Nov, 2013

LAलकारी
" फुलांची रास, चन्दनाचा सुवास।
दिव्यांच्या रांगा, रांगोळीचे सडे ॥
नवे पर्व, विचार नवे ।
आली दिवाळी आली, पसरण्या नवआकांक्षांचे धडे ॥ "
प्रिय मराठी बंधूभगिनींना दिवाळीच्या प्रकाशमयी शुभेच्छा.
प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाने अनेक बाबतीत पुढील अधिवेशनांसाठी एक नवीन मानदंड निर्माण केला. पद्मजा फेणाणी, अजय अतुल या नव्या जुन्या कलाकारांचे कार्यक्रम पाहून, तेंडुलकर आणि सेहवाग यांची एकाच वन डेमधे सेंच्युरी पाहिल्याचा अनुभव आला. सा रे ग म, श्री नंरेंद्र दातार यांचा स्वरगंध, दिलीप वेंगसरकर यांची मुलाखत, चाहूल, खेळ मांडला... अशा एकाहून एक सरस कार्यक्रमांनी बहार आणली. संगीत मानापमान नाटकाने या सर्वांवर कळस चढवत मराठी कलाकारांची नव्या दमाची फौज मागील पिढीतील कलाकारांच्या तोडीस तोड नव्हे तर कांकणभर पुढेच आहे हे सिद्ध करून मराठी अस्मितेच्या अपेक्षांची पूर्तता केली. मित्रांनो, या सर्व कार्यक्रमांसह अधिवेशनातील मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी, उजळून निघालेले ऋणानुबंध, हे सर्व शक्य झाले ते केवळ तुमच्या मराठीवरील प्रेमामुळे, तुमच्या मराठी आकांक्षामुळे, तुमच्या आपल्या भाषेला, साहित्याला, नाटकाला, आणि मुख्य म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेला जिवंत ठेवण्याच्या जिद्दीमुळे. तुम्ही मराठी माणसे कधी एकत्र येणार? अशा छद्मी उपहासाला तोडीस तोड उत्तर देत आजवर शंभर दोनशे नव्हेत तर तब्बल तीन हजार मराठीजन चार दिवसाच्या सोहळ्याला एकत्र येतात, तेही साता समुद्रापलिकडे, ही बाब गिनीज बुकात नोंदवण्यासारखी नसली तरी, आंतर्राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्याजोगी नक्कीच आहे.
' चला उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती,
कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा,
किनारा तुला पामराला'
हे कोलंबसाचे गर्वगीत अमेरिकेसारख्या, महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर आज आपण गाऊ शकतो, ते केवळ तुमच्यामुळेच.
अधिवेशनाच्या उपस्थितीचा वाढता आकडा हा मानदंड न ठेवता, नवीन पिढीचा अधिवेशनामधील सहभाग जरी पाहिला तरी, मराठी भाषकांची पुढची पिढी ही बदलत्या भारतीय पटलावर अग्रस्थानी आहे, आणि राहील हे सहज लक्षात येते. ही पिढी हक्कासाठी जागरूक आणि तितकीच जबाबदारही आहे. या पिढीने आपल्या भाषेची आणि पर्यायाने मराठी माणसाची झालेली पिळवणूक पाहिलेली आहे, आणि मुख्य म्हणजे आपल्या मराठी स्वाभिमानाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायची त्यांच्याकडे जिद्द आहे.

अरे काय रे कसा आहेस?, चितळेकी बाकरवडी लाया क्या?, आमच्या मुंबईचा तेंडल्या...अशी अनेक वाक्ये जेव्हा इतर भाषकांकडून ऑफिसमध्ये ऐकायला मिळतात, तेव्हा आपल्यासारख्या बुजुर्गांनी इतकी वर्षे झुंजून मराठी संस्कृती फक्त अटकेपार जिवंतच ठेवली नाही तर, त्यामध्ये अंकुर पेरून त्याला नवीन पालवी फुलवली याची खातरजमा होते. मित्रांनो, "नव्या बांधुया, रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी" हा संदेश देवून प्रॉव्हिडन्स मधील अधिवेशनाने केलेल्या मराठीच्या उत्सवाला पुढे नेण्याची, आणि रेशिमगाठी अधिक घ- करण्याची मोठी जबाबदारी आम्ही एल ए करांनी ललकारी देऊन शिरावर घेतली आहे.
गुगल प्लस, हुलू प्लस, ये दिल मांगे मोअरच्या जमान्यात सतत काहीतरी नवीन आणि जास्त चांगले मिळवण्याच्या आपल्या अट्टाहासाची आम्हाला कल्पना आहे. म्हणूनच लॉस अँजलिस मधील आगामी अधिवेशन हा फक्त आपला सांस्कृतिक उत्सवच नाही, तर मराठी माणसांच्या सर्जनशीलतेचे, नवीन विचारांच्या धुमारीचे, धडाडीचे आणि कर्तबगारीचे प्रतीक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजवर मायभूमीवर, मातृभाषेवर केलेल्या प्रेमाची, ज्या मातीतून उगवलो त्या मातीला या अधिवेशनातून काहीतरी परत देण्याची आमची उर्मी आहे. ज्या भूमीने टिळक, आगरकर, फुले, आंबेडकर यांच्या बरोबर कुसुमाग्रज, बालकवी, मंगेशकर, तेंडुलकर, गावस्कर यासारखे अनेक हिरे उत्पन्न केले, त्या मायमराठीच्या भूमीपुत्रांचा जयजयकार, आणि सन्मान या अधिवेशनामधे आम्हाला करायचा आहे. नवीन पैलू पाडलेले हिरे आपणासमोर आणायचे आहेत, अनेक रत्ने शोधायची आहेत. त्यासाठी आपल्या सारख्या थोरामोठ्यांचे, जाणकारांचे आम्हाला आशीर्वाद तर हवेतच, परंतु हा सोहळा सार्थ आणि नेत्रदीपक करण्यासाठी आपले भक्कम आर्थिक पाठबळ देखील हवे आहे. आपण सर्वांनी आजवर अधिवेशनाच्या स्वयंसेवकांना मायमराठीच्या सेवेचा महामार्ग दाखविलात, प्रेम केलेत, स्नेहबंध जुळवून आणलेत, तसेच प्रेम करून आम्हा एल ए करांना शुभाशीर्वाद द्यावेत, ही विनंती.
- आनंद वळुंजकर (लॉस अँजलिस, कॅलिफोर्निया)