Sept, 2014

LAलकारी

गणेशोत्सवाचं स्वरूप मोठं होत आहे. १०००+ सदस्य गणेशोत्सवाला उपस्थित असणे ही निदान मोठ्या मंडळांमध्ये नेहेमीची बाब झाली आहे! अनेक महाराष्ट्र मंडळांनी इतर भारतीय लोकांबरोबर गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे. काही महाराष्ट्र मंडळे संपूर्ण दहा दिवस गणपती ठेवतानाही आढळतात. ज्यांना शक्य आहे अशी मंडळे वाजत गाजत विसर्जनही करतात. लॉस एजंलिसचे मंडळ त्यात अग्रणी आहे.
वेगवेगळ्या शहरात स्थापना होणार्‍या गणरायाकडे वेगवेगळी गार्‍हाणी मांडली जातील. लॉस एजंलिसची मंडळी ह्या वर्षी गणरायाला साकडं घालतील ‍ "आम्ही हातात घेतलेलं काम खूप कठीण आहे. आम्ही ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूच. पण तुझाही आशीर्वाद पाठी असू दे. वेळ जवळ येत चालली आहे. आता दहाच महिने उरले आहेत. हे कार्य नीट पार पडू दे." गणरायाचा आशीर्वाद मिळाल्यावर काय शक्य नाही? आणि कदाचित तो आशीर्वाद पाठीशी आहे म्हणूनच की काय, कार्यकर्ते कामाचे डोंगर उत्साहाने उपसत आहेत.
अशा या उत्साही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि श्रमपरिहार म्हणून २ ऑगस्ट रोजी बेव्हर्ली हिलजवळ सहल व बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कार्यकर्त्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. मंडळाचे अध्यक्ष सचिन सोनटक्के , यांनी उपस्थितांचे स्वागत करून एकंदर रूपरेषा समजावली. अधिवेशनाचे संयोजक शैलेश शेट्ये सहसंयोजक अजय दांडेकर आणि संजीव कुवाडेकर तसेच तसेच सल्लागार शशिकांत पानट, विद्या सप्रे हर्डीकर, गोपाळ मराठे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी या बैठकीत वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांचे वाढदिवसही केक कापून साजरे करण्यात आले. एकंदरीत पूर्ण दिवस भरपूर मजेत गेला. या बैठकीच्या आठवणी अनेक कार्यकर्त्यांच्या मनात बरेच दिवस घोळत राहतील यात शंकाच नाही.
अधिवेशन समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सारेगम स्पर्धेच्या चार शहरातील पात्रता फेर्‍यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ६ सप्टेंबरला ऑस्टिन, २० सप्टेंबरला न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळात, ४ ऑक्टोबरला लॉस एजंलीसमध्ये तर ११ ऑक्टोबरला वॉशिंग्टन डीसीमध्ये सारेगम पात्रता फेर्‍या पार पडतील. इतर शहरांच्या तारखाही लवकरच जाहीर होतील. दरम्यान उत्तर अमेरिकेतील कलाकारांच्या कार्यक्रमांचे अर्ज स्वीकारण्याची अतिंम तारीख जवळ येत आहे. तुम्हाला आपला कार्यक्रम अधिवेशनात सादर करायचा असल्यास तुमचा अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत समितीला मिळणे आवश्यक आहे. या अधिवेशनात प्रथमच समूहनृत्य स्पर्धा असणार आहे. त्यासाठीही प्रवेशिका नोंदवा. बृ. म. मंडळाच्या माध्यमातून विविध शहरांमध्ये मराठी शाळा चालवली जाते. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीही अधिवेशन बालकार्यक्रम समितीने स्पर्धा आयोजित केली आहे. त्याची माहिती खालील दुव्यावर: http://bmm2015.org/cultural-programs/bmm-marathishala/
३०सप्टेंबर ही अधिवेशन गीत स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारायची अतिंम तारीख आहे. आपल्यातील संगीत उपासकांसाठी गीत स्पर्धेच्या रूपाने अधिवेशन समितीने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. मैत्र पिढ्यांचे या अधिवेशनाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित गीत ध्वनीमुद्रित करून आपण अधिवेशन समितीला पाठवायचे आहे. यातून निवडलेले गीत अधिवेशनात वापरले जाईल. या व्यतिरिक्त अधिवेशनाच्या स्मरणिकेसाठीही लेख स्वीकारणे सुरू आहे. अधिवेशनाच्या वेबसाइटवर वेबसाइटवर (bmm2015.org) या सर्व उपक्रमांविषयीची माहिती आहेच. अधिक माहितीसाठी संपर्क: ईमेल: info@bmm2015.org , फोन क्रमांक: 310 - 776 - 5593
अधिवेशनामध्ये चांगली जागा मिळवण्यासाठीचा पर्याय अजूनही खुला आहे. देणगीदारांसाठी खास जागा राखून ठेवलेल्या आहेत. अधिवेशनाला देणगी देऊन चांगली जागा आणि टॅक्स डिडक्शन असा दुहेरी फायदा करून घ्या.
सरते शेवटी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला अधिवेशन समितीतर्फे हार्दिक शुभेच्छा. गणराय आपल्या मनोकामना पूर्ण करो, व आपले आयुष्य सुखासमाधानाने भरो हीच आमची त्याच्या चरणी प्रार्थना.

- वैभव पुराणिक (लॉस एजंलिस)