Dec, 2014

LAलकारी

हिवाळ्याची सुरुवात होत आहे. खरं तर हिवाळा २१ डिसेंबरला चालू व्हायचा, पण यावेळी तब्बल एक महिना आधीच हिवाळ्याने ठाण मांडले आहे. न्यूयॉर्क राज्यात हिमवादळाने बफेलो आणि आसपासच्या भागाला नोव्हेंबरमध्येच बर्फात बुडवून टाकलं आहे. खरं तर दक्षिण कॅलिफोर्नियात बसून उत्तरेतील अडचणींची कल्पना करणं कठीणच आहे, पण तरीही आमच्या सदिच्छा उत्तरवासीयांबरोबर आहेत. या हिवाळ्यात उत्तरेतील लोकांनी सुरक्षित रहावं हीच आमची सर्वात मोठी इच्छा आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१५चे अधिवेशन ३ जुलैला सुरू होते आहे हे एव्हाना सर्वांना माहीत असेलच. परंतु २ जुलैला मराठी व्यवसाय परिषद आणि CME परिषदेबरोबरच यावर्षी उत्तररंग परिषदही आयोजित करण्यात येणार आहे. मराठी समाजात ५५ वर्षाच्या पुढील लोकांची संख्या वाढत आहे. उत्तर आयुष्याबद्दलचा विचार, जिव्हाळ्याच्या अनेक गप्पा मारण्यासाठी उत्तररंग परिषदेच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. अधिवेशनाच्या नोंदणी पत्रकात (Registration Form) उत्तररंग परिषदेसाठी नोंदणी करण्याची सोय असेल.
अधिवेशनासाठीची सर्वसाधारण नोंदणी १ जानेवारी २०१५ ला सुरू होईल. परंतु देणगीदारांसाठीचे हॉटेल बुकिंग मात्र १ डिसेंबरपासून चालू होणार आहे. अधिवेशन समितीने हिल्टन अॅनाहाईम, अॅनाहाईम मॅरीयट आणि क्लॅरीयल हॉटेल अॅनाहाईम रिसॉर्ट या हॉटेलांबरोबर कंत्राट पक्के केले आहे. अधिवेशन समिती हॉटेल बुकिंग संदर्भात लवकरच देणगीदारांशी संपर्क साधणार आहे. सर्वसाधारण नोंदणी करणाऱ्यांसाठीचे हॉटेल बुकिंग मात्र १ जानेवारीला सुरू होणार आहे.
अधिवेशनात कार्यक्रम सादर करण्यासाठी संपूर्ण उत्तर अमेरिकेतून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. इतक्या छान कार्यक्रमातून अधिवेशनासाठी कार्यक्रम निवडणे खूपच कठीण काम आहे. अधिवेशन समितीने निवडीचे काम सुरू केले आहे, परंतु ते संपून आपल्यापर्यंत निकाल लागण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार आहे. भारतातून येणारे महत्त्वाच्या कार्यक्रमाची घोषणाही डिसेंबर महिन्यात अपेक्षित आहे. अधिवेशनाच्या वेबसाइटवर यासंदर्भातील घोषणा केल्या जातील.
२०१४ साल संपत आलं आहे. अधिवेशनाचे काम करता करता हे वर्ष कसं सरलं ते कळलंच नाही. अधिवेशनासाठी देणगी द्यायची वेळ अजूनही गेलेली नाही. देणगी देऊन आपण २०१४ सालासाठी करसवलत मिळवू शकता. करसवलतीबरोबर चांगल्या सीट आणि इतरांच्या आधी हॉटेल बुकिंगही मिळवू शकता. तेव्हा त्वरा करा, आणि अधिवेशनाच्या संकेतस्थळाला - bmm2015.org - भेट द्या. आपले प्रश्न आणि सूचना आपण आम्हाला info@bmm2015.org या इमेलवर अथवा ३१०-७७६-५५९३ या फोन नंबरवर कळवू शकता.
-
वैभव पुराणिक, लॉस एंजलीस.