Jan, 2014

ललकारी
बदलाची चाहूल
मंडळी, आपणां सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
लॉस अँजलिसच्या थंडीत बसून, शालीवर शाली पांघरून, हीटर लावून, गरम गरम चहाचे घोट घेत वर्तमानपत्रे वाचताना एक गोष्ट लक्षात आली. (हो, आम्हाला वाजते थंडी ५६ डीग्रीजमधे! आम्हाला नाही जमत हाफ पँटमधे बाहेर बसायला!) बदलत्या भारतात मराठी माणूस आपल्या देशाच्या भविष्यावर मजबूत पकड घेवू पहात आहे. नजीकच्या काळातील अनेक घटना या बदलाचे सूतोवाच करीत आहेत.
काही ठळक उदाहरणे द्यायची झाली तर, अनेक दशके घोंगडे भिजत पडलेले लोकपाल विधेयक/बिल सरतेशेवटी दोन्ही सभागृहात मंजूर झाले. हे बिल पास होण्यासाठी अण्णा हजारे यांनी ह्या वयात जी धडपड केली ती आपणां सर्वांना अभिमान बाळगण्यासारखी आहे. खरे तर मी अण्णांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबर उपास करायचे ठरवले होते. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी माझी दांडी उडाली. भुकेने जीव कासावीस झाला, आणि नकळत अण्णांच्या प्रखर राष्ट्रभक्तीची जाणीव झाली. मनात म्हटले, सत्यासाठी आग्रह धरणारे, आत्मक्लेश सोसणारे आमच्या पिढीसाठी हेच आमचे मदिबा! आमच्या पिढीने काही गांधी पाहिले नाहीत, की त्यांच्यासारखी व्यक्ती अनुभवली नाही. अण्णांमुळे आम्हाला गांधी अनुभवायाला मिळाले. शेजारील अरब जगात, सीरीया, इजिप्त या देशात यादवी युद्धाचे तांडव पेटलेले असताना भारतातील जनता शांतीने सत्याचा आग्रह धरीत होती, लोकपाल बिलाची मागणी करीत होती, अतिशय तुरळक हिंसाचार झाला, याचे शंभर ट, यश अण्णांनाच.
भारताच्या राजकीय पटलावर अण्णांच्या माध्यमातून सत्याची धुमारी जागत ठेवणाऱ्या मराठी मनाला सचिन तेंडूलकरच्या निवृत्तीच्या घोषणेने मात्र खिन्न केले. सचिनचे क्रिकेट मधील रेकॉर्ड्‌स्, त्याचा साधेपणा आणि खेळाविषयी निष्ठा ह्या बद्दल नवीन काही सांगायला नको. क्रीडा रसिकांनी सचिनला देवत्वाच्या जवळ पोहोचवल्याची जाणीव असूनसुद्धा, विनम्र आणि सर्वांचे लाडके असे हे व्यक्तिमत्व मराठी मातीतून उभारी घ्यावे ह्या सारखे आपले भाग्य नाही.
तिसरी आणि आपल्या जवळ, अमेरिकेत घडलेली घटना म्हणजे न्यूयॉर्क मधील भारताच्या अधिकारी, देवयानी खोब्रागडे ह्यांना झालेली अटक. गुंतागुंतीच्या कायद्यामध्ये अडकलेल्या देवयानीला सर्व भारतीय जनतेने एकमुखाने पाठिंबा दिला. परक्या देशामधे आपल्या माणसाला एकटे पडू देणार नाही या भूमिकेने बहुतांशी लोकांनी ह्या घटनेकडे पाहिले हे विशेष कौतुक.
मंडळी, ह्या आणि अशा अनेक गुणी व्यक्ती तुमच्या, आमच्यामधे आहेत. कुणाला प्रसिद्धी मिळते, कुणाला नाही. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एकमेकांना धरून आहोत. आपल्याला लोकांना आपल्याला लोकांना सामावून घ्यायचे आहे, चुकलेल्यांना दिशा दाखवायची आहे, आपलाच आदर्श आपल्या पुढच्या पिढीपुढे ठेवायचा आहे. समर्थांच्या भाषेतच बोलायचे झाले तर,
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करी तयाचे ।
परंतु तेथे मराठी मनाचे । अनुष्ठान पाहिजे ॥
अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे.
मंडळी, २०१५च्या अधिवेशनासाठी आम्ही प्रतीकचिन्ह व घोषवाक्य आणि निबंध स्पर्धा आयोजित केली आहे हे आपल्याला एव्हाना ठावूक आहेच. निबंधस्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवायची अंतिम तारीख १५ जानेवारी आहे. आणि प्रतीकचिन्ह व घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवायची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. प्रतीकचिन्ह व घोषवाक्य (लोगो आणि स्लोगन) अधिवेशनाच्या सूत्रावर/थीमवर आधारलेले हवे आहे. अधिवेशन समितीने अमेरिकेत मराठी माणसांच्या राहणाऱ्या तीनही पिढ्यांना एकत्र घेऊन अधिवेशन करायचे ठरवले आहे, आणि म्हणूनच मैत्र पिढ्यांचे हे अधिवेशनाचे सूत्र ठरवण्यात आले आहे. या स्पर्धांविषयी अधिक माहिती तुम्हाला http://bmm2015.org या संकेतस्थळावर मिळेलच. त्याशिवाय तुम्ही आमच्याबरोबर spardha@bmm2015.org या ईमेलवर संपर्क करू शकता.
महाराष्ट्र मंडळ लॉस अँजलिसने वर्षाची सुरुवात म्हणून संक्रांतीनिमित्त तिळगुळाचा गोड कार्यक्रम आयोजित केला आहे. लहान मुलांचे सामूहिक नृत्य, नाटिका, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्याबद्दल आम्ही आपल्याला पुढील अंकामध्ये सांगूच. तोपर्यंत आपल्या सर्वांना कणभर तिळ देवून मणभर प्रेम वाढवणाऱ्या संक्रांतीच्या गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड बोला !
- आनंद वाळुंजकर, (लॉस अँजलिस, कॅलिफोर्निया)