Aug, 2014

LAलकारी

आता उन्हाळ्याचा आनंद सर्व अमेरिकावासी घेत आहेत. शाळांनाही या दिवसांत सु- असल्याने बऱ्याच मंडळींनी प्रवासाचे कार्यक्रमही आखले असतील. गेल्या महिन्यात फुटबॉल विश्वचषकाचा जल्लोष संपला आणि आता अमेरिकन फुटबॉलची तयारी सर्व संघ करू लागले आहेत. आमच्या लॉस अँजलीसमधे नॅशनल फुटबॉल लीग (NFL) चा संघ जरी नसला तरी मराठी भाषकांचा सुपरबॉल अर्थात बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन जुलै २०१५ मधे आमच्याकडे होणार आहे. आणि त्याची जय्यत तयारी विविध समित्या करत आहेत.
कन्व्हेन्शन सेंटरजवळ असलेल्या ४ मोठ्या हॉटेल्सबरोबर करार पूर्ण झाले आहेत. उत्तर अमेरिकेतील तसेच भारतातील सर्व पिढ्यांना आवडतील असे उत्तम दर्जेदार कार्यक्रम निवडण्याचे कामही चालू आहे. त्यांची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोचवू.
उत्तर अमेरिकेतील गायकांना त्यांची कला सादर करण्याची सुवर्णसंधी सारेगम स्पर्धेनिमित्त मिळणार आहे. त्याकरता प्राथमिक फेरीसाठी विविध महाराष्ट्र मंडळांनी तयारी सुरू केली आहे. त्याची यादी पुढीलप्रमाणे: ऑस्टीन मराठी मंडळ, बे एरीया मराठी मंडळ, न्यू इंग्लंड मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ शिकागो, महाराष्ट्र मंडळ डेट्रॉइट, महाराष्ट्र मंडळ लॉस एंजलीस, महाराष्ट्र मंडळ न्यू यॉर्क, मायबोली मेळावा टॅम्पा बे, मराठी भाषिक मंडळ टोरोन्टो, व्हँकूव्हर येथील मराठी सोसायटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, महाराष्ट्र मंडळ कन्सास सिटी, सिअ‍ॅटल मराठी मंडळ आणि युटाह महाराष्ट्र मंडळ सॉल्ट लेक सिटी. तुमच्या जवळच्या मंडळाशी संपर्क साधून तुम्हीही या स्पर्धेत भाग घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ/वेबसाइट:
http://bmm2015.org/convention-activities/saregama/
अधिवेशन गीत-स्पर्धेअंतर्गत उत्तर अमेरिकेतील संगीतप्रेमींनी अधिवेशनाच्या मुख्य संकल्पनेवर - मैत्र पिढ्यांचे - मराठी गीत रचून, संगीतबद्ध करून, त्याचे ध्वनीमुद्रण करून पाठवायचे आहे. इच्छुक व्यक्ती अथवा गटांनी आपण रचलेल्या आणि ध्वनीमुद्रित केलेल्या गीताची फाइल spardha@bmm2015.org या ईमेलवर पाठवावी. या स्पर्धेची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१४ आहे. तसेच अधिवेशनाच्या स्मरणिकेसाठी आपले लेख sahitya@bmm2015.org या ईमेलवर पाठवा. स्मरणिकेच्या लेखांसाठी मुदत ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत वाढवली आहे.
उत्तर अमेरिकेतील कार्यक्रमांचे प्रस्ताव पाठवण्याची मुदत ३० सप्टेंबर, २०१४ला संपत आहे. यात भाग घेण्यासाठी आपल्या कार्यक्रमांची माहिती लवकर पाठवा.
हॉलीवूडजवळ अधिवेशन होत असल्याने कार्यक्रम समितीने यंदा लघुचित्रपटांचा विभागही ठेवला आहे. तेव्हा उत्तर अमेरिकेतील मराठी दिग्दर्शकांनी यात जरूर भाग घ्यावा. तसेच बालकलाकारांच्या कार्यक्रमांचीही माहिती या मुदतीपर्यंत पाठवावी.
अधिवेशनाला उपस्थित रहाण्यासाठी सर्वसाधारण नांवनोंदणी अजून सुरू झाली नसली, तरी देणगी देऊन आपण पुढच्या खास राखीव जागा /व्हिआयपी सीट राखून ठेवू शकता. व्हीआयपी सीट बरोबरच देणगीमुळे आपल्याला करसवलतही मिळेल. अधिवेशनाच्या संकेतस्थळावर क्रेडिट कार्डाने देणगी देण्याची सोय आहे. देणगी देण्यासाठी वेबसाइटवरील Donors/Sponsors विभागाला भेट द्यावी.
अधिवेशनासंबधित विविध स्पर्धा आणि उपक्रमांविषयी अधिक माहिती http://bmm2015.org या संकेतस्थळावर आहे. तसेच अधिक माहिती मिळवण्यासाठी, आपल्या सूचना सांगण्यासाठी व शंकाचे निरसन करून घेण्यासाठी आपण अधिवेशनसमितीबरोबर info@bmm2015.org या ईमेलवरही संपर्क साधू शकता. आपल्या सर्व सूचनांची दखल त्वरित घेतली जाईल. आपल्या सहभागावरच अधिवेशनाचे यश अवलंबून आहे. अधिवेशनासंबंधित विविध उपक्रमांना आपण भरघोस प्रतिसाद द्याल अशी आमची खात्री आहे.
धन्यवाद,
- समीर सरवटे (लॉस एंजलिस)