Oct, 2015

MI मराठी - आपलं अधिवेशन

डेट्रॉइट येथे २०१७मधे होणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन जसं उत्कृष्ट व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, तसंच ते वेगळं असावं, त्यात काहीतरी नाविन्य असावं, असंही प्रत्येकाला वाटत असतं. 'प्रत्येकाचा मराठी समुदायाशी असलेला ऋणानुबंध वाढवणे' आणि 'मराठी माणसाला नावलौकिक मिळवून देणे' ही दोन उद्दिष्टे आपण डेट्रॉइटमधील आगामी बृ. म. मं. अधिवेशनासाठी ठेवली आहेत. ह्या उद्दिष्टांच्या साहाय्याने अधिवेशन अधिकाधिक चांगलं आणि नाविन्यपूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल.

आपल्याला जर जास्तीत जास्त लोकांना एकमेकांशी जोडायचं असेल, तर अधिवेशन खर्चिक होता कामा नये. सगळ्या वयोगटातल्या लोकांना सहभागी होता यावं ह्यासाठी काय करता येईल? संपूर्ण अधिवेशनाच्या प्रवेशिकेसोबत एका दिवसाची प्रवेशिका केली तर? काही ठराविक कार्यक्रमांची प्रवेशिका केली तर? विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रमांचे इंटरनेट वरून प्रक्षेपण करणं शक्य आहे का? ह्या बाबतीत सध्या विचार चालू आहे.

दर दोन वर्षांनी कलेचं सादरीकरण करण्यासाठी मिळणारा एक भव्य मंच म्हणजे बृ. म. मंडळाचं अधिवेशन! उत्तर अमेरिकेतल्या स्थानिक कलाकारांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं जाणं आवश्यक आहे. ह्यातले बहुतेक कलाकार हे व्यवसायाने कलाक्षेत्रात नसतात. बऱ्याचदा आपली किंवा आपल्या कुटुंबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांचा पेशा निवडलेला असतो. अशावेळी त्यांच्यात दडलेला कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नाही. व्यक्त होण्यासाठी तो आतून धडका मारत असतो. पूर्ण वेळ काम करूनही तो आत बसलेला कलाकार त्यांना कलेची जोपासना करायला भाग पाडतो. अशा वेळी अधिवेशानासारखा भव्य मंच आपल्या मराठी बांधवांना उपलब्ध करून देणं हे आपल्या सगळ्यांचं त्यांच्यावरचं एकप्रकारचं बंधुप्रेमच आहे.

अर्थात ह्याचबरोबर भारतातून उत्तमोत्तम कार्यक्रम आणणंही गरजेचं आहे. बऱ्याच रसिक प्रेक्षकांना भारतातली नाटकं, गायन-वादनाचे कार्यक्रम अमेरिकेत होत नाहीत ह्याची खंत असते. अशा लोकांसाठी बृ. म. मंडळाचं अधिवेशन ही एक पर्वणीच ठरायला हवी! काही लोकांना मराठी तारे आणि तारकांना प्रत्यक्ष भेटल्याने, बघितल्याने होणारा आनंद मोठा असतो. त्यांचीही इच्छा अधिवेशनातून पूर्ण होत असते. अशा परस्पर विरोधी मुद्यांमुळे नक्की कशा प्रकारचे कार्यक्रम निवडायचे, हा अवघड प्रश्न सध्या डेट्रॉइटकरांच्या समोर पाय रोवून उभा आहे.

त्यासाठी आत्तापासूनच आपली कार्यक्रम समिती कंबर कसून कामाला लागली आहे. प्रत्येकाचा मराठी समुदायाशी असलेला ऋणानुबंध वाढवण्यासाठी 'सगळ्यांचे सगळ्यांसाठी कार्यक्रम' हे उद्दिष्ट आयोजकांनी डोळयासमोर ठेवलं आहे.

आपल्या सगळ्यांचेच ह्याबाबतीतले विचार अधिवेशनाच्या दृष्टीने मोलाचे ठरतील. आपले विचार, सूचना, कल्पना आणि आशीर्वाद ideas@bmm2017.org ह्या पत्त्यावर शक्यतो ३१ ऑक्टोबरच्या आत पाठवावेत. ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी सगळ्या स्वयंसेवकांची एक बैठक होणार आहे. त्यामध्ये अशा सर्व मुद्यांवर सखोल विचार केला जाईल.

हे अधिवेशन आपल्या सगळ्यांचं असल्याने प्रत्येकाने दिलेल्या सूचनेवर आणि कल्पनेवर विचार केला जातो. आपली कल्पना कितीही साधी किंवा अगदी चौकटी बाहेरची जरी असली, तरीही ती आपल्याला अधिवेशनाच्या दृष्टीने मोलाची ठरू शकते. मागे एक कल्पना आली होती, की अधिवेशन एखाद्या क्रूसवर (cruise) केलं तर..! तीन ते चार हजार लोकांचं एक भलं मोठ्ठं जहाज.. बहामाची तीन दिवसांची सफर.. मराठमोळं जेवण.. आणि कलाकारांच्या सान्निध्यात त्या जहाजावर सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम! कल्पना तर फक्कड आहे! पण खर्च किती होईल? आणि बाकी काय काय अडचणी येऊ शकतील..? ह्याचा सर्व बाजूंनी विचार होणे गरजेचं आहे. असो!

आपल्या लाडक्या बुध्दिदेवतेने घराघरांत उत्साह शिंपून नुकताच आपला निरोप घेतला. चला, एकदा सगळे मिळून तिचा जयघोष करूया -

'गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!'

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट)