July, 2014

LAलकारी

सध्या साऱ्या जगाला एका साथीने घेरलंय. या साथीची दोन नावं आहेत. सारं जग याला फुटबॉल म्हणून ओळखतं पण आपण मात्र याला सॉकर म्हणतो! गेले चार वर्ल्ड कप मी अमेरिकेत काढले असले, तरी या वर्ल्डकपचा उत्साह काही औरच आहे. अमेरिकेला खरा फुटबॉल म्हणजे काय ते हळूहळू कळतंय. अमेरिकन टीम आता च, पहिल्या ग्रुपमधून पार होऊन पुढच्या १६मध्ये जाण्याचं स्वप्न पाहते आहे. हा लेख हातात वाचेपर्यंत तुम्हाला अमेरिकेचं भवितव्य कळलं असेलच. या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत इतके धक्कादायक निकाल लागले आहेत, की अमेरिकन टीम क्वार्टर फायनलपर्यंत पोचली, तरी आश्चर्य वाटायला नको! ती तिथपर्यंत पोचो हीच आमची सदिच्छा. आणि समजा तिथपर्यंत गेली नाहीच, तरी मराठी फुटबॉल शौकीन फुटबॉल पार्ट्या करण्यापासून मागे अजिबात हटणार नाहीत! ब्राझिल, जर्मनी, नेदरलँड्स् अशा कुणाला न कुणाला तरी पाठिंबा देण्यासाठी पार्टी करूच!
लॉस एंजलीसमधील या पार्ट्यांमध्ये फुटबॉलव्यतिरिक्त अजूनही एक विषय चर्चिला जातोय- तो म्हणजे येऊ घातलेल्या अधिवेशनाचा! फुटबॉल फिवर बरोबर अधिवेशन फिवरही आता वर चढतोय! बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन समिती लॉस एंजलसीमध्ये महाराष्ट्र मंडळ लॉस एंजलीसच्या सहकार्याने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. अधिवेशनाच्या निधीउभारणीसाठी ७ आणि ८ जून रोजी लॉस एंजलीसमध्ये नाट्यमहोत्सव पार पडला. भारतातून आलेल्या प्रसिद्ध कलाकारांच्या नाटकांबरोबरच लॉस एंजलीसमधील हौशी कलाकारांनीही आपल्या एकांकिका या नाट्यमहोत्सवात सादर केल्या. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या ह्या एकांकिकाही लोकांच्या पसंतीला उतरल्या.
या नाट्यमहोत्सवाच्या निमित्ताने अधिवेशनाचे समन्वयक शैलेश शेट्ये आणि उपसमन्वयक अजय दांडेकर यांनी शिकागो, डेट्रॉईट आणि सिअ‍ॅटलमधल्या मंडळांना भेट देऊन उपस्थितांना अधिवेशनाचे आमंत्रण दिले. अधिवेशनाच्या मार्केटिंग समितीने नुकतीच अधिवेशन गीत स्पर्धा जाहिर केली आहे. या स्पर्धेअंतर्गत उत्तर अमेरिकेतील संगीतप्रेमींनी अधिवेशनाच्या मुख्य संकल्पनेवर - मैत्र पिढ्यांचे - मराठी गीत रचून, संगीतबद्ध करून, त्याचे ध्वनिमुद्रण करून पाठवायचे आहे. निवडलेल्या गीताचे अधिवेशनात अनावरण होईल व अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठीही हे गाणे वापरले जाईल. ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतील सर्वांसाठी खुली आहे. या गीताचे शब्द व रचना संपूर्णपणे नवीन असणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारच्या स्वामित्वह,चा भंग आपण पाठवलेल्या गाण्यात नसावा. इच्छुक व्यक्ती अथवा गटांनी spardha@bmm2015.org ह्या ईमलवर आपण रचलेल्या आणि ध्वनिमुद्रित केलेल्या गीताची फाइल पाठवावी.
उत्तर अमेरिकेतील नृत्य कलाकारांसाठी अधिवेशनाच्या उत्तर अमेरिका कार्यक्रम समितीने नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सहा ते सोळा जणांच्या गटासाठी आहे. प्रत्येक स्पर्धकाचे वय १४च्या वर असणे आवश्यक आहे. हे नृत्य अधिवेशनाची मुख्य संकल्पनेशी - मैत्र पिढ्यांचे - निगडित असणे आवश्यक आहे. इच्छुक गटांनी आपल्या नृत्याचा व्हिडीओ अधिवेशन समितीला पाठवायचा आहे. त्यातून निवडलेल्या गटांना अधिवेशनात आपले नृत्य सादर करायची संधी मिळेल. अधिवेशनाच्या वेबसाइटवरील Cultural Activities > Dance Competition विभागात या स्पर्धेविषयी अधिक माहिती मिळू शकेल.
अधिवेशनाची सर्वसाधारण नावनोंदणी अजून सुरू झाली नसली, तरी देणगी देऊन आपण पुढची व्हिआयपी सीट राखून ठेवू शकता. व्हीआयपी सीट बरोबरच देणगीमुळे आपल्याला कर सवलतही मिळेल. अधिवेशनाच्या वेबसाइटवर क्रेडिट कार्डाने देणगी देण्याची सोय आहे. देणगी देण्यासाठी वेबसाइटवरील Donors/Sponsors विभागाला भेट द्यावी.
अधिवेशनासंबधित विविध स्पर्धा आणि उपक्रमांविषयी माहिती आपल्याला http://bmm2015.org या वेबसाइटवर मिळेलच. परंतु अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण समितीबरोबर info@bmm2015.org या ईमेलवरही संपर्क साधू शकता. आपल्या सूचना आणि शंका आपण या ईमेलवर पाठवू शकता. आपल्या सर्व सूचनांची दखल त्वरित घेतली जाईल. आपल्या सहभागावरच अधिवेशनाचे यश अवलंबून आहे. आपण अधिवेशन संबंधित विविध उपक्रमांना भरघोस प्रतिसाद द्याल, अशी आमची खात्री आहे.

- वैभव पुराणिक (लॉस एंजलिस)