Sept, 2015

नमस्कार मंडळी,

मंडळाच्या कार्याची सूत्रे हाती घेतल्याबरोबर आमची समिती उत्साहाने कामाला लागली आहे. आता पुढच्या दोन वर्षांचा काल “कॉन्फरन्स कॉलमय” होणार ह्याची खात्री होतीच, आणि तसंच घडतंय. एकाच वेळी अनेक चेंडू हवेत उडताना दिसताहेत, आणि ते झेलता झेलता वेळ मात्र भुर्रकन उडून जातोय. अनेक मराठी चित्रपटांचे निर्माते आपले चित्रपट अमेरिकेत दाखवण्यास उत्सुक आहेत. लवकरच आम्ही त्यासंबंधी माहिती आपल्याला कळवू. अर्थात आजकाल प्रदर्शित होणाऱ्या बहुतेक चित्रपटांना “चलचित्रचौर्य” (video piracy) ह्या व्याधीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे पुष्कळदा प्रेक्षकांचा उत्साह यथातथाच असतो. तरीही दर्जेदार चित्रपटांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभतो, हेही तितकंच खरं. ह्या महिन्यापासून आपल्या मराठी शाळा सुध्दा उन्हाळ्याची सुटी संपवून पुन्हा सुरू होतील. शाळेत जाणारी मुलं, त्यांचे पालक आणि सर्व शिक्षकवर्गाचा उत्साह खरोखर प्रशंसनीय आहे. अटलांटाच्या मराठी शाळेला मान्यताप्राप्त भाषिक शाळेचा दर्जा मिळाल्याचे आपल्याला माहीत असेलच. तशाच प्रकारचे प्रयत्न ऑस्टिन महाराष्ट्र मंडळाने करण्याचा निश्चय केला आहे आणि इतरही काही शाळा त्यापासून स्फूर्ती घेऊन असे प्रयत्न करून त्यात यश मिळवतील अशी आशा आहे.

उत्तर अमेरिकेतीलच नव्हे तर जगभरातील मराठी मंडळांना एकत्र आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेतच. आपल्या अधिवेशनाला अनेक देशांमधून मराठी बांधव येतात. युरोप मधील मराठी बांधवांचे द्वैवार्षिक संमेलन पुढच्या वर्षी अल्मेलो, नेदरलँड्स येथे १५ ते १७ एप्रिल दरम्यान संपन्न होणार आहे.

(www.ems2016.nl). संयोजकांनी आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. तरी शक्य असेल त्या सर्वांनी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहावे ही विनंती. पुढच्या वर्षीच मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या अधिवेशनाची माहिती सुध्दा लवकरच आम्ही उपलब्ध करून देऊ.

डेट्रॅाइट अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. लॉस एंजलीस अधिवेशनाचे प्रमुख प्रायोजक एक्सलन्स शेल्टरचे डॉ नरेश भरडे पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत, आणि डेट्रॅाइट अधिवेशनासाठी एक महत्त्वाचे प्रायोजकत्व स्वीकारण्यास त्यांनी संमती दर्शवली आहे. अधिवेशनाच्या कार्याचा शुभारंभ ह्या आनंदाच्या बातमीसह झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे हे निश्चित!

बृहन्महाराष्ट्र वृत्त हे आपल्या सर्वांसाठी आहे. सर्वप्रथम हे वृत्त उत्तर अमेरिकेतल्या प्रत्येक मराठी-भाषकापर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. आपल्या सर्व सभासदांना ते इ-मेल द्वारा कृपया पाठवा, आणि त्याचप्रमाणे आपल्या मंडळाच्या कार्यक्रमांची आणि उल्लेखनीय व्यक्ती, घटना ह्यांची माहिती वृत्ताच्या संपादिका विनता कुलकर्णी ह्यांना प्रसिध्दीसाठी जरूर पाठवा (vinata@gmail.com). वृत्तामध्ये आपल्या ललित साहित्याला प्रसिध्दी द्यायला सुध्दा आम्हाला निश्चितच आवडेल. आपल्या मंडळातले लेखक/कवी ह्यांची नावे आणि इमेल आम्हाला कळवलीत तर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू.

बराय तर मंडळी, आपणां सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. श्री गणरायांच्या कृपेने आपले सर्व संकल्प सिध्दीस जावोत ही प्रार्थना. गणपतीबाप्पा मोरया!

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)