Mar, 2014

acheter viagra "आपले अधिवेशन हे सर्व मराठी पिढ्यांची मने एक करणारे असले पाहिजे. सर्वांना सामावून घेणारे असले पाहिजे. विशेषतः नवीन पिढीला आपण का एकत्र येतो ह्यामागची भूमिका समजावून दिली पाहिजे. "
कॅलिफोर्नियामधील लॉस अँजलिस येथे २०१५ साली आयोजित बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं./ऑकक) अधिवेशनाची धुरा शिरावर घेतलेले, लॉस अँजलिस मराठी मंडळाचे कार्यकर्ते, बृ. म. मं. अधिवेशन संयोजक शैलेश शेट्ये नुकत्याच एका सामाजिक कार्यक्रमात सांगत होते.

शैलेश शेट्ये यांच्याशी लॉस अँजलिस मराठी मंडळातील आनंद वाळुंजकर यांनी केलेल्या बातचितीचा हा वृत्तांत.
प्रश्न: तुमच्या विषयी थोडे सांगाल का?
शैलेश शेट्ये: मी मुळचा मुंबईचा. कामधंद्याच्या निमित्ताने गेली दहा वर्षे लॉस अँजलिसमधे वास्तव्य करीत आहे. २०१२- २०१३ साली लॉस अँजलिस महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा मी सांभाळली. आता बृ. म. मंडळाच्या (BMM) २०१५च्या अधिवेशनाचा संयोजक म्हणून आपल्या समोर येण्याची संधी मिळाली आहे.
अमेरिकेतील जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र मंडळ लॉस अँजलिसचा अत्यंत आभारी आहे.
ज्या महाराष्ट्राने आपल्याला अभिमानाने मराठी म्हणून समाजात स्थान दिले, त्या मराठीची उत्तुंग वाटचाल परदेशातही पुढे नेण्याची मला आणि "एल ए" करांना ही एक उत्तम संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
प्रश्न: अधिवेशनाची तयारी कशी चालली आहे?
शैलेश शेट्ये: खरं तर बीएमएमचे अधिवेशन म्हणजे कामाचा प्रचंड व्याप आणि अपेक्षांचे विलक्षण ओझे. सुरुवातीला वाटले होते, की हे सगळे कसे साध्य होईल? अधिवेशनाच्या कामाला सुरुवात करून आता अंदाजे सहा महिने झाले. बऱ्याचश्या कामांना आता चांगली गती मिळाली आहे. आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला तर खात्रीने एकच सांगू शकेन, की हे सर्व घडत आहे ते अधिवेशनाच्या स्वयंसेवकांमुळे. मला त्यांचा अतिशय अभिमान वाटतो. आपला कामधंदा आणि कौटुंबिक रथयात्रा सांभाळून, राहिलेल्या वेळेत अधिवेशनाचे काम सांभाळणाऱ्या ह्या गुणी स्वयंसेवकांचा मी अत्यंत आभारी आहे. आम्ही १५ स्वयंसेवकांचे एक मुख्य संचालक मंडळ नेमले आहे. हे मंडळ अधिवेशनाच्या विविध कामांची सूत्रे सांभाळत आहेत. तसेच एकंदरीत २२ विविध समित्या नेमल्या आहेत. त्यामधे सुमारे १५० स्वयंसेवक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे लॉस अँजलिस व्यतिरिक्त उत्तर कॅलिफोर्निया, टेक्सास, मिशिगन, न्यू जर्सी, शिकागो, सिअ‍ॅटल, बॉस्टन या राज्यातील स्वयंसेवकांचाही त्यात समावेश आहे.
सगळ्याच स्वयंसेवकांनी आपापल्या कामाला उत्साहाने सुरुवात केलेली आहे. अधिवेशनाच्या कार्यक्रमांची रूपरेषा तयार झाली असून आमचे स्वयंसेवक उत्तर अमेरिकेतील विविध मराठी मंडळांशी लवकरच संपर्क साधतील.
अधिवेशनासाठी निधी गोळा करण्याच्या कामालाही चांगली सुरुवात झाली असून त्याला लॉस अँजलिस व संपूर्ण उत्तर अमेरिकेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मला लॉस अँजलिस, मिशिगन, न्यू यॉर्क आणि न्यू जर्सी येथील देणगीदारांचे खास आभार मानावेसे वाटतात. कारण अधिवेशनाला अजून १६-१७ महिन्याचा कालावधी असून सुद्धा ह्या मंडळीनी विश्वास दाखवून मदतीचा हात पुढे केला. अतिशय प्रामाणिक प्रयत्न करून हा विश्वास आम्ही न, सार्थ करू. तसेच अधिवेशनस्थळ, राहण्याची हॉटेल्स, अधिवेशनातील जेवणाची सोय, अधिवेशनाचे संकेतस्थळ, आणि येणाऱ्या मंडळींची स्थानिक व्यवस्था अशा कामांची वाटचालही जोमाने सुरू आहे. अधिवेशनाच्या आतापर्यंच्या एकंदरीत कामाबद्दल मी समाधानी आहे.
प्रश्न: लॉस अँजलिसचे अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा कसे वेगळे असेल?
शैलेश शेट्ये: जेव्हा नवीन मंडळी पुढील अधिवेशनाची तयारी करतात, तेव्हा आता नवीन काय? असा प्रश्न प्रत्येक वेळी पडतो. भविष्याचा विचार करता मला बृ. म. मंडळ अधिवेशन ही संकल्पना फार आवडली. परदेशात राहून जिथे मराठी मने दर दोन वर्षांनी एकत्र येतात, आणि नव्या-जुन्याचा उत्सव मांडतात, तशीच काहीशी संकल्पना आमचीही असेल.
आपल्या मराठी मंडळीना काय आवडते, ते जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करू. काही जुन्या, काही नवीन संकल्पना आपल्या पुढे मांडू. तुम्हाला माहीत असेलच, की २०१५च्या अधिवेशनाचे सूत्र (अधिवेशनाची थीम) "मैत्र पिढ्यांचे" हे आहे.
त्यामुळे मागच्या पिढीला काय आवडते, आणि नवीन पिढीला काय आवडेल, अशा कार्यक्रमांची सांगड घालून हा उत्सव अविस्मरणीय कसा करता येईल, ह्याकडे आमचे विशेष लक्ष असेल.
२०१५च्या अधिवेशनामधे करमणुकीबरोबरच शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक बांधिलकी ह्या गोष्टींचा समावेश करण्याचा आमचा प्रयत्न असेल. येत्या काही दिवसात २०१५ च्या अधिवेशनाचे स्वरूप आम्ही आपल्या समोर घेऊन येऊ.
प्रश्न: मला माझा कार्यक्रम लॉस अँजलिस अधिवेशनात सादर करायची इच्छा आहे. त्यासाठी मी काय करावे?
शैलेश शेट्ये: येत्या काही दिवसात अधिवेशनातील विविध कार्यक्रमांच्या समितीचे स्वयंसेवक आपल्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. त्यामधे कार्यक्रमांविषयी माहिती, त्याची रूपरेषा आणि नियम अशा बाबींचा समावेश असेल. त्याव्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास आपण info@bmm2015.org या ईमेलवर संपर्क करू शकता. संबंधित स्वयंसेवक आपल्याला अपेक्षित असलेली माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.
प्रश्न: जे लोक लवकर देणगी देतील त्यांना कोणत्या खास सवलती मिळतील?
शैलेश शेट्ये: सर्व प्रथम आम्हाला आतापर्यंत ज्या मंडळीनी देणगी दिली, त्यांचे मी बीएमएम २०१५अधिवेशन समितीच्या वतीने विशेष आभार मानू इच्छितो.
अलिकडील अधिवेशनांचा अंदाज घेऊन एक बाब लक्षात आली आहे, की अधिवेशन सर्वतोपरी यशस्वी करायचे असेल, तर उत्तम आर्थिक पाठबळ गरजेचे आहे. आम्ही त्यासाठी आतापासूनच सुरुवात केली आहे. अधिवेशनाच्या देणगी बद्दलची माहिती आणि त्यातून मिळणाऱ्या लाभाची व सवलतींची माहिती bmm2015.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. खास करून जी मंडळी ३१ मार्च २०१४ पर्यंत देणगी देतील, त्यांना विशेष सवलत जाहीर केली आहे. देणगीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही frc@bmm2015.org या ईमेलवर वर संपर्क करू शकता.
प्रश्न: मला अधिवेशनासंबंधी अजून काही प्रश्न असतील तर मी कुणाशी संपर्क साधावा?
शैलेश शेट्ये: तुम्हाला अधिवेशनाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास info@bmm2015.org या ईमेलवर जरूर संपर्क साधा. तुम्हाला अपेक्षित असलेली माहिती योग्य त्या स्वयंसेवकामार्फत आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. तसेच ऑकक २०१५ ह्या फेसबुक पेजवर आम्ही अधिवेशनाच्या तयारीची वारंवार अपडेट्स देत असतो.
आता आपला निरोप घेतो. पुढील वेळी अधिक माहिती घेऊन आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग लवकरच भेटूया.
- आनंद वाळुंजकर, (लॉस अँजलिस, कॅलिफोर्निया)