Sept, 2015

MI मराठी - आपलं अधिवेशन

बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १८वं अधिवेशन आयोजित करण्याचा मान डेट्रॉइटला मिळाल्याची बातमी समजली, आणि तमाम डेट्रॉइटकरांच्या अंगात एक अलौकिक उत्साह सळसळायला सुरुवात झाली! अमेरिकेच्या अथांग प्रदेशात आपली भावंडं स्थायिक असून ह्या वर्षीचा गणपती आपल्या घरी बसणार आहे, आणि जणू त्याचंच दर्शन घ्यायला विविध शहरातून आपले मराठी बांधव येणार आहेत, अशाच प्रकारचा तो उत्साह आहे. अवघ्या दोन दिवसात http://www.bmm2017.org हे अधिवेशनाचे संकेतस्थळ(वेबसाईट) तयार करण्यात आलं. फेसबुकवर अधिकृत पान उघडण्यात आलं (https://www.facebook.com/bmm2017). स्वयंसेवक होण्यासाठी अनेक नावं नोंदवली गेली, आणि हे अधिवेशन कसं वेगळं आणि छान करता येईल, हे सांगायला कल्पनांचा पाऊस पडायला सुरुवात झाली! पुणेकरांना अमेरिकेचं पुणे, मुंबईकरांना अमेरिकेची मुंबई, तर नागपूरकरांना अमेरिकेचं नागपूर वाटणारं, थोडक्यात सांगायचं तर प्रत्येकाला आपलं वाटणारं असं हे आमचं डेट्रॉइट शहर १८व्या अधिवेशनाची धुरा सांभाळायला सज्ज होत आहे!

२०१५च्या अधिवेशनात LAकरांकडून अधिवेशनाची भव्य मशाल आनंदाने हाती घेतली खरी, पण त्याच क्षणी हाताला त्या मशालीची धग जाणवली. अधिवेशन आयोजित करणं हे निश्चितच सोपं काम नव्हे. केवढा तो आवाका, केवढा तो थाट, महाराष्ट्राच्या कलासृष्टीचा सहभाग, हजारो लोकांचा उत्सव, जणू एक सोहळाच! LAवरून डेट्रॉइटला परत आल्यावर ३०० स्वयंसेवकांनी अधिवेशनाची ती मशाल पेलायची तयारी दाखवली, आजूबाजूच्या मराठी मंडळांनी मदतीचे आश्वासन दिले, आणि म्हणूनच त्या धगीचे आज उत्साहात रुपांतर झाले आहे. १९८९ साली डेट्रॉइटमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाचं (बृ. म. मं.) अधिवेशन झालं होतं. त्यावेळीच्या कार्यकर्त्यांचे अनुभव आणि आशीर्वाद पाठीशी आहेत, हे आम्ही आमचं भाग्यच समजतो. आत्तापर्यंत स्वयंसेवकांच्या तीन सभा झाल्या. त्यातून पुढे आलेले मुद्दे असे, की काही गोष्टींच्या दर्जावर तडजोड करण्यात येऊ नये आणि ह्या गोष्टी म्हणजे जेवण, करमणुकीचे कार्यक्रम आणि लोकांची सोय.

डेट्रॉइट म्हणजे ‘Motor city’ - गाड्यांच्या राजधानीचं शहर! त्यामुळे बृ. म. मंडळाच्या १८व्या अधिवेशनात ‘Automotive

Conference’ला महत्त्वाचं स्थान असेल.

३० जून, २०१५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी डेट्रॉइटला भेट दिली होती. डेट्रॉईटमध्ये होणारं बृ. म. मंडळाचं अधिवेशन आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचं ‘Make in Maharashtra' हे ब्रीद म्हणजे जणू दुग्धशर्करायोगच! ह्या अधिवेशनातून महाराष्ट्र आणि मिशिगन मधल्या व्यापाराच्या संधी वाढवायचा प्रयत्न केला जाईल. मराठी माणसाला जागतिक पातळीवर नावलौकिक प्राप्त होणे ह्याहून मोठी अभिमानास्पद गोष्ट ती कोणती?

‘एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड’चे डॉक्टर भारदे ह्यांनी नुकतीच २०१७ च्या अधिवेशनासाठी प्लॅटिनम प्रायोजकत्व/स्पॉन्सरशिप देण्याचे जाहीर केले आहे. ह्यामुळे अधिवेशनाच्या कामाला निश्चितच गती मिळेल. अधिवेशन उत्कृष्ट व्हावं म्हणून प्रत्येकच संयोजक मंडळ जोरदार काम करत असते. पण ह्या बातमीमुळे अधिवेशनाच्या निधीसंकलनाच्या समितीने साऊथ आफ्रिकेच्या AB de Villiers सारखी जलद सेंच्युरी मारली आहे, असं म्हणायला हरकत नाही!

गणपती कुठल्याही काकाकडे असो, तो उत्सव आपल्या सगळ्यांचा असतो. त्याचप्रमाणे हे अधिवेशनदेखील आपल्या सगळ्यांचं आहे. ह्या अधिवेशनात काय केलेले आपणास आवडेल, हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्या कल्पना, अनुभव आणि भरभरून आशीर्वाद ideas@bmm2017.org ह्या इमेल-पत्त्यावर पाठवावे. आम्ही वाट बघतोय.

पुढील महिन्यात पुन्हा भेटू, नव्या उत्साहाने, अधिवेशनाच्या तयारीसंबंधी एक नवा वृत्तांत घेऊन!

- - सुशांत खोपकर (डेट्रॉइट)