July, 2014

नमस्कार मंडळी,
सॉकर म्हणजे खरा अमेरिकन खेळ नाही, स्कोर-लेस गेम आहे, इतका वेळ खेळून ड्रॉ कसा होऊ शकतो... अशी चर्चा अमेरिकेत बऱ्याचदा ऐकायला येते. पण ह्यावेळी मात्र वेगळीच परिस्थिती जाणवते आहे. अमेरिका आणि अमेरिकेत सॉकर जिंकतो आहे, मोठ्या संख्येने लोक दूरदर्शनवर सॉकर बघत आहेत, कधी नव्हते इतक्या विक्रमी संख्येने अमेरिकन क्रीडारसिक सॉकर स्टेडियममधे दिसत आहेत, माहितीप्रसारणाच्या प्रमुख माध्यमांच्या चर्चेतही सॉकर येऊ लागला आहे. माझा १० वर्षाच्या मुलगा सॉकरचा मोठा चाहता आहे. त्याच्याबरोबर आमच्या टाउनने आयोजित केलेल्या दूरदर्शनच्या मोठ्या पडद्यावर गांवातील लोकांबरोबर हा गेम बघायला वेगळीच मजा आली. एकंदरित, जगाला सध्या सॉकरने झपाटले आहे. हे वृत्त तुमच्या हातात येईपर्यंत कदाचित २०१४चा सॉकर- जगज्जेता देश ठरलेला असेल.
जून महिन्याची सुरुवात अतिशय धावपळीत गेली. मी व बृहन्महाराष्ट्र मंडळ (बृ. म. मं.) - अधिवेशनाचे संयोजक शैलेश शेट्ये ह्यांनी मिळून डेट्रॉईट व शिकागो येथील मंडळांना भेट दिली. डेट्रॉईट मंडळातील कलाकारांनी पाच-सहा महिने तयारी करून भव्य-दिव्य असे रणांगण नाटक बसवले. कलाकारांचा अभिनय, नाटकाचे नेपथ्य, संगीत आणि दिग्दर्शन बघून उत्तर अमेरिकेतील मराठी कलाकारांच्या गुणवत्तेबद्दल सार्थ अभिमान वाटला. ते नाटक इतर मंडळांतही व्हावे, ह्यासाठी बृ. म. मंडळाची कार्यकारिणी सहकार्य करेल.
डेट्रॉईटमधील एका देणगीदारांना आम्ही अधिवेशनासाठी देणगीसंबधीच्या वेगवेगळ्या पॅकेजबद्दल माहिती देत होतो. त्यावेळी ते म्हणाले, तुम्ही सर्व मंडळी मराठी संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी कष्ट घेत असता, तेव्हा तुम्हाला दाद द्यावी म्हणून, आम्हाला परवडेल तेवढी देणगी देत असतो, चांगले पॅकेज मिळते म्हणून नव्हे! अशा विचारांची माणसे भेटली, म्हणजे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा हुरूप वाढतो. डेट्रॉईट मंडळाचे अध्यक्ष शार्दूल आठल्ये, माजी अध्यक्ष किरण इंगळे, बृ. म. मंडळ कार्यकारिणी सदस्य अंजली अंतुरकर ह्या सर्वांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल मन:पूर्वक आभार. शिकागो मंडळाच्या कार्यकारिणीनेही अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन; अध्यक्ष केदार नावकल, माजी अध्यक्ष विद्या जोशी, सर्व सहकारी आणि बृ. म. मंडळ कार्यकारिणी सदस्य नितीन जोशी ह्यांचे विशेष आभार.
शिकागो मंडळाच्या भेटीत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संस्थापकांपैकी एक सौ. जयाताई हुपरीकर व शंकरराव हुपरीकर ह्यांना भेटून विशेष आनंद झाला. बृ. म. मंडळ स्थापन करतांना संस्थापकांना कसे अडथळे येत होते, व ते त्यांनी मोठ्या शिताफीने कसे दूर केले, हे जयाताईंशी बोलताना कळले. त्यांच्या ह्या कामगिरीमुळे व अनेकांच्या योगदानामुळे बृ. म. मंडळाची वाटचाल प्रगतीपथावर चालू आहे.
मोठ्या अभिमानाने सांगावेसे वाटते की, ह्या वर्षी २० मंडळातील जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी मराठी शाळेची परीक्षा दिली, व एका शालेय वर्षाची चांगली सांगता केली. आमच्या कार्यकारिणीने भारतातील तीन कार्यक्रमांसाठी कलाकारांचा दौरा आयोजित करण्याचा प्रस्ताव मंडळांपुढे मांडला आहे. त्याला जास्तीतजास्त मंडळे प्रतिसाद देतील, अशी मी आशा करतो.
बृ. म. मंडळाच्या आगामी अधिवेशनाला एकच वर्ष राहिले असून, लॉस अँजलिसच्या कार्यकर्त्यांच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. अधिवेशनासाठी लागणाऱ्या निधीसंकलनाचे ध्येय आम्ही साध्य करत आहोत, परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणखी चांगले करू शकू, याबद्दल शंका नाही.
आपला लोभ असाच राहू द्या. लवकरच बोलूयात.
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com