Jan, 2015

LAलकारी
आमच्या दक्षिण कॅलिफोर्नियात या वेळचा मोसम जरा वेगळाच आहे. इथे चक्क गुलाबी थंडी पडली आहे. मंडळींनी आपआपले स्वेटर कपाटातून बाहेर काढले आहेत! ५० - ५५ डिग्रीमध्ये आम्ही हुडहुडतो आहोत! कधी नव्हे ते अनेक वर्षांनी पावसानीही हजेरी लावली आहे. अर्थात इथल्या पावसाची आणि मुंबईच्या पावसाची काही तुलना नाही म्हणा. इथला पाऊस म्हणजे फक्त रिपरिप. मुंबईसारखे पावसाचे तांडव इथे दशकातून एखादवेळाच पहायला मिळते. पण या रिपरिपीने डोंगर धुतले गेले आहेत, हवा शुद्ध झाली आहे. कधी नव्हे ते या वाळवंटात हिरवे अंकुर दिसू लागले आहेत. सृष्टी नटून नव्या वर्षाचे स्वागत करत आहे.
अधिवेशन समितीचे सदस्यही या नवीन वर्षात नव्या जोमाने कामाला लागले आहेत. अधिवेशन उण्यापुऱ्या सहा महिन्यावर येऊन ठेपले आहे याची त्यांना जाणीव आहे. संपूर्ण उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळींचे स्वागत करण्यासाठी लॉस एंजलीस नगरी सज्ज होत आहे. या लेखापासून जुलैपर्यंतच्या प्रत्येक लेखात अधिवेशनाचे वेगवेगळे पैलू आम्ही आपल्यापुढे उलगडणार आहोत
या अधिवेशनात भारतातून कुठले कार्यक्रम येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या अधिवेशनाच्या एका रात्रीचे खास आकर्षण अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांचा कार्यक्रम असणार आहे. अवधूत गुप्ते आपल्या सर्वांनाच एक संगीतकार व गायक म्हणून माहीत आहेतच. त्यांनी अनेक गीतेही लिहीली आहेत हे मात्र कमी लोकांना माहित असेल. झी टिव्हीवरच्या प्रसिद्ध सारेगम कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणून आपण त्यांना पाहिले असेलच. परंतु त्याव्यतिरीक्त अष्टपैलू अवधूत 'गुप्ते तिथे खुपते' हा कार्यक्रमही टिव्हीवर करतात. वैशाली सामंत आज नुसत्या मराठीतल्याच नव्हे तर देशातील आघाडीवरील गायिंकांपैकी एक गायिका मानल्या जातात. लगान, ताल आणि साथिया अशा प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी ए. अार. रेहमानच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणी गायली आहेत. त्यांचा आणि अवधून गुप्तेंचा 'ऐका दाजिबा' हा हिंदी गाण्यांचा आल्बम पूर्ण देशात लोकप्रिय झाला आहे. उडत्या चालीच्या गाण्यांपासून हळूवार गाण्यांपर्यंत सर्वच प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. वैशालीनी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत हे आपल्याला कदाचित माहीत नसेल. अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत अधिवेशनातील एक रात्र अविस्मरणीय करतील याबद्दल मला तिळमात्रही शंका नाही.
मराठे ज्वेलर्स हे नाव पुणेकरांना नवीन नाही. पुण्यामध्ये हिरे घ्यायचे असले तर मराठे ज्वेलर्सचे नाव सर्वप्रथम मनात येते. मराठे ज्वेलर्सनी आता बृहन्महाराष्ट्र मंडळ परिवाराबरोबर स्वत:ला जोडायचे ठरवले आहे. येत्या अधिवेशनाचे ब्रॉंझ प्रायोजकत्व त्यांनी घेतले आहे. मराठ्यांचे हिरे घेण्यासाठी आता उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळींना पुण्यापर्यंत जायची आवश्यकता नाही, येत्या अधिवेशनात आपल्याला त्यांच्या बूथला भेट देता येईल.
अधिवेशनाच्या देणगीदारांसाठी अधिवेशन समितीने खास vipservices@bmm2015.org ह्या ईमेलवर सेवा देणे सुरू केले आहे. देणगीदारांसाठी हॉटेल बुकिंगही डिसेंबर महिन्यातच सुरू झाले होते. आपण देणगी दिली असूनही आपल्याशी कोणीही संपर्क साधला नसल्यास वरील ईमेलवर आपण आम्हाला ताबडतोब कळवावे. हा लेख आपल्या हातात पडेपर्यंत अधिवेशनाची सर्वसाधारण नोंदणी सुरू झालेली असेल. चांगल्या जागा मिळवण्याकरता आपण ताबडतोबhttp://bmm2015.org या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून घ्या. नोंदणीविषयी अथवा इतर कुठल्याही प्रश्नांची उत्तरे आपल्याला info@bmm2015.org या ईमेलवर अथवा ३१० ७७६ ५५९३ या फोनवर मिळू शकतील.
आणि सरतेशेवटी, आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो हीच आमची प्रार्थना. ​
- वैभव पुराणिक (लॉस एंजलीस)