Oct, 2014

cigarette online usa LAलकारी

नवरात्र आता संपायला आले आहे. नुसत्या गुजरातमध्येच नव्हे तर अमेरिकेच्याही अनेक शहरात गरबा आणि दांडीयाला रंग भरला आहे. दसरा जवळ आला आहे. दिवाळीचीही चाहूल लागू लागली आहे. दिवाळीपाठोपाठ घरोघरच्या मुलांची हॅलोविनची तयारीही जोरात सुरु झाली आहे. तिकडे भारताचे मंगळयान आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत भ्रमण करु लागले आहे. आपण हा लेख वाचेपर्यंत भारताचे पंत्रप्रधान श्री नरेंद्र मोदी आपली पहिली वहिली अधिकृत अमेरिकाभेट संपवून भारतात परतही गेले असतील. या दौऱ्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांना भारतामध्ये गुंतवणूक करण्याविषयी आवाहन केले आहे. मसाल्यापासून मंगळयानापर्यंत कुठलीही गोष्ट आम्ही अगदी कमी खर्चात बनवू शकतो असे ते इथल्या उद्योजकांना सांगून गेले आहेत.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यानही भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध वाढावेत यासाठी आपण प्रयत्नशील असतो. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला अशा प्रकारच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. अशा एका संधीचा लाभ एका मराठी उद्योजकानी घ्यायचा ठरवला आहे - त्यांचं नाव डॉ. नरेश भर्डे. पुण्याच्या एक्सलन्स समूहाचे ते अध्यक्ष आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशन समितीने या लॉस एंजलिसच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात एक्सलन्स समूहाला २०१५ अधिवेशनाचे सुवर्ण प्रायोजक म्हणून जाहिर केले! एक्सलन्स समूहामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या असल्या तरी त्यातील एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमीटेड ह्या कंपनीच्या कामात उत्तर अमेरिकेतील अनेक मराठी मंडळींना रस असू शकेल. या कंपनीने पुण्याजवळ अनेक प्लॉट विकसित करून विक्रीस काढले आहेत. या प्लॉटमध्ये बंगले उभे करून त्यात अद्ययावत सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. क्रिसील या भारतातील क्रेडीट रेटींग कंपनीने एक्सलन्स शेल्टर्सच्या या प्रकल्पाला पंचतारांकीत मानांकन देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आपल्यातील काही जणांना भारतात गुंतवणूक म्हणून तर काही जणांना रिटायरमेंटमध्ये भारतातील घर म्हणून या बंगल्यांचा उपयोग होऊ शकतो. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी www.excellenceshelters.com या संकेतस्थळावर भेट द्यावी अथवा ९१ ८८८८३ ५५५५९ या फोनवर संपर्क करावा.
दरम्यान अधिवेशनाच्या हालचालींना नुसत्या लॉस एंजलीसमध्येच नव्हे तर संपूर्ण उत्तर अमेरिकेत वेग आला आहे. सा रे ग म या लोकप्रिय स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या नुकत्याच ऑस्टिन आणि बॉस्टन येथे यशस्वीरित्या पार पडल्या. या फेऱ्यांच्या यशाचे श्रेय ऑस्टिन महाराष्ट्र मंडळ आणि न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळालाच द्यावे लागेल. ऑस्टिनमध्ये मुलांच्या फेरीत इला जोशी आणि युवा फेरीत आदित्य परुळेकर विजयी झाले. मोठ्यांच्या फेरीत देवकी पांडे आणि केतन मारबल्ली विजयी झाले. बॉस्टनमध्ये मुलांच्या फेरीत निमिश कुंटे तर युवा फेरीत अद्वैत नेने विजयी झाले. मोठ्यांच्या फेरीत शैलेश सलगर, राधिका जंगी आणि अश्विनी परांजपे विजयी झाले. सर्व विजेत्यांचे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशन समितीतर्फे हार्दिक अभिनंदन! ऑक्टोबर महिन्यात डेट्रॉईट, वॉशिंग्टन डीसी, व शिकागो मंडळांमध्ये प्राथमीक फेर्‍या होणार आहेत. तर या परिसरात रहाणार्‍या गायकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
अधिवेशनाचे संयोजक शैलेश शेट्ये यांनी नुकताच न्यू जर्सीचा दौरा केला. मराठी विश्वच्या गणपतीला त्यांनी अधिवेशनासाठी साकडे घातले. अधिवेशनाचे सहसंयोजक अजय दांडेकर आणि सुकाणू समितीचे सदस्य समीर सरवटे यांनी सॅन फ्रान्सिस्को बे एरीआला भेट दिली. या भेटीत त्यांना लॉस एंजलिसबाहेरही अधिवेशनाबद्दल असलेली भरपूर उत्सुकता पहायला मिळाली.
’मैत्र पिढ्यांचे’ ही या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना आहे हे एव्हाना तुम्हाला माहिती झाले असेलच. उत्तर अमेरिकेत मराठी लोकांच्या अनेक पिढ्या नांदत आहेत. या वेगवेगळ्या पिढ्यांनी जपलेल्या मराठी संस्कृतीचा हे अधिवेशन म्हणजे एक उत्सव असेल. एकाच घरातल्या अशा वेगवेगळ्या पिढ्या एकत्र आल्याचे क्षण आपल्यापैकी अनेकांनी कॅमेरात टिपून ठेवले असतील. हे क्षण आम्हाला हवे आहेत. आपण पाठवलेल्या फोटोपैकी निवडक फोटो आम्ही अधिवेशनाच्या फेसबुक पेजवर टाकू. हे फोटो आपण आम्हाला info@bmm2015.org या इमेलवर पाठवू शकता.
अधिवेशन जवळ येत चालले आहे. आपल्यापैकी अनेकांना अधिवेशनाबद्दल प्रश्न असतील. यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अधिवेशनाच्या bmm2015.org या संकेतस्थळावर मिळतीलच. इतर प्रश्न आणि सूचनांसाठी आपण आमच्याशीinfo@bmm2015.org किंवा ३१०-७७६-५५९३ या फोनवर संपर्क करू शकता.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशन समितीच्या वतीने आपणास दसरा आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येती दिवाळी आपल्या आयुष्यात सुखसमाधानाचे दिप लावो हीच आमची सदिच्छा.

- वैभव पुराणिक ( लॉस एंजलिस, कॅलिफोर्निया)