Dec, 2015

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष नितीन जोशी ह्यांच्या उपस्थितीत सर्व स्वयंसेवकांची एक बैठक डेट्रॉइट येथे नुकतीच पार पडली. नितीन जोशींचं मार्गदर्शन बृ. म. मंडळाच्या २०१७ मधील अधिवेशनाला मोलाचं ठरेल ह्यात शंका नाही, कारण ते २०११मधे शिकागो येथे झालेल्या अधिवेशनाचे प्रमुख तर होतेच, पण सध्या ते बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षदेखील आहेत. त्यामुळे त्यांना दोन्ही बाजूंचा अनुभव आहे. सौरव गांगुली किंवा महेंद्रसिंग धोनी उद्या जर क्रिकेट नियामक समितीचे (BCCI) अध्यक्ष झाले, तर एकूणच भारतीय क्रिकेटबद्दलचा त्यांच्याकडे जो गाढा अनुभव असेल आणि ते ज्याप्रकारे आपल्या संघाला मार्गदर्शन आणि मदत करू शकतील, तसाच हा प्रकार आहे! ह्या बैठकीत नितीन जोशी ह्यांनी शिकागो अधिवेशनाचे त्यांचे काही अनुभव सांगितले आणि वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्व पटवून दिले.

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात एकूणच वेळेच्या व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्व आहे. जागेचं भाडं, दृकश्राव्य उपकरणांचं भाडं, कामगार संघटनेचा पगार, त्यांना द्यायला लागणारी बक्षिसी ह्या सगळ्याचा खर्च इतका जास्त असतो, की '१० मिनिटं उशीर = $१५,०००चं नुकसान' हे समीकरण प्रत्येक स्वयंसेवकाने त्याच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. आणि त्याप्रमाणेच, जेवणाचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं

नियोजन करणं आवश्यक आहे.

असं म्हणतात की 'सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही'. मग अशावेळी साग्रसंगीत भोजन करायचं ठरवलं आणि जर आपल्याला 'चांदीच्या ताटात गवारची भाजी' किंवा 'प्लास्टिकच्या ताटात आम्रखंड' असे दोन पर्याय दिले तर आपण काय निवडू? काही लोकांना आम्रखंड महत्त्वाचं वाटेल तर काही लोकांना चांदीच्या ताटात मिळणारं जेवण! असा पेच पूर्वीच्या बऱ्याच अधिवेशनांमध्ये आल्याची उदाहरणे आहेत. अधिवेशनासाठी तुलनेने महाग आणि भव्य जागा निवडायची का स्वस्तातली आणि जरा लहान? प्रसंगी चांदीच्या ताटात आम्रखंड मिळवायचा प्रयत्न आपण करावा, अशीच आपली ह्या अधिवेशनात भूमिका असणार आहे. अधिवेशनाच्या प्रवेशिकांमधून हा खर्च निश्चितच भागत नाही. अशा वेळी गरज असते देणगी स्वरूपातील निधी उभारण्याची. विविध प्रकारच्या देणगीधारकांना कसं भेटता येईल, कोण कोण देणागीधारक असू शकतील ह्याविषयी त्या बैठकीत चर्चा झाली.

अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून कुणाला सचिन तेंडुलकर यावासा वाटतो, कुणाला माधुरी दीक्षित, तर कुणाला शंकर महादेवन्‌! फक्त अधिवेशनाची कार्यक्रम समिती काही हा निर्णय घेऊ शकत नाही. त्याविषयी सर्व स्वयंसेवकांची मते जाणून घेण्यात आली. त्याचप्रमाणे 'भारतातून कशाप्रकारचे कार्यक्रम आणावेत, कशाप्रकारचे आणू नयेत', किंवा 'उत्तर अमेरिकेत कार्यक्रम करणाऱ्या कुणाला तुम्ही ओळखता का?', 'लहान मुलांसाठी, तरुणांसाठी काय कार्यक्रम ठेवता येतील?' ह्याबद्दल सगळ्यांची मते जाणून घेतली गेली. अहो काय सांगता! नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेला बोलवायचंय तुम्हाला? अहो मग सांगा ना! तुमच्या ओळखीचा अमेरिकेतला ग्रुप छान नाटक करतो? लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग ठेवता येतील असं वाटतं? तुमच्या सूचना आम्हांला ideas@bmm2017.org ह्या पत्त्यावर पाठवा. तुमचंही मत तितकंच महत्वाचं आहे, कारण हा गणपती बसतोय, पण त्या बाप्पावर तुमचाही तितकाच अधिकार आहे!

तुम्हांला बृहन्महाराष्ट्र वृत्तातून अधिवेशनाची तयारी कशी चालू आहे हे समजतंच, पण अजूनही माहिती आणि धमाल हवी असेल, तर https://www.facebook.com/bmm2017 ह्या फेसबुकवरील पानाला नक्की भेट द्या. निरनिराळे लेख, कार्यक्रमांची छायाचित्रं, मराठी तारे, तारकांचे संदेश, शुभेच्छा तुम्हांला पाहायला मिळतील. नुकतेच 'MI - प्रवासी' हे व्हिडीओ सदर सुरू झालं आहे. मराठी लोकांच्या जगभरातून डेट्रॉइटपर्यंत झालेल्या प्रवासाबद्दल त्यात गप्पागोष्टी असतात.

तुम्ही आपल्या अधिवेशनासाठी बोधचिन्ह (Logo) बनवायला सुरुवात केलीत का? लेखकांनी बोधवाक्य (Slogan) सुचवायला सुरुवात केली का? विचार करा, तुमच्या केवळ २ ओळींमुळे तुम्हांला अधिवेशनाची $300 ची प्रवेशिका बक्षिस मिळू शकते! बोधचिन्ह प्रवेशिका logo@bmm2017.org वर आणि बोधवाक्य प्रवेशिका slogan@bmm2017.org वर पाठवावी.

चला तर मग, आपला निरोप घेतो. पुन्हा भेटू, पुढील महिन्यात. अधिवेशनाच्या तयारीचा एक नवा वृत्तांत घेऊन!

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट)