April 2016

MI मराठी - आपलं अधिवेशन

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)

'व्यायसायिक देणगीदारांची काय गरज आहे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशानासाठी?', 'अधिवेशन म्हणजे काय, तर सांस्कृतिक मेळावा. कला, संस्कृती, भाषेचा सोहोळा. मराठी माणसांनी तीन दिवसांसाठी एकत्र यावे, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि रुचकर महाराष्ट्रीय भोजनाचा आस्वाद घ्यावा, आणि चवथ्या दिवशी परत जाऊन पुन्हा आपल्या कामाला लागावे. आपल्या अधिवेशनाचं स्वरूप एवढंच का असू नये?', 'त्यात पुन्हा ती $३०० ची प्रवेशिका! प्रत्येकाला परवडेलच असं नाही. मग एवढी फी का आकारावी?', 'व्यावसायिकीकरण न करता अधिवेशनाचं स्वरूप साधं, सोपं आणि नेमकं करता येईल का?' हे आणि यांसारखे बरेच प्रश्न तुमच्यासारखे आम्हांलाही पडले होते. पण म्हणतात ना, 'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'! जाऊदेत, मृत्यूविषयी कशाला बोला! आपण म्हणू 'पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही' अशीच काहीशी प्रचिती आपल्या ह्या अधिवेशनाची तयारी करताना आम्हांला आली!

गणित विषय शिकताना मला झोपच जास्त यायची! त्यामुळे फार खोलात हिशोब नको करायला. पण थोडक्यात सांगायचं झालं, तर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचं बजेट असतं $१.८ ते $२ मिलियन डॉलर्स. साधारण ३००० ते ३५०० माणसं अधिवेशनाला येतात. ३५०० माणसं पकडली आणि दर माणशी ३०० डॉलर्सची प्रवेशिका धरून जर हिशोब केला, तर होतात ३५०० x ३०० = $१.०५ मिलियन डॉलर्स. ह्याचा अर्थ बाकी, जवळपास निम्म्या बजेटचा खर्च आपले देणगीदार उचलत असतात! आता ह्या देणगीदारांमध्ये दोन प्रकार आहेत. वैयक्तिक देणगीदार (Individual donors) आणि व्यावसायिक देणगीदार (Corporate sponsors). व्यावसायिक देणगीदार हे प्रामुख्याने भारतातले असतात. त्यांनी देऊ केलेल्या देणगीच्या मोबदल्यात त्यांना एकाच वेळी ३०००-३५०० अनिवासित भारतीयांपुढे त्यांच्या उत्पादनाचे (product) विपणन (marketing) करता येते. हे देणगीदार बांधकामाचे व्यावसायिक, दागिन्यांचे व्यापारी किंवा विमान-सेवा पुरवणारे असतात. ‘एअर इंडिया’ सारखे देणगीदार भारतातून येणाऱ्या कलाकारांची विमानाची तिकिटे देऊ करतात. आपल्या अधिवेशनासाठी एक्सलन्स शेल्टर्सने (www.excellenceshelters.com) आपल्याला $१००,०००ची देणगी देऊन आपल्या निधी उभारणीचा श्रीगणेशा केला आहे. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!

वैयक्तिक देणगीदार म्हणजे तुमच्या आमच्यासारखे लोक, जे प्रवेशिकेच्या पलिकडे जाऊन एक, दोन, पाच, दहा हजार डॉलर्स किंवा त्याहून अधिक रकमेची देणगी देतात. ह्या देणगीमागे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशानांसाठी

हातभार लावण्याची भावना असते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शेकडो स्वयंसेवक कित्येक महिने झटत असतात. अशावेळी आपण आर्थिक स्वरुपाची काहीतरी मदत करावी, असं त्यांना वाटत असतं. त्याबद्दलच्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून आपण त्यांना कार्यक्रमांना बसण्यासाठी विशेष जागा (premium seating) देऊ करतो. आता प्रश्न उरतो, 'एवढा मोठा घाट का घालायचा?’ त्यामागचं कारण आहे, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनांचा वाढलेला आवाका (scale)! गंमत अशी की ३००० लोकांसाठी अधिवेशनाचे आयोजन करणं हे ५०० लोकांसाठी अधिवेशन आयोजित करण्याच्या सहापट अवघड नसतं, तर ते ६० पटीने अवघड असतं! प्रत्येक यजमान मंडळ अधिवेशनाचा खर्च कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतच असते, पण आज वस्तुस्थिती अशी आहे, की देणगीदारांशिवाय अधिवेशन करणं हे आता जवळपास अशक्यप्राय होऊन बसलं आहे.

मग अशावेळी आपण काय करावे? तर देणगीदार आपल्या अधिवेशनाला मोठा हातभार लावत असतात, ह्याची जाणीव ठेवावी. अधिवेशनाला व्यावसायिक देणगीदारांनी विकायला आणलेलं उत्पादन (product) विकत घ्यायला पाहिजे असं मुळीच नाही, पण त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात ठेवली, तर कधीतरी पुढे-मागे, आपण त्यांच्याकडून खरेदी करून परतफेड नक्कीच करू. आपण स्वत: वैयक्तिक देणगीदार होऊ शकलो तर सोन्याहून पिवळं! दर दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या या मेळाव्याचे महत्व मोठे आहे. २१व्या शतकात आपण सगळेच वैश्विक नागरिक (global citizen) झालो असलो, तरी ज्या मातीत खेळलो, वाढलो, जी भाषा बोलता बोलता लहानाचे मोठे झालो, त्या ओळखीचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. एका उत्सवाच्या रूपात होणाऱ्या या मेळाव्याच्या यशामागे अनंत हात कार्यरत असतात. वैयक्तिक देणगीदार होऊन ही अधिवेशनरूपी गणपतीची विशाल मूर्ती उचलण्यास अजून एका हाताचे बळ द्यावे, जमेल, तसा हातभार लावून ह्या कार्यास तुमचा आशीर्वाद दर्शवावा अशी, आम्ही तुम्हाला विनंती करतो. तो हात कदाचित बाकी लोकांसाठी अदृश्य असेल, पण त्याने त्यातले बळ आणि त्याने होणारी मदत तसूभरही कमी होणार नाही! अधिक माहितीसाठी आपल्या आगामी अधिवेशनाच्या संकेतस्थळाला भेट द्या - bmm2017.org.

चला तर मग, पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया, आपल्या अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन!