Oct, 2015

नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवाची धामधूम नुकतीच संपली. तुम्ही सर्वांनी मंडळाचा गणेशोत्सव आणि गावातले इतर अनेक गणेशपूजनाचे आणि आरतीचे कार्यक्रम उत्साहात साजरे केले असतीलच. काही गावांमध्ये तर इतक्या ठिकाणी पूजा आणि भोजन असे संलग्न कार्यक्रम असतात, की अनंतचतुर्दशीनंतर आपणच “लंबोदर” झाल्याचा आभास काही भक्तजनांना होत असेल असं वाटतं! असो.

गणेशचतुर्थीपूर्वी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने आम्ही एक आवाहन आपल्या सर्व मराठी बांधवांना केलं होतं. आपल्या सर्वांना माहीत आहेच, की महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना गेली काही वर्षे दारिद्र्य, कर्जबाजारी, आत्महत्या अश्या भीषण वास्तवाला सामोरं जावं लागतंय. ह्या वर्षीचा दुष्काळ तर फारच भयानक परिस्थिती निर्माण करणारा ठरला आहे. अशावेळी निधीसंकलन करून त्यांना मदत करणं आपलं कर्तव्यच आहे कारण ज्या मराठी मातीशी आपण अभिमानाने नातं सांगतो त्या मातीचे खरे सोयरे हे आपले भूमिपुत्र शेतकरीच आहेत. सांगायला अतिशय आनंद होतो आहे, की अनेक मंडळांनी आमच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद दिला आहे. श्रींच्या चरणी मराठी बांधवांनी अर्पण केलेली दक्षिणा सर्व मंडळांनी बृ. म. मंडळाकडे पाठवावी असं एक साधं स्वरूप ह्या आवाहनाचं होतं. पण सर्व सभासद मंडळांनी जर ह्या कार्यात हातभार लावला तर एक मोठा निधी आपल्याला जमा करता येईल, ह्याची आम्हाला खात्री आहे. ह्या निधीचा उचित विनियोग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र फाऊंडेशन ह्या अमेरिकेतल्या सेवाभावी संघटनेशी आपण परिचित असालच. बृ. म. मंडळ आणि महाराष्ट्र फाऊंडेशन एकत्र येऊन हा निधी आणि ह्याशिवाय आपण ह्यापुढे ज्यास्त रकमेचा दिलेला वैयक्तिक निधी (ज्यावर आपल्याला आयकरात सूट मिळेल) थेट दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही आम्ही करणार आहोत. सचोटी, संपूर्ण उपयुक्तता आणि पारदर्शकता ही तीन तत्त्वे पाळण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. वैयक्तिक निधी- संकलनाची प्रक्रिया आपल्या मंडळांकडे बृ. म. मंडळ आणि महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने पाठवण्यात आली आहे, ती आवर्जून पाहा. मंडळी, दातृत्व हे कर्तृत्वापेक्षा मोठं आहे हे सांगणारं एक सुभाषित मला आठवतंय,

शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पण्डित:|
वक्ता दशसहस्रेषु, दाता भवति वा न वा ||

गणेशोत्सवानंतर बऱ्याच मंडळांमध्ये दसरा, कोजागरीचे वारे वाहू लागतील. तरुण मंडळी दांडिया खेळायला उत्सुक असतील. शरद ऋतूची आल्हाददायक हवा सगळ्यांनाच उत्साही करते. आपल्या सर्वांना दसरा आणि कोजागरीच्या हार्दिक शुभेच्छा. सप्टेंबर अखेरीस मी भारतात जाणार आहे, तेंव्हा अर्थातच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या काही उपक्रमांसंबंधी कार्यवाही करण्याची संधी मला मिळेल. त्याचा अहवाल पुढच्या वेळी.

धन्यवाद
- नितीन जोशी
अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका