Mar, 2016

अध्यक्षीय

नमस्कार मंडळी,
नवीन वर्षाचे दोन महिने संपले. “ओल्ड मॅन विंटर” आता बहुदा थोडी विश्रांती घेईल आणि आपली जागा लवकरच वसंत ऋतूला देईल अशी आशा करूया. “यंदा फारच जास्त स्नो-फॉल झाला.” अशी तक्रार आलटून पालटून आपण सर्वजण करतो तरी “life goes on” ह्या न्यायाने पुन्हा नव्या उत्साहात आयुष्याला सामोरे जातो. मार्च महिन्यापासून विविध मंडळांमध्ये गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाचे वारे वाहू लागतात. बृहन्महाराष्ट्र (बृ. म.) मंडळातर्फे एप्रिल महिन्यापासून “गंधर्व” हा गाजलेला कार्यक्रम अनेक गावांमध्ये आयोजित केला जाणार आहे. आनंद भाटे, आदित्य ओक आणि प्रसाद पाध्ये हे गुणी कलावंत स्व. बालगंधर्वांची संगीत नाट्य-चित्र गाथा आपल्या समोर सादर करतील. कार्यक्रमाच्या काही तारखा अजून उपलब्ध आहेत. आपल्या गावात हा कार्यक्रम करण्यासाठी आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
जानेवारी महिन्यात उत्तररंग उपक्रमाविषयी केलेल्या आवाहनाला अनेक मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत सहा शहरांमधून आम्हाला प्रतिनिधी मिळाले आहेत. लवकरच त्या सर्वांशी एकत्रितपणे विचार विनिमय करून पुढच्या कार्यवाहीला सुरुवात होईल. आम्हाला अजून अनेक मंडळांकडून सहाय्याची अपेक्षा आहे. आपल्यापैकी अनेक लोकांनी आपापल्या मंडळाचे प्रतिनिधित्व पूर्वी केले आहे. आज जरी आपण मंडळाच्या कार्यकारिणीवर नसलात, तरी उत्तररंग सारख्या उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नक्कीच स्वागतार्ह आहे.
गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेला निधी-संकलनाचा उपक्रम अजून कार्यरत आहे. बे एरियातील “रंगमंच” ह्या संस्थेतर्फे सादर केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात मदतीचे आवाहन करण्याची अभिनव कल्पना संस्थेचे कार्यकर्ते माधव आणि स्मिता कऱ्हाडे ह्यांनी उत्स्फूर्तपणे मांडली आहे. अशा प्रकारच्या सहभागाने हे सेवाभावी कार्य असेच पुढे सुरू राहील अशी आशा आहे. “नाम” संस्थेला निधी स्वीकारण्याची मान्यता भारत सरकारकडून मिळण्यास अजून काही अवधी लागणार आहे, परंतु त्या संस्थेच्या विश्वस्तांशी मी सतत संपर्कात आहे. मान्यता प्राप्त होताच जमलेला सर्व निधी त्यांना देण्यात येईल हे नि:संशय!
बृ. म. मंडळाच्या मराठी शाळेच्या संयोजकांनी २०१६ची दिनदर्शिका नुकतीच प्रकाशित केली. चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रकलेने सजवलेली ही नितांतसुंदर दिनदर्शिका सर्व विद्यार्थ्यांना मंडळातर्फे देण्यात आली, आणि लवकरच ती बृ. म. मंडळाच्या मराठी शाळेच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.
मंडळाचे सर्व उपक्रम सुरळीतपणे कार्यरत ठेवण्यासाठी आमची कार्यकारिणी खूप मेहनत घेते आहे. २०१७च्या अधिवेशनाचे कार्य जोमाने पुढे जात आहे. त्याविषयी अधिक माहिती पुढच्या महिन्यात आपल्याला देईनच. मंडळाचे कार्य उदंड आहे, पण आपल्या समाजासाठी आपण अधिक काय करू शकतो ह्याचा विचार सतत आहेच. अगदी मिर्ज़ा ग़ालिब म्हणतात त्याप्रमाणे,
हज़ारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले |
- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)