April 2016

अध्यक्षीय
नमस्कार मंडळी,

तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्रमासात श्री राम नवमी, हनुमान जयंती यासारखे अनेक उत्सव आणि शिवाय हळदीकुंकू- समारंभ आपण उत्साहाने साजरे करतो. मायदेशापासून आपण खूप दूर आलो असलो, तरी आपल्या परंपरेला आणि संस्कृतीला जपण्याचा आपला प्रांजळ प्रयत्न कायम आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.) कार्यातली अशीच एक परंपरा म्हणजे आपलं “बृहन्महाराष्ट्र वृत्त”! गेली ३६ वर्षे सातत्याने कार्यरत असलेला हा प्रकल्प उत्तर अमेरिकेतल्या सर्व मराठी बांधवांसाठी एक अभिमानास्पद उपक्रम आहे. मंडळाच्या संस्थापकांपैकी एक सौ. जयश्री हुपरीकर यांच्या हस्तलिखित वृत्तापासून आजपर्यंत, आणि गेली अनेक वर्षे सौ. विनता कुलकर्णी ह्यांच्या संपादनाने समृद्ध झालेलं मंडळाचं हे मासिक वार्तापत्र आहे. काही वर्षांपूर्वी बृ. म. मंडळाने बदलत्या काळाच्या गरजेनुसार वृत्ताची आवृत्ती ईमेलद्वारा पाठवावयास सुरवात केली. श्री. मोहन रानडे यांनी बृ. म. मंडळात १९९१-९३ काळात अध्यक्षपदावर कार्य करून त्यानंतर गेली कित्येक वर्षे ते बृ. म. मंडळ सदस्यांना आणि सर्व मंडळांच्या अध्यक्ष व प्रतिनिधींना बृ. वृत्त ईमेलद्वारा पोहोचविण्याचे काम करताहेत, हे विशेष कौतुकास्पद आहे. वृत्ताच्या आजवरच्या सर्व संपादकांचा आणि वृत्ताच्या आजीव सभासदांचाही मी शतश: आभारी आहे. विविध मंडळांच्या कार्यक्रमांच्या माहितीशिवाय इतर अनेक ललित साहित्याने नटलेले हे वृत्त आपल्या सर्वांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे, परंतु उत्तर अमेरिकेतल्या मराठी बांधवांपैकी फक्त सुमारे ५ टक्के लोकांपर्यंतच हे वृत्त पोहोचते, ही वस्तुस्थिती आहे. मराठी नववर्षाच्या शुभमुहुर्ताला मी सर्व मंडळांच्या अध्यक्षांना आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या स्थानिक प्रतिनिधींना आवाहन करतो, की आपल्या मंडळाच्या सर्व सभासदांपर्यंत हे वृत्त ईमेल-द्वारा पोहोचवण्यासाठी आपण सहकार्य करा! बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांची माहिती सर्वांना होणे आवश्यक आहे कारण त्यातूनच आपण एकमेकांशी जवळीक साधू शकतो. अधिवेशन हा जरी आपला प्रमुख उपक्रम मानला तरी बृ. म. मंडळ म्हणजे केवळ अधिवेशन नाही, ह्याची जाणीव सर्व मराठी लोकांना व्हायला हवी, कारण- 'मराठी तितुका मेळवावा' हे वरवर पाहता साधे वाटणारे परंतु अत्यंत दूरगामी विचाराचे असे मंडळाचे बोधवाक्य आहे.

उत्तर अमेरिकेत अनेक उत्तम कलाकार आहेत. नाट्य, संगीत, कथाकथन, नृत्य अशा विविध कलांमध्ये निपुण असलेल्या कलावंतांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाची अधिवेशनं गाजवली आहेत. त्या सर्वांना माझी विनंती आहे, की आमच्या कार्यकारिणीशी अवश्य संपर्क साधा. आम्ही आपल्या कार्यक्रमांची माहिती सर्व मंडळांना करून देऊ; ज्यायोगे अनेक गावांमध्ये ते सादर करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. २०१७ सालच्या अधिवेशनामध्येसुद्धा आपण सहभागी होऊ शकता.

एप्रिल महिन्यात अल्मेलो, नेदरलँड येथे संपन्न होणाऱ्या युरोपीय मराठी संमेलनासाठी मी आणि मंडळाच्या सचिव सौ. सोना भिडे सहकुटुंब जाणार आहोत. २०१७ सालच्या आपल्या अधिवेशनांचे निमंत्रण तिथल्या मराठी बांधवांना देण्यासाठी डेट्रॉइटचे श्री. नितीन अंतुरकरसुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर मंडळी, युरोपीय संमेलनाचा वृत्तांत पुढील अंकी!

धन्यवाद,

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)