Jan, 2016

MI मराठी - आपलं अधिवेशन

चित्रपटाने डेट्रॉइटच्या 700 प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. कट्यारचा हा भुंगा जगाच्या पाठीवरच्या सर्व मराठी प्रेक्षकांजवळ गुंजारव करून, त्यांना पुन्हापुन्हा ही कट्यार काळजात घुसवून घ्यायला भाग पाडत असताना डेट्रॉइट शहरदेखील त्याला अपवाद नव्हते. सचिन पिळगावकरांनी अक्षरश: जगलेली खान साहेबांची भूमिका, त्यांनी डोळ्यांतील भावांनी सादर केलेला अप्रतिम अभिनय, सुबोध भावेसारखा हुशार, गुणी अभिनेता आणि दिग्दर्शक, इतर कलाकारांची सुंदर साथ ह्या सगळ्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू असल्या, तरी प्रेक्षकांना मनोमन तृप्त करते ती सप्तसुरांची केलेली अखंड उधळण! 'संगीत' ही जर शंकराची पिंड मानली, तर शंकर महादेवन, राहूल देशपांडे, महेश काळे आणि इतर वादक-गायकांनी जीव लावून त्या पिंडेवर सुरांचा अक्षरश: अभिषेक केला आहे! चित्रपट सुरू असताना एक अशी वेळ येते, की आपण प्रेक्षक उत्सुक होऊन वाट बघू लागतो, की आता पुढचं गाणं कधी येतंय, पुढचा तराणा कधी ऐकायला मिळतोय, पुढची जुगलबंदी कधी पाहायला मिळतीय!

शास्त्रीय संगीत नवीन पिढीला फारसं रुचत नाही, हे खरं असूनही असं घडलं कसं! विशीतल्या तरुणापासून सत्तरीतल्या प्रौढापर्यंत प्रत्येकजण हा चित्रपट पुन्हा पुन्हा कसा काय पाहतोय! ह्याचं उत्तर आहे 'कट्यार काळजात घुसली'ने साधलेला सुवर्णमध्य! तासभर एकाच रागातला प्रवास जर केवळ जाणकाराच्या काळजाला भिडणारा असेल, तर सर्वसामान्यांच्या हृदयाला साद घालायला छोटी गाणी तयार झाली. तानपुरा, तबला आणि पेटीच्या बरोबरच इतर बरीच वाद्य वापरली गेली. समूहगायनाचा वापर केला गेला. शास्त्रोक्त गाण्यांना सुगम-संगीत केलं गेलं, आणि ह्यामुळेच ही जादू झाली. शास्त्रीय संगीताच्या जाणकारांना पंडित जितेंद्र अभिषेकींची 'लागी कलेजवाँ कटार'ची अद्भुतता जास्त भिडत असेल, पण ह्या गाण्यांचा रसास्वाद त्यांनाही आवडेल असा आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन सगळ्या प्रेक्षकांना आवडण्यासाठी आपण असाच सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न करूयात. तरुण वर्गाला अधिवेशन आवडण्यासाठी हनी सिंगची गाणी ठेवणे म्हणजे सुवर्णमध्य निश्चितच नव्हे! तर गाभ्याला धक्का न लावता, सगळ्यांना रुचेल अशा कलाकृती सादर करणे म्हणजे तो सुवर्णमध्य साधणं असेल. आणि हेच आपल्याला 'कट्यार काळजात घुसली' शिकवतो. तो साधणं सोपं नक्कीच नसलं, तरी हाच सुवर्णमध्य मोठ्या प्रेक्षकवर्गाला एकाच वेळी मंत्रमुग्ध करून कलाकृतीची कट्यार पुन्हा पुन्हा काळजात घुसवून घ्यायला भाग पाडतो हे नक्की!
प्रत्यक्ष पाहता सगळ्यांच्या हृदयाची तार झंकारू शकणारे कार्यक्रम तसे विरळच असतात. अशा वेळी असे कार्यक्रम आपण समांतर ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे, ज्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येकाला रुचेल असा एकतरी कार्यक्रम चालू असेल, आणि कुणालाच आवडीचे कार्यक्रम चुकल्यासारखे वाटणार नाही. ह्यात आपल्या कार्यक्रम समितीचा खरा कस लागेल.

'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटात एक गाणं आहे -
"मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका
संवेदना संवादे सहवेदना जपताना"

त्याच धर्तीवर आपण म्हणू,

"मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका

स्वर्णमध्य साधून, साद सर्वां घालताना.."

आपला प्रयत्न निरागस हो!

नूतन वर्षाच्या सगळ्यांना BMM 2017 कडून खूप खूप शुभेच्छा!

.- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)