Feb, 2015

नमस्कार मंडळी,

यंदा भारतीय प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भारतात प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्यांदाच उपस्थिती होती आणि ही नक्कीच एक महत्त्वपूर्ण घटना होती. बराक ओबामा त्यांच्या भाषणात म्हणाले, अलिकडच्या वर्षांत भारताने कोणत्याही इतर देशांच्या तुलनेत जास्तीतजास्त लोकांना गरिबीतून ओढून काढले आहे, त्यामुळे जगभरातील गरिबी दूर करण्यासाठी भारत व अमेरिकेने एकत्र आघाडी करण्याची एक ऐतिहासिक संधी आहे.

पूर्वी कम्युनिस्ट म्हणत होते, "workers unite the world" आणि आजकाल टेक्नॉलॉजीमुळे, "youth unite the world" असे नरेन्द्र मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. मला त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या माझ्या भारतभेटीत आली. युवाशक्तीमुळे एक वेगळा उत्साह व कुठल्याही प्रश्नाला सामोरे जाण्याची धमक मला तरुणांमधे दिसत होती. मी १४ दिवसात ६ शहरांना भेटी दिल्या. त्याच सुमारास सातारा येथे जागतिक मराठी परिषदेतर्फे "शोध मराठी मनाचा" हे तीन दिवसांचे संमलेन आयोजित केले होते. आणि त्यासाठी मला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलावण्यात आले होते. त्यावेळी श्रम प्रतिष्ठा, वैचारिक स्वातंत्र्य व सामाजिक जाणीव ह्या गोष्टी अमेरिकन माणसाकडून शिकण्यासारख्या आहेत, हे मी उदाहरणासहित सांगितले. त्यावेळी सर्व उपस्थितानांही हे विचार आवडले आणि त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने माझ्या मतास उ्त्स्फूर्त प्रतिसाद दिला.

माझ्या ह्या भारतभेटीत मला राजकीय, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली. ते सर्वजण अधिवेशनात सहभागी होण्यासाठी व सहकार्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बृ.म.मं.) चे सर्व स्वयंसेवक व कार्यकारिणी जे कार्य करतात त्या विषयी भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही फार कौतुक वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांचीही मी भेट घेतली. त्यांनी आपल्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातून मला वेळ देऊन ज्या आपुलकीने बृ.म.मंडळ आणि अधिवेशनाची सखोल माहिती विचारली त्यावरून त्यांना महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असणाऱ्या मराठी माणसांबद्दल असलेली प्रेम भावना मला जाणवली.

लवकरच बृ.म.मंडळ "लोकमान्य- एक युगपुरुष" आणि "रमा माधव" ह्या दोन चित्रपटाचे वितरण उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळांमध्ये करणार आहे, त्या साठी चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. आपल्या मंडळात जर हे चित्रपट प्रदर्शित होणार असतील तर आपण ते जरूर बघावेत.

उत्तर अमेरिकेतील मराठी कुटुंबातील कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी प्रोत्साहनपर पाच स्कॉलरशिप्स देण्याचे बृ. म. मं. ने ठरविले आहे. मुले कॉलेजात जाऊ लागली की मराठी मंडळ आणि त्यांच्यातील अंतर वाढत जाते. ते अंतर आपण नाहिसे करू शकत नाही परंतु ते कमी करण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांत यश मिळेल अशी आशा आहे.

अधिवेशनासाठी ’अर्ली बर्ड रजिस्ट्रेशन’ला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार! लवकरच बोलूयात.

सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com