Mar, 2015

नमस्कार मंडळी,

क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने "ब" गटात चांगलीच मजल मारली आहे. त्यामुळे कधी नव्हे एव्हढा क्रिकेटविषयी उत्साह अमेरिकन भारतीयांमधे दिसू लागला आहे. २०११ सालाप्रमाणे, यंदाही भारताने चषक जिंकावा अशी सगळ्यांची इच्छा आहे.
फेब्रुवारी २७ रोजी साजरा केलेल्या ’मराठी भाषा’ दिवसाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले कुसुमाग्रज, यांच्या कविता मराठी माणसाच्या मनाला नेहमी भावतात. त्यांची "कणा" ही कविता मला नेहमीच आवडते त्यातील चार ओळी -
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
" पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हाथ ठेवून नुसते लढ म्हणा."
मागच्या वृत्तात नमूद केल्या प्रमाणे ’BMM Scholarship’ प्रकल्पास सुरुवात होऊन त्या कामात पुढे चांगली प्रगती होत आहे. त्यासाठी निवडसमितीही नियुक्त केली आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसंबधित कामाचीही चक्रे फिरू लागली आहेत. त्यविषयी आणखी माहिती लवकरच प्रसारित करू.
बृ. म. मंडळाच्या आगामी अधिवेशनाच्या कामासंबधित चर्चेसाठी २८ फेब्रुवारीला, लॉस एंजलीसमधे सर्व समिती- सदस्यांबरोबर झालेल्या बैठकीस मी उपस्थित होतो. जवळपास दीडशेहून अधिक स्वयंसेवक या सभेला हजर होते. त्यातील काहीजण शंभराहून अधिक मैल अंतर ड्राइव्ह करून आले होते. त्यांचा उत्साह आणि कामाविषयी बांधिलकी पाहून अधिवेशनाचे भव्य काम लॉस एंजलीसचे महाराष्ट्र मंडळ समर्थपणे पार पाडेल याची मला नक्कीच खात्री आहे. या सभेत, अधिवेशनाविषयी आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला, आणि काय गोष्टी चांगल्या करता येतील याविषयीही चर्चा केली. चांगले कार्यक्रम, उत्तम जेवण आणि याच बरोबर स्वयंसेवकांमधे आनंदाची आणि उत्साहाची वातावरण- निर्मिती म्हणजे "Disney like experience" किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले.
हॉलीवूड व बॉलीवूड चित्रपट व्यवसायिक यांना एकाच मंचावर आणून त्यांच्यात विचारांचे आदान-प्रदान, नेटवर्किंग/ ओळखी, समन्वय, यासाठी संधी मिळावी म्हणून " एल ए - सिनेमा" हे एक वेगळेच सत्र आयोजित करण्यात येत आहे. याची नावनोंदणी अजूनही सुरू आहे. तेव्हा या नवीन संधीचा जरूर लाभ घ्यावा.
अधिवेशनासाठी जर अजून तुम्ही नाव नोंदणी केली नसेल तर खात्रीशीर जागा मिळवण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करा. चैत्र गुढी पाडव्याच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा! लवकरच भेटूया पुढच्या वृत्तात.

सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com