Feb, 2016

MI मराठी - आपलं अधिवेशन

आणि लग्नाचं सभागृह ठरलं! एखाद्या कार्याची 'लगीनघाई' सुरू होण्यासाठी सर्वात आधी त्याचं स्थान ठरणं अत्यावश्यक असतं. लग्न कार्याचंच उदाहरण घ्या.

- आमंत्रण-पत्रिका छापायच्या असतील तर लग्नाच्या सभागृहाचा पत्ता हवा!

- जेवणासाठी केटरर ठरवायचा असेल तर त्यासाठीही सभागृह माहीत असणं आवश्यक!

- किती लोकांना बोलवायचं असा प्रश्न विचारल्यास, "अहो पण हॉल किती मोठा आहे?" हा प्रश्न साहजिकच येतो!

त्यामुळे सभागृह ठरलं, की कामांना एक वेगळीच गती येते. डेट्रॉइटच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या कामाच्या गाडीने आता तिसरा गियर टाकून वेग पकडला आहे!

तर सांगायची बातमी अशी, की 2017 च्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या होणाऱ्या अधिवेशनासाठी, भरपूर विचार विनिमय आणि आर्थिक वाटाघाटी करून अखेरीस आपण पुढच्या स्टेशन कोबो सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर तयार करण्यात आलेलं आहे.

एक आनंदाची गोष्ट म्हणजे कोबो सेंटर ही 200,000 चौरस फूट क्षेत्रफळाची भव्य जागा असल्यामुळे आपल्याला बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी मर्यादित प्रवेश ठेवायची आवश्यकता भासणार नाही. कितीही मराठी माणसं ह्या सोहळ्यासाठी आली, तरी त्यांचं स्वागत करायला डेट्रॉइट सज्ज असेल! ह्या जागेत शंभराहून जास्त खोल्या असून त्यांची क्षमता 25 पासून 10,000 पर्यंत आहे! त्यामुळे अधिवेशनाचे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ही जागा आपल्याला अगदीच अनुकूल आहे. जुलै 2015मधे तेलगू लोकांच्या अधिवेशनासाठी (TANA) ह्याच कोबो सेंटरमधे 12,000 लोकं जमली होती.

बृहन्महाराष्ट्र वृत्ताच्या पुढील काही अंकांतून कोबो सेंटर आणि डेट्रॉइट शहराबद्दल तुम्हांला अधिकाधिक माहिती आम्ही देतच राहू. तुम्ही स्वत:हून 'www.cobocenter.com' ह्या संकेतस्थळावरून जागेची सविस्तर माहिती करून घेऊ शकता.

सकल मराठीजनांची वारी, जमेल आता COBOच्या दारी!

[1] http://www.10best.com/awards/travel/best-american-riverfront/

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)