Mar, 2016

MI मराठी - आपलं अधिवेशन
आपण सगळेच प्रवासी असतो. कुठेतरी आपला जन्म होऊन प्रवासाला सुरुवात होते आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपला हा प्रवास चालूच असतो. पु. ल. म्हणतात, "जीवनातले आपले अनुभवाचे संचित दुसऱ्यापुढे मांडावे, दुसऱ्याचे आपण पहावे, अशी जी आपली इच्छा असते त्यातच माणसाचे माणूसपण आहे." किती खरं आहे हे! समोरच्याचे अनुभव आपल्याला ऐकायला आवडतात, आपले समोरच्याला सांगायला आवडतात. ह्या गुजगोष्टींतूनच समोरच्याशी आपलं नकळत मैत्रीचं नातं जोडलं जात असतं. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०१७च्या अधिवेशन समितीने अशा प्रवाशांशी व्हिडीओ- द्वारे हितगुज करायचं ठरवलं आहे, की जे सध्या डेट्रॉइटमधे आहेत, पण कधी ना कधी महाराष्ट्राशी, आपल्या मराठी मातीशी त्यांचा संबंध आला आहे. 'MI प्रवासी' असं ह्या सदराचं नाव आहे. आपल्याच कानांवर क्षणभर आपला विश्वास न बसणं हा अनुभव तुम्हांला कधी आला आहे का? एक अमेरिकन माणूस, महाराष्ट्राच्या खेड्यात राहून आल्यावर कसं अस्सल मराठी बोलू शकतो, हे ऐकताच आपल्याला अगदी तसाच अनुभव येतो! डॉ. ली श्लेसिंगर (Dr. Lee Schlesinger- प्राध्यापक, आणि मानववंशशास्त्रज्ञ, सामाजिक-सांस्कृतिक विभाग, मिशिगन विद्यापीठ) यांना असलेली मराठी भाषेची गोडी, मराठी साहित्याचं ज्ञान बघून तुमच्या-आमच्यासारख्या मराठी माणसाला भरून नाही आलं तर नवलंच! खरंच, हा व्हिडीओ बघून ज्ञानेश्वरांनी ९०० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या 'मराठीचा वेलू गेला गगनावरी'चा प्रत्यय येतो. डॉ. श्लेसिंगर यांच्या 'MI प्रवासी' ह्या सदरातल्या दुसऱ्या व्हिडीओने फेसबुकवर एखादा व्हिडीओ 'viral' होतो म्हणजे नक्की कसा, ह्याचा नुकताच सुखद अनुभव दिला. आत्तापर्यंत हा व्हिडीओ १५०,००० वेळा बघितला गेला असून ४५०० हून अधिक लोकांनी तो ‘share’ केला आहे! बऱ्याच लोकांनी त्यांच्या भावना आमच्या पर्यंत पोहोचवल्या. काही लोकं डॉ. ली श्लेसिंगर यांना अधिवेशनात भेटायला उत्सुक आहेत. ह्या उदंड प्रतिसादातून मराठी माणसाचं त्याच्या भाषेवर आणि मराठी संस्कृतीवरच्या प्रेमाचं आपल्याला पुन्हा एकदा नव्याने दर्शन झालं! हा व्हिडीओ बघण्यासाठी संकेतस्थळ: https://www.youtube.com/watch?v=6fs1tRY9VOY किंवा, https://www.facebook.com/bmm2017/videos/1696728293937939/?pnref=story अशाच नवनवीन उपक्रमांमार्फत जनमानसात मराठीबद्दलचा अभिमान वृद्धिंगत करण्याचा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांना जुलै २०१७ मधे होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यासाठी एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असेल.

बृ. म. मंडळाच्या २०१७ मधे डेट्रॉइट येथे होणाऱ्या १८व्या अधिवेशनासाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

बोधवाक्य स्पर्धेचे विजेते बाल्टिमोर, मेरीलॅंड येथील श्री. गिरीश परब आहेत. अधिवेशनासाठी निवडलेलं, स्पर्धेत विजेतं बोधचिन्ह डेट्रॉइटच्या गतीबरोबरच उत्तुंगतेचा ध्यास व मराठी संस्कृतीविषयी आपला अभिमान दर्शवते. हे बोधचिन्ह तयार करून ट्रॉय, मिशिगन येथील सौ. गौरी अलाटे ह्या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत! ह्या दोन्ही स्पर्धकांना बक्षीस म्हणून अधिवेशनासाठी मोफत प्रवेशिका मिळणार आहे. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन! आणि आपल्या २०१७मधे होणाऱ्या अधिवेशनाला ‘नाव’ आणि ‘चेहेरा’ देण्यांस मदत केल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार!
पुन्हा भेटू, पुढच्या महिन्यात... मोटारींच्या नगरातून अधिवेशनाच्या तयारीची गरमा-गरम वार्ता घेऊन !
- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)