May, 2014

LAलकारी
मंडळी, हिवाळा संपून आता हळूहळू तापमान वाढू लागलं आहे. दिवसही मोठा होऊ लागला आहे. सर्वत्र फुलांना बहर आला आहे.
या मोसमात दक्षिण कॅलिफोर्नियातील लोक वाइल्ड फ्लॉवर्स (रानटी फुलं) पहायला जातात. मार्चच्या मध्यापासून मेच्या मध्यापर्यंत ही फुलं असतात. अँटीलोप व्हॅली, कार्ल्सबाद ही अशा प्रकारची फुलं पाहण्याची प्रसिद्ध ठिकाणे आहेत. अँटीलोप व्हॅलीत पॉपी रिझर्व आहे. तिथं गेल्यावर जिकडे पहावं तिकडे पॉपी फुलांचा सडा दिसतो. संपूर्ण धरतीच जणु पिवळ्या-केशरी रंगाने रंगली आहे असा भास होतो. लख्ख सूर्यप्रकाशात पॉपीची फुलं नीट उघडतात, परंतु मळभ असला तर मात्र ती बंद होतात. परंतु लख्ख सूर्यप्रकाश ही देवाने दक्षिण कॅलिफोर्नियाला दिलेली देणगी असल्याने, बहुतेक सर्वच दिवशी ही फुलं नीट पाहता येतात.
दक्षिण कॅलिफोर्नियातील वातावरणच असं उत्साही आहे. इथं सध्या फुलांबरोबरच अधिवेशनाच्या कामालाही बहर आला आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेले दोन कार्यक्रम करण्यासाठी लॉस एंज्लिस सिद्ध होत आहे. कौशल इनामदार यांचा कौशल क- आणि तीन (काही ठिकाणी चार) दर्जेदार मराठी नाटकांचा नाट्यमहोत्सव. या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर अमेरिकेत अधिवेशनाचा प्रसार करायचा समितीचा मानस आहे.
आपल्यामध्ये - उत्तर अमेरिकेच्या मराठी समाजात अनेक गुणी कलाकार आहेत. या कलाकारांना आपली कला सादर करायला अधिवेशनाच्या निमित्ताने दर दोन वर्षांनी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध होत असतं. प्रत्येक कलाकाराला या व्यासपीठावर एकदातरी आपली कला दाखवण्याची इच्छा असते. लॉस एंजलिस अधिवेशन समिती आपल्यातील या कलाकारांना आमंत्रण देऊ इच्छिते. प्राथमिकत: मराठी भाषेत सादर केलेल्या विविध प्रकारच्या नृत्य, नाट्य, संगीत आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर करण्यासाठी आता आपण प्रवेशिका भरू शकता. या अधिवेशनात आम्ही मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबर आरोग्यविषयक कार्यक्रम, खाद्यविषयक कार्यक्रम, परिसंवाद, कार्यशाळा (वर्कशॉप) आणि अनेक प्रकारच्या कार्यक्रमांसाठीही अर्ज मागवत आहोत. आपल्याकडे इतर कुठल्याही अभिनव कल्पना असतील तर आम्हाला जरूर कळवा. लॉस एंजलिस ही हॉलिवुडची नगरी असल्याने आम्ही खास मराठी लघुपटही (short films) स्वीकारणार आहोत. काही निवडक लघुपट अधिवेशनात दाखवले जातील. आपण आपला अर्ज अधिवेशनाच्या http://bmm2015.org या संकेतस्थळावर Cultural Activities विभागातील North American Programming RFP या दुव्यावर क्लिक करून भरू शकता. या अर्जामधेच तुम्हाला कार्यक्रमांविषयी मार्गदर्शनपर अधिक माहितीही मिळेल. मुलांचे कार्यक्रम करण्यासाठीही हाच अर्ज भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी NAPC@bmm2015.org या ईमेलवर आपण संपर्क करू शकता.
आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी लिहीत असता. काहीजण वृत्तासाठी लिहितात, काहीजण आपल्या स्थानिक महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिकासाठी लिहितात, तर काहीजण आपआपल्या ब्लॉगवर अथवा मराठी वेबसाइट्स्‌वर लिहितात. अधिवेशन स्मराणिका समितीने आपल्यातील लेखकांना लेख द्यायचे आवाहन केले आहे. आलेल्या लेखातील दर्जेदार लेखांना समिती स्मरणिकेत स्थान देईल. लेख अधिवेशनाच्या मध्यवर्ती संकल्पनेविषयी - मैत्र पिढ्यांचे - याविषयी असतील तर उत्तमच, पण त्याशिवाय इतर विषयांवरही चालतील. इंग्रजीतील साहित्यही स्वीकारले जाईल. मराठी लेख युनिकोडमध्ये टाइप करणे आवश्यक आहे. टाइप केलेले साहित्य sahitya@bmm2015.org वर पाठवावे.
मराठी माणूस आणि संगीत हे अतूट नातं आहे. जर तुम्ही दहा मराठी घरं धुंडाळलीत, तर त्यातला एक तरी तुम्हाला गायक अथवा वादक मिळेल. आपल्यातील गानकौशल्याला वाव देण्यासाठी याही अधिवेशनात सारेगम स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या करण्यासाठी उत्तर अमेरिकेतील १५हून अधिक वेगवेगळ्या मंडळांनी रुची दाखवली आहे. अनेक मंडळांचा त्यांच्या गणेशोत्सव, कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळीच्या कार्यक्रमात सारेगमची प्राथमिक फेरी करण्याचा मानस आहे. आपल्या मंडळातली फेरी कधी आहे, ते जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्थानिक मंडळाशी संपर्क साधावा. ही स्पर्धा मैत्र पिढ्यांचे या अधिवेशनाच्या संकल्पनेनुसार तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या गटात होईल. स्पर्धेच्या प्रवेशिका १ मे पासून स्वीकारल्या जाणार असून, स्पर्धेची अधिक माहिती आणि नियम अधिवेशनाच्या संकेतस्थळावर Cultural Activites > SaReGaMa विभागात पहायला मिळतील.
उत्तर अमेरिकेतल्या मराठी माणसांनी, मराठी माणसांसाठी ह्या अधिवेशनाचा घाट घातला आहे. आपण सर्व अधिवेशनाच्या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद देऊन हे अधिवेशन आपलं आहे हे सिद्ध कराल यात आम्हाला तिळमात्रही शंका नाही. अधिवेशनाबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती http://bmm2015.org वेबसाइटवर मिळेलच. आपल्या इतर कुठल्याही प्रश्नांसाठी आपण info@bmm2015.org या ईमेल-पत्त्यावर अथवा 310-773-5593 या फोन-क्रमांकावर संपर्क करू शकता.
- वैभव पुराणिक (लॉस एंजलिस)