Nov, 2014

LAलकारी

४ नोव्हेंबर या दिवसाचे महत्व मी आपल्याला सांगायला नको. या दिवशी जगातील सर्वात जुन्या लोकशाहीचे नागरीक मतदान करून आपले कर्तव्य पार पाडतील. अलिकडेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील दोन राज्यांमधील लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात कैक वर्षांनी पहिल्यांदाच कुठल्याही एका राजकीय पक्षाला १०० हूनही अधिक जागा मिळाल्या आहेत. चौरंगी अथवा पंचरंगी लढत झाल्याने एका पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी राज्यातील लोकांचा कल भारतीय जनता पक्षाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अंक आपल्या हातात पडेपर्यंत महाराष्ट्रात भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी सत्ताग्रहणही केले असेल. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचे देशामधील क्रमांक १ चे स्थान डळमळीत झाले होते. हे स्थान पुन्हा स्थिर करण्याचे काम नवीन सरकार करो हीच आमची प्रार्थना.
इकडे लॉस एंजलीसमध्ये अधिवेशनाच्या हालचालींना चांगलीच गती मिळाली आहे. अधिवेशन समितीने भारतातील सुप्रसिद्ध केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेला आपले ट्रॅव्हल पार्टनर म्हणून घोषित केले आहे. केसरीचे नाव माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्रात सापडणे कठीणच. भारतामधून ज्या लोकांना अधिवेशनाला यायचे आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. त्यांना अधिवेशनासकट सफरीचे अनेक वेगवेगळे पर्याय केसरी उपलब्ध करून देणार आहे. या पर्यायांचा लाभ करून घेण्यासाठी अधिवेशन समिती लकरच आपल्याला केसरीचा फोन नंबर उपलब्ध करून देईल. केसरीबरोबरच झी मराठीबरोबरही अधिवेशन समितीने भागीदारी जाहिर केली आहे. या भागीदारी अंतर्गत झी मराठी अधिवेशनाची प्रसिद्धी करण्यासाठी मदत करेल. अधिवेशनाविषयी खास कार्यक्रमही प्रसारीत करण्याचा झी मराठीचा बेत आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या अनेक उद्दीष्टांपैकी एक उद्दीष्ट म्हणजे उत्तर अमेरिकेच्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे होय. उत्तर अमेरिकेच्या कलाकारांकडून अधिवेशनात कार्यक्रम सादर करण्यासाठी अधिवेशन समितीने प्रवेशिका मागवल्या होत्या. या प्रवेशिका भरण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपली. अधिवेशन समितीने दिलेल्या या हाकेला आपण भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले शतश: आभार!
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात एक्स्पोच्या निमित्ताने अनेक विक्रेत्यांना हजारो लोकांंपर्यंत पोहोण्याची संधी मिळते. एक्स्पोमध्ये आपण आपला बूथ लावून आपली उत्पादने विकू शकता. या व्यतिरीक्त अधिवेशनाच्या वेबसाइट व स्मरणिकेद्वारेही आपण हजारो लोकांपर्यंत पोचू शकता. अधिवेशन समितीने या सर्व माध्यमांना एकत्र करून खास सवलतीची पॅकेजेस जाहिर केली आहेत. अधिवेशनाच्या वेबसाइटवर Convention Activities Expo या विभागात आपल्याला याविषयीची अधिक माहिती मिळेल.
अधिवेशात होणाऱ्या सा रे ग म स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या सध्या उत्तर अमेरिकेतील अनेक शहरातून होत आहेत. ऑक्टोबर महिन्यात डेट्रॉइट आणि शिकागो या शहरांमध्ये प्राथमिक फेऱ्या घेण्यात आल्या. ११ ऑक्टोबरला डेट्रॉइटमध्ये झालेल्या फेरीत सीमा इनामदार, अनघा हुपरीकर, उल्का भिडे आणि अमित देशपांडे विजयी झाले. युवा विभागात गौरी ओक आणि मुलांमध्ये अर्जुन पराडकर व अनुश्री खासगीवाले विजयी झाले. १८ ऑक्टोबरला शिकागोत झालेल्या फेरीत दिव्या खांडेकर पहिल्या क्रमांकावर तर अतुल दिक्षित, राधिका जोशी आणि अनुपमा पंचवाघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आल्या. युवा विभागात आरोही देशपांडे विजयी झाली. मुलांमध्ये अनुष्का देऊलकर हिने पहिला क्रमांक पटकावला. अधिवेशनाच्या फेसबुक पेजवर (www.facebook.com/bmm2015) लवकरच या फेऱ्यांचे व्हिडीओही आपल्याला लवकरच पहायला मिळतील. सर्व विजेत्यांचे अधिवेशन समितीतर्फे हार्दिक अभिनंदन!
मैत्र पिढ्यांचे ही या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना आहे हे एव्हाना तुम्हाला माहिती झाले असेलच. उत्तर अमेरिकेत मराठी लोकांच्या अनेक पिढ्या नांदत आहेत. या वेगवेगळ्या पिढ्यांनी जपलेल्या मराठी संस्कृतीचा हे अधिवेशन म्हणजे एक उत्सव असेल. एकाच घरातल्या अशा वेगवेगळ्या पिढ्या एकत्र आल्याचे क्षण आपल्यापैकी अनेकांनी कॅमेरात टिपून ठेवले असतील. हे क्षण आम्हाला हवे आहेत. आपण पाठवलेल्या फोटोपैकी निवडक फोटो आम्ही अधिवेशनाच्या फेसबुक पेजवर टाकू. हे फोटो आपण आम्हाला info@bmm2015.org या इमेलवर पाठवू शकता.
२०१४ वर्ष संपत आले आहे. अधिवेशनाचसाठी देणगी देऊन करसवलत तर मिळेलच, पण त्याशिवाय मधली व पुढची सीटही मिळेल. एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची ही संधी फार काळ उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे आताच देणगी देऊन आपली चांगली सीट राखून ठेवा. अधिवेशनच्या वेबसाइटवर - bmm2015.org वर क्रेडीट कार्डाने देणगी देण्याची सोय आहे. या संदर्भात अथवा इतर कुठल्याही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण info@bmm2015.org या इमेलवर अथवा ३१०-७७६-५५९३ या फोनवर संपर्क साधू शकता.

वैभव पुराणिक, लॉस एंजलीस.