Jan, 2015

नमस्कार मंडळी,
एखाद्या गोष्टीचा निश्च्यय केला व ते काम करण्यासाठी कामाची तयारी दाखवली, तर त्या अवघड कामात यश जरूर मिळते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे टोरांटो येथील "कला संस्कृती संमेलन". ८ महिने जय्यत तयारी नंतर त्यांनी दोन दिवसाचे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडले. ह्या कार्यक्रमात बृहन्महाराष्ट्र मंडळाचा (बृ. म. मं .) अध्यक्ष या नात्याने मी हजर राहिलो. टोरांटो भाषिक मंडळाच्या अध्यक्षा लीना देवधरे व चिटणीस नमिता दांडेकर, व सर्व कार्यकारिणी यांनी कार्यक्रमाचे अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केले होते. एक चांगले व नवीन लेखक / निर्माता अशी ख्याती असलेले योगेश सोमण यांची दोन नाटके, व शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाचे एक अशी तीन नाटके बघायला मिळाली. सर्व नाटके सद्यकालीन सामाजिक विषयांवर आधारित होते, कथानक हृदयस्पर्शी व रोमांचकारी होते. रीमा लागू, योगेश सोमण व त्यांचे सहकारी यांचा अभिनय बघायला मजा आली. त्याचबरोबर राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे प्रस्तुत संगीत कार्यक्रम - नाट्य रंग आणि अभंगरंग उच्च गुणवत्तेचा होता. बृ. म. मंं. च्या 'सारेगम' ची टोरांटोमधील प्राथमिक फेरीची स्पर्धा खरोखर स्पर्धात्मक होतीच, पण त्याच बरोबर स्पर्धकांनी सादर केलेली गाणी ऐकण्यातही मजा होती. हया कार्यक्रमाच्या निमित्ताने, कॅनडामधे ओंटारिओ राज्यातील मंत्री- पण पुण्याला न विसरलेले अस्सल पुणेकर, अशा दीपिका डॅमेरला यांच्याबरोबर स्टेज शेअर करण्याचाही एक बहुमान मिळाला.

बृ. म. मं. आयोजित केलेल्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या आयुष्यावर आधारित मराठी सिनेमाला मंडळांकडून अजूनही चांगली मागणी आहे. ह्या सिनेमाबरोबरच आम्ही आमटेंच्या 'हेमलकसा' येथील प्रकल्पासाठी निधीसंकलन आयोजित केले, त्यालाहि अनेक मंडळांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, हा जमलेला निधी भारतात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र फौंडेशनच्या कार्यकारिणीचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. ह्या चित्रपटाच्या निर्मात्या समृद्धी पोरे ह्यांच्या गप्पांचा कार्यक्रम सहा मंडळांमधे झाला, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या स्थानिक मंडळाने आयोजित केल्यामुळे मलाही हा चित्रपट बघायला मिळाला, अमेरिकेत हॉलिडेज़ म्हणजे 'गिविंग टाइम', यंदा त्यानिमित्ताने डॉ. आमटेंच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी चित्रपट बघायला मिळाला, हे भाग्यच म्हणावे लागेल.
बृ. म. मंडळाच्या २०१५च्या अधिवेशनाबद्दल विशेष सांगायचे म्हणजे ह्या अधिवेशनात पहिल्यांदाच उत्तररंगाची वेगळी परिषद आपण ठेवत आहोत. त्यासाठी 'उत्तररंग' चे कार्यकर्ते अनेक नाविन्यपूर्ण असा चर्चात्मक व माहितीपूर्ण कार्यक्रम करण्यासाठी उत्सुक आहेत. तेव्हा जास्तीतजास्त लोकांनी ह्या परिषदेस उपस्थित रहावे, म्हणजे उत्तररंग परिषदही अधिवेशनाचा एक नियमित कार्यक्रम होईल. ह्याविषयी सविस्तर माहिती ह्या अंकात उपलब्ध आहेच. ती आपण जरूर वाचा.
१४ जानेवारीला मकर संक्रांत. दिवाळीकार्यक्रमानंतर, दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर उत्तर अमेरिकेतल्या विविध मंडळांत संक्रांत साजरी होईल. तुमच्या आमच्यातला स्नेह तिळातिळाने वृध्दिंगत व्हावा हीच संक्रांतीनिमित्त शुभेच्छा.
लवकरच बोलूयात.
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com