Apr, 2015

LAलकारी

आला वसंत ऋतू आला,
वसुंधरेला हसवायला,
सजवित नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतू आला

ज्याची वाट आपण सर्व पहात होतो, अशा वसंत ऋतूचे अखेर आगमन झाले आहे. पारा आता हळूहळू वर चढेल. थंडी कुठच्या कुठे पळून जाईल. जिथे पहावी तिथे हिरवी पालवी फुटलेली दिसेल. उन्हाचा जोर वाढेल, संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना लख्ख उजेड असेल. वीकएंडच्या आउटडोअर अॅक्टिव्हिटीज वाढू लागतील. हळूहळू बार्बीक्यूलाही सुरवात होईल. लॉस एंजलीसमधील मराठी मंडळींच्या हृदयाचे ठोकेही हळूहळू वाढू लागतील. अधिवेशन फक्त तीन महिन्यावर आलं आहे, याची जाणीव एव्हाना सर्वांना होऊ लागेल.

या अधिवेशनाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे उत्तर अमेरिकेतील मराठी कलाकारांना आपली कला सादर करायची संधी देणे. संगीत, नृत्य नाटय, विनोद अशा वेगवेगळ्या कलाप्रकारांचे प्रदर्शन करण्यासाठी या कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन उपलब्ध करुन देते. या अधिवेशनातही आपल्याला उत्तर अमेरिकेतील कलाकारांच्या कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील पाण्याच्या टंचाईवरील नाट्य ‘उदकशांत’, ‘यदा कदाचित’ आणि ‘ओम कुत्राय नम:’ ही धमाल विनोदी नाटके, वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा हा कुसुमाग्रजांच्या काव्य-नाट्य-लेखन क्षेत्रातील सुंदर प्रवासावार आधारित कार्यक्रम, श्रृंगार, वीर, करुण, अद्‌भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत अशा नवरसांची ओळख करून देणारा अनोखा ‘रस बरसे’ हा पुणे, मुंबई, ह्युस्टन, लॉस एंजलीस, न्यूयॉर्क आणि डॅलासमधील मंडळींनी एकत्र येऊन सादर केलेला कार्यक्रम, मराठी सिनेमाची १०० वर्षे संगीत आणि नृत्यातून साकार करणारा कार्यक्रम, महाराष्ट्राच्या लोककलांवर आधारित ‘खेळ मांडियेला’ असे अनेक अनोखे कार्यक्रम या अधिवेशनात साजरे होणार आहेत. त्यांची झलक अधिवेशनाच्या संकेतस्थळावर आपल्यासाठी ठेवली आहे. ती पहायला विसरू नका.

हार्मोनियम म्हणा, बाजा म्हणा किंवा पेटी म्हणा, या वाद्याचे सूर न ऐकलेला मराठी माणूस मिळणे शक्यच नाही. १७३ वर्षे जुन्या असलेल्या या वाद्याने नुसत्या मराठीच नव्हे तर सर्वच भारतीयांना वेड लावले आहे. अशा या पेटीची जादू आपल्यापुढे उलगडून दाखवणारा एक अनोखा कार्यक्रम ‘जादूची पेटी’ - आपल्याला यावेळच्या बँक्वेटच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम सत्यजित प्रभू आणि आदित्य ओक सादर करणार आहेत. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावगीत, सिनेसंगीत, कव्वाली अशा वेगवेगळ्या गीत-प्रकारांना पेटी कशी खुलवते हे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. बँक्वेट अधिवेशनाच्या आदल्या संध्याकाळी (गुरुवारी २ जुलैला) होणार असून त्यासाठी ७५ डॉलर्स भरून वेगळी नोंदणी करणे आवश्यक आहे. बँक्वेटमध्ये अजूनही जागा शिल्लक असून ज्या लोकांनी अजून नोंदणी केलेली नाही, त्यांनी जागा भरण्याआधी नोंदणी करावी.

व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, गदिमा, पु. ल., राजा परांजपे, सुधीर फडके, आनंदघन, वसंत पवार, वसंत कदम, अनंत माने, लता-आशा, सुमन कल्याणपूर, श्रीनिवास खळे, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी या सर्व मंडळींनी एक काळ गाजवला. या काळात पडद्यावरील चित्रे रंगीत नव्हती - ब्लॅक अँड व्हाइट - काळी-पांढरी होती. त्या काळातील आठवणी आपल्यापैकी अनेकांना आजही येत असतील. ज्या लोकांनी महाराष्ट्राचा भूतकाळ सजवला त्यांच्या काळाची अनोखी कहाणी आपल्याला दृक-श्राव्य आणि नाट्यरुपाने अधिवेशनाच्या व्यासपीठावर या वर्षी पहायला मिळणार आहे. चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य आणि चित्र अशा सकल कलांचा कोलाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना पहायला मिळणार आहे. ‘गोष्ट एका काळाची - काळ्या पांढऱ्या पडद्याची’ या डॉ. समीर कुलकर्णींनी लिहिलेल्या संहितेला दिग्दर्शक आशय वाळंबे यांनी जिवंत केले आहे. निश एन्टरटेनमेंट व मिलिंद ओक यांचा हा आगळा वेगळा कार्यक्रम या अधिवेशनाचे आकर्षण असेल यात मला कुठलीही शंका नाही.

उत्तर अमेरिकेत अनेक उद्योजक मराठी मंडळीही आहेत. लोकांना उद्योजक बनायची इच्छा असलेले अनेक लोकही आहेत. अशा सर्व मंडळींना एकमेकांबरोबर नेटवर्किंग करण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाने ‘बिझनेस सेमिनार’ २ जुलैला आयोजित केले आहे. या सेमिनारमध्ये अनिता आणि हर्ष भोगले यांची भाषणेही होणार आहेत. हर्ष भोगले माहीत नाहीत असा क्रिकेटवेडा माणूस सापडणे कठीणच. क्रिकेटमधील जिंकणं उद्योगधंद्यात कसं वापरता येईल, यावर ते बोलणार आहेत. यावर्षीच्या अधिवेशनाचे एक खास आकर्षण म्हणजे रिएल इस्टेट एक्स्पो. आपल्यापैकी ज्यांना भारतामध्ये प्रॉपर्टी घ्यायचा विचार असेल, त्यांच्यासाठी ही पर्वणीच.

त्याव्यतिरिक्त इतर उत्पादने प्रदर्शन व विक्रीला ठेवणारा ‘एक्स्पो’ही अधिवेशनात असणारच आहे. ज्या लोकांना आपली उत्पादने हजारो मराठी लोकांसमोर आणायची आहेत अशा उद्योजकांसाठी ही चांगली संधी आहे. या एक्स्पोमधे आपला बूथ लावण्यासाठी सर्व माहिती अधिवेशनाच्या वेबसाइटवर आहे. अधिवेशनातील ‘उत्तररंग’ परिषदेच्या नोंदणीस भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ह्या परिषदेस डॉ. मोहन आगाशे प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत.

अधिवेशनाच्या मुख्य आकर्षणाची मजा एकत्र बसून घेण्याची आपल्यापैकी अनेकांची इच्छा असेल. आपण वेगवेगळी नोंदणी केली असली आणि आपल्याला एकत्र बसायचे असल्यास, कृपया अधिवेशनाच्या वेबसाइटवर जाऊन लॉग-इन करून आपले Seating Preferences आम्हाला कळवावेत. ज्या लोकांबरोबर आपल्याला बसायचे आहे त्यांचा बी एम एम क्रमांक आपण Seating Preferences मध्ये त्यांच्या नावाबरोबर घालणे आवश्यक आहे. देणगीदारांचा क्रमांक D ने सुरू होतो तर ज्यांनी सर्वसाधारण नोंदणी केली आहे त्यांचा क्रमांक R ने सुरू होतो. या अक्षरांपुढे चार अंक असतात - उदाहरणार्थ D0123 किंवा R0456. आम्ही आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जागा द्यायचा आटोकाट प्रयत्न करू.

झालेत बहु, होतील बहु, परी या सम हे - अशा या अधिवेशनासाठी नोंदणी करण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. www.bmm2015.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला नोंदणी करता येईल. आणि चांगली जागा हवी असेल तर देणगी देऊन तुमची चांगली जागा आजही राखून ठेवता येईल. अधिवेशनाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क: ईमेल: info@bmm2015.org , फोन: ३१०-७७६-५५९३

- वैभव पुराणिक (लॉस एंजलीस)