Oct, 2014

नमस्कार मंडळी,
बृहन्महाराष्ट्र वृत्ताच्या सर्व वाचकांना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीतर्फे दीपावलीच्या शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना भरभराटीचे व समृद्धीचे जावो ही मनःपूर्वक सदिच्छा!
गेल्या महिन्यात आपल्या मायदेशाचे मंगलायान मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले, भारतीय शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही एक मोठी ऐतिहासिक घटना आहे, पूर्णपणे आपल्याच देशात विकसित केलेले तंत्रज्ञान, कमीतकमी खर्चात यान पाठवणारा आणि पहिल्या प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहचणारा भारत हा पहिलाच देश ठरला. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ही महान कामगिरी करून भारताची मान नक्कीच उंचावली.
गेल्या आठवड्यात मला दोन चांगल्या कार्यक्रमांना उपस्थित रहायची संधी मिळाली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ( एम टी डी सी ) आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाने आपला पहिला पथप्रयोग (रोडशो) न्यूयॉर्कमध्ये केला. अजून चार शहरातून अशाच प्रकारचे रोड शो होणार आहेत. १७५ टूर ऑपरेटर्स समोर एम टी डी सी च्या अधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशन दिले. येथील ट्रॅव्हल एजंटनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांमध्ये व उपलब्ध असलेल्या टूर पॅकेजमध्ये रस दाखवला. त्यांच्या प्रतिक्रीयेवरून हा रोडशो यशस्वी झाला असे नक्की म्हणता येईल. न्यू जर्सीच्या इंडीयन कल्चरल ग्रुपच्या कलाकारांनी एक मराठी संस्कृतीवर कार्यक्रमही याच रोडशोमध्ये केला. या कार्यक्रमात एक अमेरिकन कलाकारही होती. तिने बरीच मेहनत करून लावणीचा अभ्यास केला होता. या छोट्याशा उदाहरणावरून आपण मराठी कलांचा प्रसार मराठी माणसांव्यतिरिक्तही प्रसार करत आहोत असे म्हणायला हरकत नाही!
टाइम्स स्क्वेअरचा दीपावली उत्सव यावेळी नेहमीप्रमाणेच भव्य होता. मराठी संस्कृतीचे वेगवेगळे पैलू - कला, खाद्य, पोषाख, खेळ - तिथे लोकांना पहायला मिळाले. मल्लखांब, फेटे, ढोल, मिरवणूक, जिलेबि आणि लावणी इत्यादींना भरपूर गर्दी झाली होती. एम टी डी सीच्या मते या गर्दीचे कालांतराने पर्यटकांमध्ये रुपांतर होईलच पण सध्या तरी आपल्याला महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांविषयी आणि मराठी संस्कृतीविषयी येथील लोकांना माहिती देणे आवश्यक आहे. फिल्ड ऑफ ड्रिन्म या सुप्रसिद्ध चित्रपटात नायक रे किन्सलाला आवाज ऐकू येतो - 'if you build it, he will come'. एम टी डी सीला एक आवाज ऐकू येतोय - "If you spread the word, he will come"!
भारताचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदींच्या स्वागतासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाला वेलकम पार्टनरचा बहुमान मिळाला. टेनेसीपासून ते कॅनडा पर्यंत अनेक मराठी लोकांचा ह्यात सहभाग होता. नरेन्द्र मोदींनी त्यांचा नेहमीच्या शैलीत प्रेक्षकाना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला लोकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत होता, २०,००० टाळ्यांच्या कडकडटाने मॅडिसन स्क्वेअर गार्डन दणाणून सोडले होते. अमेरिकन भारतीयांना व्हिसा व इतर कागदपत्रे सोयीस्करपणे मिळतील आणि एकंदरीतच भविष्यात उत्तम सेवा मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले.
अनेक मराठी मंडळात मराठी शाळा सुरू झाली आहे, तुम्ही जर तुमच्या मुलांची या शाळेत नोंदणी केली नसेल तर अजूनही करू शकता.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०१५ अधिवेशना चे गोल्ड स्पॉन्सर एक्सलेंन्स शेल्टर ह्या कंपनीचे चेअरमन नरेश भर्डे यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेट झाली. "मला स्वत:ला मोठे स्वप्न बघायला आवडते. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची माझी तयारी असते व मी ती घेत असतो." अश्या साध्या शब्दात त्यांनी आपले विचार मांडले. त्यांना अगदी थोड्याच कालावधीत व्यवसायत प्रचंड यश मिळाले ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायक आहे.
मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की दसऱ्याच्या मुहूर्तवार बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या महोत्सवासाठी ओर्‌लँडो व वॉशिंग्टन डीसी ला भेट देतो आहे, त्याचा सविस्तर वृत्तांत पुढील महिन्याच्या वृत्तात आपण जरूर वाचा. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !!
कळावे लोभ असावा,
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ)
suryawanshi@yahoo.com