Jan, 2016

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! उत्तर अमेरिकेतल्या समस्त मराठी बांधवांना हे वर्ष सुखसमृध्दी, समाधान आणि मन:शांतीचे जावो हीच सदिच्छा. सुख आणि समाधान हे अनुक्रमे भौतिक आणि मानसिक आनंद आहेत. सुखी माणूस समाधानी असतोच असं नाही पण समाधानी माणूस मात्र सुखी असतो म्हणून ह्या दोन्हीच्या प्राप्तीसाठी आपली धडपड सुरू असते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बहुतेक लोक काहीतरी संकल्प करतात. अर्थात असे वैयक्तिक संकल्प किती काळ टिकतात हा प्रश्न आहेच पण मुळात संकल्प करण्यालाही महत्त्व आहे, आणि त्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहण्याचीही गरज नाही. असाच एक संकल्प यंदा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीने केला, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करणे. आजवर आपले मंडळ मुख्यत्वेकरून सांस्कृतिक कार्यात सहभागी होते. पण यंदाचा दुष्काळ ही अशी भीषण वस्तुस्थिती होती, की आपल्यापैकी अनेकांना उत्स्फू्र्तपणे मदतीचा हात पुढे करावा असं वाटलं. मंडळांनी त्यासाठी जमविलेला निधी आमच्याकडे सुपूर्द केला आहे. उत्तर अमेरिकेत गेली अनेक वर्षे कार्यरत असलेली महाराष्ट्र फाऊंडेशन ही सेवाभावी संघटना आपणा सर्वांना निश्चितच परिचित असेल. आपल्या मंडळाशी फाऊंडेशनचा घनिष्ट संबंध आहे. ह्या प्रकल्पात महाराष्ट्र फाऊंडेशनच्या सहकार्याने हा निधी NAAM आणि Save the Widow ह्या दोन प्रकल्पांसाठी देण्याचे निश्चित झाले आहे. NAAMह्या संस्थेला परदेशातल्या संस्थांकडून निधी स्वीकारण्यासाठी भारत सरकारच्या एका विशिष्ट परवान्याची गरज आहे. लवकरच तो परवाना त्यांना प्राप्त होईल, आणि आपण निधी पाठवू शकू अशी अपेक्षा आहे. ज्या मंडळांनी ह्या कार्यात आम्हाला सहकार्य करून निधी संकलित केला आहे त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांचा नावानिशी उल्लेख सर्व निधी जमा होताच आम्ही निश्चित करू.

आपल्या आणखी एका प्रकल्पाविषयी मला सर्वांना एक आवाहन करायचं आहे. लॉस एंजलीस अधिवेशनात ‘हाऊसफुल्ल’उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी “उत्तररंग” चर्चासत्राला प्रतिसाद दिला. परंतु फक्त अधिवेशनांमध्ये संवाद साधून हे कार्य करता येणार नाही, हे आपण सर्वजण जाणता. 1970च्या सुमारास किंवा तत्पूर्वी इथे आलेले बहुतेक लोक आता निवृत्त झाले आहेत, किंवा लवकरच होतील. निवृत्तीनंतर आपल्या जीवनाची आवृत्ती कशी असेल हे खरंतर आपल्या प्रवृत्तीवर आणि काही अंशी कुटुंबीयांच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. परंतु सर्व निवृत्त लोकांचे बहुतेक प्रश्न समान असतात. आज बदलत्या काळाची गरज म्हणून त्या विषयी सामुहिक विचार-विनिमय अत्यंत उपयुक्त ठरतो. माझी सर्वांना नम्र विनंती आहे, की प्रत्येक गावातून आपण जर एक प्रतिनिधी तयार करू शकलो तर हे कार्य निश्चितपणे आपल्याला पुढे नेता येईल. त्यांना मार्गदर्शन आणि सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. सौ. विद्या हर्डीकर-सप्रे आणि श्री. अशोक सप्रे गावोगाव जाऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळावे आयोजित करतात आणि लोकांशी संवाद साधतात. आपल्या गावात असा मेळावा आयोजित करायचा असल्यास आमच्या कार्यकारिणीशी जरूर संपर्क साधा. पुढच्या एका वर्षात किमान दहा गावांमध्येतरी “उत्तररंग” संघटित स्वरूपात कार्यरत व्हावं असा आमचा मानस आहे. न्यु जर्सी मधला ‘क्लब 55’ आणि वॅाशिंग्टन डी. सी. मधली ‘अग्रणी संकल्पना’ हे अश्याच स्वरूपाचे प्रकल्प अत्यंत यशस्वीपणे कार्यरत आहेत हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

बरंय तर मंडळी, पुन्हा एकदा सर्वांना हॅपी न्यु इयर!!!!

धन्यवाद,

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)