते कळलेच नाही.
भारतात अरविंद केजरीवाल ह्यांनी भारतीय आम आदमीला राज्यघटनेची आणि लोकशाहीची खरी ताकद दाखवून दिली. त्यांच्या धोरणाबद्दल लोकांचे एकमत नसेल, परंतु त्यांनी दोन वर्षात जे करून दाखवले ते न,च कौतुकास्पद आहे. ह्या बातमीबद्दल माझ्या एका मराठी पत्रकार मित्राशी चर्चा करत होतो. त्या चर्चेचा सूर असा... अण्णा हजारे ह्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन उभे केले; त्याचे हीरो/नायक अण्णाच, मात्र अण्णा राज्यकर्ते वा किंग नाहीत; मराठी माणूस किंग-मेकर असू शकतो; पण का कोण जाणे, ज्या क्षणी किंग बनण्याची वेळ येते, त्या वेळी त्याची कचखाऊ वृत्ती उफाळून येते, ही गोष्ट न,च विचार करण्यासारखी आहे.
जास्त जाहिरातबाजी नको, अशी एक मागणी बृ. म. मंडळाच्या अधिवेशनाला येणाऱ्यांची असते. अधिवेशनातील कार्यक्रमांच्या प्रायोजकांची पण याबाबतीत एक बाजू असते, आणि ती काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न मी आणि अधिवेशनाचे संयोजक शैलेश शेट्ये ह्यांनी केला. प्रायोजकांना त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीची परतफेड अधिक महत्त्वाची, त्यामुळे प्रायोजक आणि अधिवेशनाचे उपस्थित रसिक ह्या दोघांच्याही दृष्टीने सुवर्णमध्य कसा साधता येईल, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
हां हां म्हणता आमच्या कार्यकारणीला बृ म. मंडळाचे काम हाती घेऊन पाच महिने झाले. दोन वर्षांसाठी आखलेल्या उद्दिष्टांसाठी पायाभरणी व कामे मोठ्या जोमाने चालू आहेत, आणि यापुढेही चालू राहतील. त्यासाठी आमच्या कार्यकारणीला आपले सहकार्य मिळेल ह्याबद्दल शंका नाही.
माझ्या ह्या भारतभेटीत महाराष्ट्रातील अनेक उद्योजक, प्रायोजक, कलाकार, लेखक/लेखिका, समाजसेवक इत्यादींना भेटलो. त्यामधे एक भेट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे मॅग्सेसे पुरस्कार मिळालेल्या जळगाव जिल्ह्यातील नीलिमा मिश्रा ह्यांची. त्यांनी एक सामाजिक संस्था उभी केली असून, महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात त्यांचे बचतगटाचे उल्लेखनीय कार्य चालते. त्यांनी ह्या संस्थेमार्फत खेड्यातील गरीब महिलांना रोजगार निर्माण करून, स्वावलंबी जीवन जगून ग्रामविकास कसा साधावा हे जगाला दाखवून दिले.
मराठी मंडळातील कार्यकारिणी संक्रातीच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करत असतील. तेव्हा त्या सर्वांना, व आपणां सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह, मनापासून सांगतो, तिळगुळ घ्या व गोड गोड बोला. लवकरच बोलूयात.
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com