Dec, 2013

LAलकारी

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन - लॉस अँजलिस २०१५ बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा

मंडळी,

संस्थेचे बोधचिन्ह म्हणजे संस्थेचा अभिमान, इतिहास आणि तिचे कर्तृत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी. पुढच्या पिढीला संदेश द्यायची संधी. अगदी डॅन ब्राउनच्या दा विन्ची कोड पासून शिवाजी महाराजांच्या छत्रपती मुद्रेपर्यंत, रेड क्रॉसच्या चिन्हापासून अमेरिकेच्या गरुडापर्यंत...आतापर्यंत आपण अनेक बोधचिन्हे पाहिली. आपल्याला असेच एक बोधचिन्ह आपल्या २०१५ मधील अधिवेशनासाठी तयार करायचे आहे. यासाठी आम्ही एक स्पर्धा आयोजित करीत आहोत. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. ही स्पर्धा उत्तर अमेरिका खंडातील सर्वांसाठी उपलब्ध राहील. बोधचिन्ह आणि घोषवाक्य या दोन वेगळ्या स्पर्धा असून प्रत्येक स्पर्धेतील विजेते वेगवेगळे जाहीर करण्यात येतील.

२. उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाचे वस्त्र विणले गेले आहे, इथे राहत असलेल्या तीन पिढ्यांच्या धाग्यांनी. जे १९६०, १९७० च्या दशकात अमेरिकेत स्थलांतरित झाले ती पहिली पिढी. आयटीच्या निमित्ताने अमेरिकेत तुलनेने अलिकडे आलेली ही दुसरी पिढी. तसेच इथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांची ही तिसरी पिढी. ह्या मराठी समाजाच्या कालच्या, आजच्या, आणि उद्याच्या पिढ्यांच्या जगण्याच्या कल्पना वेगळ्या, विचार करण्याची, व्यक्त होण्याची रीतही वेगळी. पण ह्या सर्व पिढ्यांना एकत्र जोडणारी नाळ आहे मराठी संस्कृतीची! ह्या अधिवेशनात ह्या पिढ्यांमधला संवाद वाढेल, आणि त्याचबरोबर प्रत्येक पिढीला हे अधिवेशन आपलं वाटेल, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. हे अधिवेशन म्हणजे ह्या तीन पिढ्यांच्या कर्तृत्वाचा उत्सव, ह्या पिढ्यांनी सातासमुद्रापार जपलेल्या मराठी संस्कृतीचा उत्सव! त्यामुळेच २०१५च्या अधिवेशन समितीने - ’मैत्र पिढ्यांचे’ ही संकल्पना आगामी अधिवेशनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बोधचिन्ह व घोषवाक्य दोन्ही या संकल्पनेशी (थीमशी) संबधित असणे आवश्यक आहे.

३. स्पर्धा लॉस अँजलिसमध्ये होणार असल्यामुळे लॉस अँजलिस शहराचा संदर्भ बोधचिन्ह आणि घोषवाक्यात असला तर उत्तम.

४. बोधचिन्ह आणि घोषवाक्य ही तुमची मूळ कल्पना हवी. ह्यातून कुठल्याही प्रकारे बौद्धिक अधिकाराचा भंग होता कामा नये.

५. नाविन्यपूर्ण कल्पनेवर आणि अधिवेशनाच्या थीमशी असलेल्या जवळिकेवर विजेता बोधचिन्ह आणि घोषवाक्य निवडले जाईल.

६. विजेत्याचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य हे अधिवेशनाचे अधिकार राहतील. अधिवेशन समिती त्यामध्ये योग्य तो बदल करणयाचे ह, राखून ठेवत आहे.

७. दोन्ही विजेत्यांसाठी प्रत्येकी एका व्यक्तीची अधिवेशनाची नोंदणी (अंदाजे $३००) पारितोषिक म्हणून दिली जाईल.

अधिक माहिती: http://bmm2015.org/spardha.html

बोधचिन्ह आणि घोषवाक्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी, २०१४ आहे. आपली कल्पना आम्हाला पुढील ईमेल पत्त्यावर पाठवा- spardha@bmm2015.org

चला तर मग, जागवा तुमच्यातील चित्रकारिता, सृजनशीलता, कलात्मकता; आणि घडवू या झाले बहु होतीलही बहु परंतु या सम हेच असे अधिवेशन !

- आनंद वाळुंजकर (लॉस अँजलिस, कॅलिफोर्निया)