Mar, 2015

LAलकारी

मंडळी, बहुतेक भारतीयांना आता नवीन स्वप्न पडू लागलं आहे. भारताने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यापासून हा वर्ल्ड कपही आपल्याला जिंकता येईल असे अनेकांना वाटू लागले आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियातील दणदणीत पराभवामुळे आपण जिंकण्याची सुतराम शक्यता नाही असे वाटणारे निराशाजनक वातावरण नाहीसे होऊन आशेचा किरण दिसू लागला आहे. अमेरिकेतील मराठी मंडळीही याला अपवाद नाहीत.

जे लोक क्रिकेटचे शौकीन आहेत त्यांना 'हर्ष भोगले' हे नाव नवीन नाही. प्रतिष्ठित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मधून शिक्षण घेतलेले हर्ष भोगले गेले कित्येक वर्षापासून क्रिकेट कॉमेंटरी करत आहेत. अधिवेशनाच्या अादल्या दिवशी आयोजित केलेल्या बिझनेस सेमिनारमधे हर्ष भोगले यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलवण्यात आले आहे. याच दिवशी - २ तारखेला बिझनेस सेमिनार व्यतिरिक्त डॉक्टरांसाठी कंटिन्युईंग मेडिकल एज्युकेशन, ५५+ लोकांसाठी उत्तररंग आणि संध्याकाळी बँक्वेटचेही आयोजन करण्यात आले आहे. ज्या लोकांना या कार्यक्रमांना जायचे आहे, त्यांनी अधिवेशनाची नोंदणी करण्याच्या फॉर्ममध्ये या कार्यक्रमांना निवडणे आवश्यक आहे. उत्तर अमेरिकेतील मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिवेशनात ’बिझनेस प्लान’ स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयीची अधिक माहिती आपल्याला अधिवेशनाच्या संकेतस्थळावर मिळू शकेल. लॉस एंजलिस हे हॉलिवूडचे माहेरघर. इथल्या अधिवेशनात सिनेमा उद्योगासाठी काही नसेल तरच नवल. सिनेमा उद्योगातील लोकांच्यासाठीही अशाच प्रकारचे ‘एल ए सिनेमा’ हे नेटवर्किंग सत्र २ जुलैला दुपारी १.३० ते ४.३० च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

उत्तर अमेरिकेत जन्म झालेल्या वाढलेल्या तरुण पिढीचे मराठी संस्कृतीशी असलेले नाते अधिक घट्ट व्हावे या हेतूने या अधिवेशनात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. इथे वाढलेल्या पिढीच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणूनही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती लवकर अधिवेशनाच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. उत्तर अमेरिकेतील मराठी तरुण, तरुणींना मराठी जोडीदार निवडण्यासाठी यावेळी प्रथमच आम्ही एका खास वेबसाइटची निर्मिती केली आहे. जे लोक जोडीदाराच्या शोधात आहेत ते www.MingleMangal.com या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. त्यांना या वेबसाइटवरून इतर तरुण, तरुणींना शोधता येईल व त्यांच्याशी संपर्क साधता येईल. या व्यतिरिक्त तरुण पिढीला एकमेकांना भेटता यावं म्हणून या अधिवेशनतात क्रूझ सोशल मिक्सर, क्लब नाइट, बॉलिवूड/हॉलिवूड डान्स, स्पीड डेटिंग (स्नेहबंधन), कूकिंग स्पर्धा आणि व्हरायटी शो अशा- तब्बल सहा कार्यक्रमांची रेलचेल आहे.

या अधिवेशनातील अजून एक अभिनव उपक्रम म्हणजे - नमन (NAMAN) - नॉर्थ अमेरिकन मराठी ऑथर्स नेटवर्क. आपल्यापैकी अनेकांना लिहायला आवडते. काही लोकांचे लिखाण प्रकाशितही झाले असेल. उत्तर अमेरिकेतील लेखनाची आवड असणाऱ्या सर्व लेखकांना जोडणारे नेटवर्क ’नमन’ च्या निमित्ताने तयार होणार आहे. अधिवेशनात यासाठी एक खास सत्र राखून ठेवण्यात आले आहे. या सत्रात भाग घेण्यासाठी आणि ’नमन’ चा हिस्सा बनण्यासाठी आपण आमच्याशी namansachiv@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.

अधिवेशनाच्या ’स्मरणिका’ समितीने यावेळी एक नवीन प्रकारचे प्रायोजकत्व जाहीर केले आहे. आपल्याला स्मरणिकेच्या एका पानाचे प्रायोजक बनता येईल. या प्रायोजकाचे नाव त्या पानावर खाली त्यांच्या एका छोट्या संदेशाबरोबर घातले जाईल. ज्यांना असे प्रायोजकत्व घेण्याची इच्छा आहे, त्यांनी स्मरणिका समितीला smaranika@bmm2015.org या इमेलवर संपर्क करावा.

या अधिवेशनामध्ये भारतातून येणाऱ्या कलाकारांकडून दर्जेदार कार्यक्रम सादर होणार आहेत. बालगंधर्वांच्या गाण्यांचा ‘गंधर्व’ नावाचा एक खास कार्यक्रम राष्ट्रीय पुरस्कार विजेते आनंद गंधर्व (भाटे) आणि आदित्य ओक सादर करतील. ‘गोष्ट तशी गमतीची’ हे अद्वैत दादरकर दिग्दर्शित सुप्रसिध्द नाटकही अधिवेशनात सादर होणार आहे. या नाटकामध्ये आपल्याला ‘होणार सून मी या घरची’ फेम शशांक केतकर आणि सुप्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक मंगेश कदम आणि लीना भागवत यांचा अभिनय पहाण्याची संधी मिळणार आहे. या व्यतिरिक्त ’लग्न पहावे करून’ हा भारतातील स्टार कलाकारांचा एक खास कार्यक्रमही या अधिवेशनात सादर होणार आहे. या कार्यक्रमात ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी, ‘चला हवा येऊ द्या’ फेम भालचंद्र कदम, सागर कारंडे, भरत गणेशपुरे अशा अनेक ताऱ्यांना आपल्याला पहायला मिळणार आहे.

अधिवेशनासाठी नोंदणी करण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. कन्व्हेंशन सेंटरला लागून असलेल्या हॉटेलमध्ये अजूनही जागा शिल्लक आहेत. त्या जागा भरण्याआधी नोंदणी करून घ्या. अधिवेशनाची नोंदणी - http://bmm2015.org या वेबसाइटवर जाऊन करता येईल. अधिवेशनाबाबत कुठल्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्याशी info@bmm2015.org अथवा ३१०-७७६-५५९३ या फोनवर संपर्क साधू शकता. ​​

- वैभव पुराणिक (लॉस एंजलीस)