May, 2015

LAलकारी

लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला
शनवारचं लग्न.. इतवारची हळद
सोमवारी देवकार्य न् मंगळवारी वरात
ढेकणाची मोटार.. विंचवाचे टांगे घोडे
आवरा, लवकर चला.. आला बहुरूपी आला
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला..

हे गाणं आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेलच. बहुरुपी लग्नाचं आमंत्रण देण्याचं सोंग घेऊन महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातनं फिरत असत, आणि त्यावेळी हे गाणं वापरत असत. चित्रविचित्र प्रतिमा आणि विनोदाने भरलेल्या या गाण्याने अनेक लोकांचं मनोरंजन केलेलं आहे. आज या गाण्याचा उपयोग मला आपल्याला एका कोंढाण्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी करायचा आहे. आम्ही एंजलिनोंनी हे कोंढाण्याचं लग्न होईपर्यंत आपआपल्या रायबाची लग्ने थांबवून ठेवली आहेत. आमच्या या प्रयत्नांचं फळ चाखायला - बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला ३ ते ५ जुलैच्या दरम्यान आपण नक्की याल अशी आमची आशा आहे. वेगवेगळ्या पिढ्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आवडतील अशा कार्यक्रमांची या अधिवेशनात रेलचेल असणार आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमाव्यतिरीक्त अनेक परिसंवाद व चर्चात्मक कार्यक्रमही या अधिवेशनात ठेवलेले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे आमंत्रण स्विकारले आहे, हे आपल्याला कळवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर महाराष्ट्राची संस्कृती आम्ही कशी जतन केली आहे, हे त्यांना या अधिवेशनात आपणां सर्वांना दाखवता येईल. तसेच प्रसिध्द उद्योजक श्री. विवेक रणदिवे आपल्याला विशेष पाहुणे म्हणून या अधिवेशनाला लाभणार आहेत. श्री. विवेक रणदिवे यांनी सुप्रसिध्द टिबको कंपनीची स्थापना केली असून सॅक्रमेंटो किंग्ज या एन बी ए चमूचे ते मालक आहेत.

लॉस एंजलीस हे अमेरिकन चित्रपटसृष्टीचं माहेरघर. इथल्या अधिवेशनात सिनेसृष्टीविषयीचा कार्यक्रम नसेल तरच नवल. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी दुपारी १ ते ५ च्या दरम्यान ‘ला सिनेमा’ नावाचा चित्रपटसृष्टीविषयी खास कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमात भारतातील आणि हॉलिवूडच्या चित्रपटसृष्टीतील दिग्गज लोक वेगवेगळ्या चित्रपटांविषयी आपल्याशी चर्चा करतील. निर्मितीआधी, निर्मितीप्रसंगी आणि निर्मितीनंतरच्या प्रक्रिया असे तीन मुद्दे या चर्चेसाठी निवडण्यात आले आहेत. या चर्चेमध्ये सुप्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सुप्रसिध्द कलाकार डॉ. मोहन आगाशे, दबांग, फॅशन, नटरंग अशा उत्कृष्ट चित्रपटांचे चित्रण करणारे महेश लिमये, निर्माता निखिल साने, निर्माते, दिग्दर्शक श्रीहरी साठे, निर्माते विवेक कुकरेजा भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करतील. दिग्दर्शक डेव्हिड क्रिसमन, कास्टिंग डिरेक्टर शेरील मर्फी, बाबू सुब्रमण्यम्‌, अकॅडमी अवॉर्ड विजेते लेखक दिग्दर्शक जेफ्री ब्राउन, सिमेमॅटोग्राफर मायकल ट्रिम, लेखक दिग्दर्शक एरिक इंग्लंड हॉलिवूडचे प्रतिनिधित्व करतील. या कार्यक्रमाचे शुल्क ५० डॉलर्स असून विद्यार्थ्यांना त्यात सवलत देण्यात येणार आहे. ज्यांना चित्रपटकलेमध्ये रस आहे, अशा लोकांसाठी ही पर्वणीच आहे असे म्हणायला हरकत नाही. ज्या लोकांना ह्या कार्यक्रमाला हजर रहायचे आहे त्यांनी अधिवेशनाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.

‘ला सिनेमा’ प्रमाणेच अजूनही एक महत्त्वाचा कार्यक्रम अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आहे. उत्तर अमेरिकन मराठी समाजामध्ये अनेक यशस्वी उद्योजक आहेत. तसेच अनेक इच्छुक उद्योजकही आहेत. या उद्योजकांना एकमेकांच्या अनुभवाचा फायदा घेता यावा या उद्देशाने बिझनेस सेमिनार (व्यवसाय-सत्र) आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिध्द समालोचक हर्ष भोगले आणि त्यांची पत्नी अनिता भोगले या कार्यक्रमामध्ये वक्ते म्हणून हजर राहणार आहेत. हर्ष भोगले हे समालोचक म्हणून आपल्याला माहीत आहेतच, पण ते अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे माजी विद्यार्थीही आहेत. हर्ष आणि अनिताने मिळून ‘द विनिंग वे’ हे पुस्तक लिहीले आहे. खेळजगताची उद्योगजगताशी तुलना करुन उद्योग जगतातही कशाप्रकारे जिंकता येईल यावर हे पुस्तक आहे. हर्ष आणि अनिता याच विषयावर बोलणार आहेत. हा कार्यक्रमही अधिवेशन समितीने विद्यार्थ्यांना खास सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला आहे. तसेच या निमित्ताने अधिवेशन समितीने खास ‘पिच इट अप’ नावाची ‘बिझनेस प्लान’(व्यवसाय-योजना) स्पर्धाही आयोजित केली आहे. या स्पर्धत भाग घेणाऱ्यांनी आपले बिझनेस प्लान ३१ मे पर्यंत लिहून द्यायचे आहेत. त्यापैकी निवडक बिझनेस प्लान बिझनेस सेमिनारमध्ये सादर करण्यासाठी निवडले जातील. या स्पर्धेविषयी अधिक माहिती अधिवेशनाच्या वेबसाइटवर बिझनेस सेमिनार विभागात मिळू शकेल. या कार्यक्रमांव्यतिरिक्त २जुलैला ५५+ वयोगटासाठी ‘उत्तररंग’, डॉक्टरांसाठी ‘कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन’ चर्चासत्र आणि संध्याकाळी बँक्वेटचे आयोजन करण्यात आले आहे. बँक्वेटमधे ‘जादूची पेटी’ हा हार्मोनियमची जादू दाखवणारा खास कार्यक्रम आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू सादर करणार आहेत. त्यांना मंदार गोगटे, संजय महाडिक, प्रभाकर मोसमकर आणि प्रसाद पाध्ये साथ देणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी वेगळी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिवेशनाच्या संकेस्थळावर जाऊन लॉगिन करून आपल्या नोंदणीमधे हे कार्यक्रम घालता येतात.

ज्यांनी अजूनही अधिवेशनाची नोंदणी केलेली नाही त्यांनी १५ मे ही तारीख लक्षात ठेवणे आवश्यक आहे. १५ मे नंतर अधिवेशनाचे नोंदणीदर वाढणार आहेत. अजूनही संधी गेलेली नाही, तेव्हा त्वरा करा, www.bmm2015.org या अधिवेशनाच्या संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर नोंदणी करा. अधिवेशनासंबंधी कुठल्याही प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी:

संकेतस्थळ www.bmm2015.org
ईमेल info@bmm2015.org, फोन: ३१० ७७६ ५५९३

- वैभव पुराणिक (लॉस एंजलीस)