June, 2014

http://24cialisitalia.com/ LAलकारी

निराशेच्या गर्तेत अडकलेल्या एखाद्याला आशेचा एक किरण दिसावा, असं काहीसं नुकतंच भारतामध्ये घडलं. स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसेतर पक्षाला संसदेत पूर्ण बहुमत मिळालं आहे. माझ्या मते भारतीय लोकशाही प्रगल्भ झाल्याची ही निशाणी आहे. १९८४ नंतर एव्हढ्या मोठ्या प्रमाणातील यश कुठल्याही निवडणूकीत कुठल्याही पक्षाला लाभले नव्हते. या निकालामुळे भारताला एक स्थिर सरकार मिळेल आणि छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांकडून राष्ट्रीय गोष्टीत होणारी ढवळाढवळ थांबेल. अमेरिकेतल्या भारतीयांनीही या निकालाचे जोरदार स्वागत केले आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये निवडणूकीचे निकाल पहायला जमलेली गर्दी, त्यांचा जल्लोष आणि तिथे आनंदात केलेले समोसा आणि चहाचे वाटप याविषयी एव्हाना तुम्ही ऐकले असेलच. अमेरिकेतील मुख्य प्रसारमाध्यमांनीही या निकालाची चांगली दखल घेतली आहे. न्यूयॉर्क टाइम्सनेही अग्रलेख लिहून या निकालाचे स्वागत केले आहे. या निकालानंतर भारत आणि अमेरिका संबंधाची एक नवी इनिंग सुरू होईल अशी आपण आशा बाळगायला हरकत नाही.
भारतातली लगबग थांबली असली तरी लॉस एंजलीसमधील मराठी लोकांची मात्र लगबग सुरूच आहे, किंबहुना वाढली आहे. ती लगबग आता पुढच्या वर्षी ५ जुलैलाच थांबेल! अधिवेशनाच्या तयारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दहा मेला अधिवेशनाच्या सुकाणू समितीच्या सदस्यांची आणि सर्व समित्यांच्या अध्यक्षांची बैठक अनाहाइम कन्वेशन सेंटरमध्ये झाली. अधिवेशनाचे संयोजक श्री. शैलेश शेट्ये यांनी या बैठकीत सर्व समिती- अध्यक्षांना मार्गदर्शन केले. या बैठकीत सर्व समित्या जोमाने कामाला लागल्या असून त्यांचे काम नियोजनानुसार सुरू आहे असे आढळून आले.
संगीताची आवड मराठी माणसाच्या रक्तातच असते. आणि म्हणूनच सा रे ग म हा कार्यक्रम अधिवेशनाचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे. दहा हजार मैलावर राहूनही मराठी नाट्यसंगीत आणि भावगीताची आवड आपण जपून ठेवली आहे. इतकंच नव्हे तर पुढच्या पिढीलाही हे दान आपण थोड्याफार प्रमाणात का होईना द्यायचा प्रयत्न करत आहोत. या अधिवेशनाची मुख्य संकल्पना मैत्र पिढ्यांचे हीच आहे. या संकल्पनेला धरूनच या वेळी प्रौढांबरोबरच बाल (६ ते १२) आणि युवा (१३ ते १८) या गटांमध्येही सा रे ग म स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या उत्तर अमेरिकेतील अनेक शहरात होणार आहेत. प्राथमिक फेरीचे रजिस्ट्रेशन सुरु झाले असून ते बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशन समितीच्या संकेतस्थळावर (वेबसाइटवर) (bmm2015.org) करता येईल. वेबसाइटवरील Cultural Activities > Sa Re Ga Ma या भागात आपल्याला सारेगम विषयी अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल. आपल्या जवळची प्राथमिक फेरी न, कुठल्या शहरात होणार आहे ते जाणून घेण्यासाठी saregama@bmm2015.org या पत्त्यावर आम्हाला ईमेल पाठवावी.
पुढच्या पिढीपर्यंत मराठी भाषा पोचवण्यासाठी गेली अनेक वर्षे बृहन्महाराष्ट्र मंडळ मराठी शाळा चालवते आहे. सर्वसाधारणत: संपूर्ण उत्तर अमेरिकेत १००० विदयार्थी वेगवेगळ्या महाराष्ट्र मंडळांनी चालवलेल्या मराठी शाळात मराठी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किड्स अँड टीन समितीने मराठी कथाकथन आणि उभ्या उभ्या विनोद या स्पर्धांचे आयोजन केले आहे. ६ ते १७ वयोगटातील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता ही स्पर्धा खुली आहे. मराठी शाळा आपआपल्या शाळेत या स्पर्धा घेऊन त्याच्या विजेत्यांचे व्हिडीओ अधिवेशन समितीकडे पाठवतील. त्यातील काही स्पर्धकांना अधिवेशनात आपली कला दाखवण्याची संधी दिली जाईल. या स्पर्धेची अधिक माहिती लवकरच वेबसाइटवर उपलब्ध होईल.
उत्तर अमेरिकेतली मराठी कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे कुठल्याही अधिवेशनाच्या अनेक हेतूंपैकी एक हेतू असतो. स्थानिक मराठी कलाकारांना यापेक्षा मोठे व्यासपीठ नाही. त्यामुळेच अनेक कलाकार अधिवेशनात आपली कला दाखवायची संधी मिळावी यासाठी धडपड करत असतात. अधिवेशाच्या उत्तर अमेरिकन कार्यक्रम समितीने यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी समिती अर्ज मागवत आहे. संगीत, नृत्य आणि नाट्य याबरोबरच परिसंवाद, खाद्य विषयक कार्यक्रम, विनोदी कार्यक्रम, कार्यशाळा, मराठी लघुपट इत्यादींसाठीही समितीने आवाहन केले आहे. अधिवेशनाच्या वेबसाइटवर Cultural Activities> North American Programming RFP या दुव्यावर जाऊन आपण अर्ज भरू शकता. लहान मुलांचे आणि युवा पिढीचे कार्यक्रम सादर करण्यासाठीही हाच अर्ज भरणे आवश्यक आहे.
एव्हढ्या मोठ्या प्रमाणावरचा कार्यक्रम आपल्या मदतीशिवाय पार पाडणे शक्य नाही. अधिवेशनासाठी देणगी देऊन आपण करही वाचवू शकता व आपल्या व्ही आय पी सीटही राखून ठेवू शकता.
नावनोंदणी (रजिस्ट्रेशन) चालू व्हायला अजून बराच वेळ आहे. रजिस्ट्रेशनपर्यंत थांबल्यास पुढची किंवा मधल्या विभागातील सीट मिळणे फारच कठीण आहे. म्हणूनच आपले क्रेडिट कार्ड वापरून लवकरात लवकर देणगी द्या. क्रेडिट कार्डाने देणगी देऊन आपण कॅशबॅक अथवा माइल्सही मिळवू शकता. या वेबसाइटवर देणगीचा किती भाग करमुक्त आहे याचीही माहिती आपल्याला मिळू शकते. क्रेडिट कार्डाव्यतिरीक्त चेक पाठवायचा असेल तर त्याचीही माहिती अधिवेशनाच्या वेबसाइटवरील Sponsors and Donors > donate विभागात मिळेल.
हे अधिवेशन आपल्यासाठी असून ते आपल्या सहभागाशिवाय यशस्वी होणार नाही. आपण आपल्या सूचना आम्हाला info@bmm2015.org किंवा ३१०-७७३-५५९३ या फोन नंबरवर संपर्क करून देऊ शकता. त्या व्यतिरिक्त वर उल्लेख केलेल्या कुठल्याही उपक्रमाविषयीची माहिती आपल्याला वरील ईमेल अथवा फोन क्रमांकावर मिळू शकेल.

- वैभव पुराणिक (लॉस एंजलिस)