May, 2014

नमस्कार मंडळी,
सर्व वाचकांना महाराष्ट्र- दिनाच्या शुभेच्छा! एक मराठी माणूस म्हणून ह्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व वाटते, कारण ह्या दिवशी मराठी भाषेला मराठी माणसाला पूर्णपणे स्वत:चे म्हणता येईल असे एक राज्य मिळाले.
भारतात जसे तापमान वाढू लागले आहे, तसे निवडणुकीचेही वातावरण तापू लागले आहे. जवळपास ८० कोटी मतदार मतदान यादीत आहेत, जगातील सर्वात मोठी निवडणूक होते आहे, ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर अमेरिकन प्रमुख प्रवाही-माध्यमाने या घटनेची पाहिजे तशी दखल घेतली नाही, ह्याची खंत वाटते.
गेल्या आठवड्यात कौशल इनामदार, आदित्य ओक, मंदार गोगटे, मुग्धा हसबनीस, जयदीप बागवाडकर अमेरिकेत पोहचले. त्यांचा कौशलक- कार्यक्रमाचा पहिला प्रयोग कनेटिकट मंडळात धूमधडाक्यात झाला.
सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करणारी चांगली गाणी तर ऐकायला मिळालीच, पण त्याचबरोबर संगीतकाराच्या भिंगातून एक वेगळी दुनिया पण बघायला मिळाली. कौशल इनामदार महाराष्ट्रात एक चांगले नवीन संगीतकार म्हणून उदयास येत आहेत. त्याचबरोबर ते मराठीवर तळमळीने प्रेम करणारे विचारवंत, कलावंत आहेत. त्यांनी अनेक जुन्या कवितांना नवीन रचना दिल्या. असे का केले, ह्या प्रश्नावर त्यांचे म्हणणे होते- काहीतरी नवीन करणे हा उन्माद नव्हता, तर परंपरा आजच्या भाषेत समजून घेण्याचा एक डोळस प्रयत्न होता, मायकल नोव्हॅकच्या शब्दांत सांगायचे तर "Tradition lives because young people come along, who catch its romance and add new glories to it." भारतातून एखादा कार्यक्रम आणणे अतिशय कष्टाचे काम असते. पण जेव्हा मंडळांना एक चांगला कार्यक्रम बघायला मिळतो, तेव्हा कष्टाचे चीज झाले असे वाटते.
आमच्या कार्यकारिणीने जेव्हा बृहन्महाराष्ट्र मंडळाचा (बृ. म. मं.) कारभार हाती घेतला, तेव्हा प्रांतिक पातळीवर चार/पाच मंडळांनी एकत्र येऊन कार्यक्रम करावेत, एकमेकांशी ओळखी वाढवाव्यात, या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणजे बृ. म. मंडळाच्या कार्यकारिणीच्या मदतीने पुढील काही आठवड्यात सहा मंडळांमध्ये नाट्यमहोत्सव साजरा होत आहे. त्याचा आपण जरूर लाभ घ्याल, ह्याबद्दल शंका नाही.
मागच्या महिन्यात मी न्यू जर्सी येथे डॉ. मीना नेरूरकर यांचा "स्वरगंगेच्या काठावरती"हा एक दर्जेदार कार्यक्रम बघितला. ह्या कार्यक्रमात कलाकारांनी हृदयनाथ मंगेशकर ह्यांची गाणी गुंफून एक सुंदर नृत्यनाटिका सादर केली. विशेष म्हणजे, यातील अभिनय, नृत्य, दिग्दर्शन, नेपथ्य, लेखन हे सर्व उत्तर अमेरिकेतील हौशी कलाकारांनी सादर केले होते. तरीही व्यावसायिक कार्यक्रम बघतो आहे, असे वाटत होते. उत्तर अमेरिकेतील अशा गुणी कलावंतांना चांगला वाव मिळावा, त्यांना एक चांगले व्यासपीठ मिळावे, म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो. त्यासाठी बृ. म. मं. अधिवेशनाच्या उत्तर अमेरिकन कार्यक्रम समितीने कार्यक्रम स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मंडळामार्फत आपण प्रवेशिका लवकरात लवकर पाठवा, म्हणजे निवडसमितीला योग्य तेव्हढा वेळ देता येईल.
ह्या महिन्याच्या शेवटी डेट्रॉईट व शिकागो येथील मराठी मंडळांस मी भेट देतो आहे. त्या भेटीचा वृत्तांत कळवीनच, तर लवकरच बोलू.
कळावे लोभ असावा.
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com