May 2016

MI मराठी - आपलं अधिवेशन

'मनोरंजनाचे कार्यक्रम' म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनातला सगळ्यात महत्वाचा घटक! नाटक, एकांकिका, सुगम, शास्त्रीय संगीत, गाण्याचे कार्यक्रम, नृत्य, मुलाखती, विविध स्पर्धा, भारतातून येणारे कार्यक्रम, अमेरिकतल्या कलाकारांचे कार्यक्रम, लहान मुलांसाठी, तरुणांसाठी कार्यक्रम, ओपनिंग सेरेमनी, क्लोसिंग सेरेमनी, प्राईम टाईम कार्यक्रम... तीन दिवसांची जत्राच जणू! ज्याला जे आवडतं ते मिळेल. जत्रेत जसं लहान मुलांसाठी लहान पाळणे, फुगे, बुड्ढी के बाल, मोठ्या मुलांसाठी मोठे पाळणे, जायंट व्हील, बंदुकीने फुगे फोडणे, बॉलने पेले पाडणे, बायकांसाठी बांगड्या, टिकल्या, कानातली, गळ्यातली, मोठ्यांसाठी चणे, फुटाणे, भेळ, मौत का कुआ, ज्योतिषी, खरेदी-विक्रीचा बाजार... अगदी प्रत्येकासाठी काहीतरी हमखास असतं, तसेच असतात हे मनोरंजनाचे कार्यक्रम! अधिवेशनात उत्साह आणि आनंद पेरायला कारणीभूत ठरणारे, अधिवेशनाला जत्रेचं अनोखं रूप प्राप्त करून देणारे!

जत्रेत जसा प्रत्येकाला त्याच्या पसंतीच्या गोष्टीत रस असतो, अगदी तसंच ह्या कार्यक्रमांचं असतं. कुणाला 'नटसम्राट' नाना पाटेकरला बोलवायचं असतं, तर कुणी 'कितीही खर्च झाला तरी सचिनला आणा राव' असा हट्ट धरून बसतं. कुणाला त्यांच्या तरुणपणीची 'दिल की धडकन' माधुरी दीक्षित, वर्षा उसगावकर किंवा आश्विनी भावे प्रमुख पाहुणी म्हणून हवी असते, कुणाला राहुल देशपांडे आणि महेश काळेला याची देही याची 'कानी' ऐकताना मंत्रमुग्ध व्हायचं असतं, तर कुणाचं असं मत असतं, की भारतातून येणाऱ्या कलाकारांवर भरमसाठ पैसा खर्च करण्यापेक्षा अमेरिकेतल्या कलाकारांच्या कलागुणांना जास्त प्रोत्साहन द्या. त्यांना जास्त संधी द्या. प्रत्येकाच्या अशा वेगळ्या आवडी-निवडीमुळे केवळ आम्ही, स्वयंसेवकांनी आमच्या आवडीचे कार्यक्रम ठरवून टाकले, तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून आपण अधिवेशनाला येणाऱ्या जास्तीत जास्त लोकांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. 'जत्रेत तुम्हांला काय हवं आहे?' हे जत्रेत येणाऱ्या लोकांना विचारणं जास्त महत्वाचं असतं, नाही का?

बऱ्याच लोकांनी अभिप्राय कळवला, की लहान आणि तरुण मुलं किंवा अमेरिकेतली दुसरी पिढी ही अधिवेशनाला यायला फारशी उत्सुक नसते. अधिवेशनातील पारंपरिक कार्यक्रमांमधे

त्यांना फारसा रस नसतो. त्यामुळे मराठी संस्कृतीपासून ते वंचितच राहतात. ह्यावर उपाय म्हणून त्यांना आवडतील असे कार्यक्रम ठेवण्यासाठी ह्या अधिवेशनात आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात कधीही न राहता, मराठी संस्कृती त्यांना आवडावी, तिचा त्यांनी आस्वाद घ्यावा हा आपला विचार कदाचित अट्टाहास ठरू शकेल. मराठी लोकसंगीत, नृत्य, अलंकारिक भाषेतली नाटकं त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. ह्याच्या विरुद्ध, त्यांना नक्की काय आवडेल, काय रुचेल, हे कदाचित आपल्याला सांगता येणार नाही! त्यामुळे ‘तरुण मुलांसाठी काय कार्यक्रम ठेवावेत?’ हे ठरायला जी समिती आपण स्थापन केली आहे, त्यात केवळ त्याच वयोगटातली मुलं आहेत! आपल्या मार्गदर्शनाखाली ते समवयस्क मुलांची मतं जाणून घेतील, आणि त्यांना अधिवेशनाला यावंसं वाटेल असे कार्यक्रम आयोजित करतील. मराठी मातीत येऊन एकदम पेरणी सुरू करण्यापेक्षा, 'तुम्ही या, तुमच्या आवडीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या आणि सोबत आपल्या मराठी मातीचा वास घ्या.' असा आपला अमेरिकेतल्या दुसऱ्या पिढीबाबत दृष्टिकोन असेल. दोन पिढीतलं अंतर कमी करण्याचा हा एक मार्ग असेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

कार्यक्रम फक्त मनोरंजनाचेच असावेत का? तर नाही. कार्यक्रम असे असावेत की जे आपल्या मनाला आनंद देतील, आपल्या विचारांना चालना देतील, माणसांना एकमेकांना जोडतील. व्यापार परिषदेला (बिझनेस कॉन्फरन्स) ह्या अधिवेशनात आपण विशेष स्थान देऊ करू. बिझनेस कॉन्फरन्स सगळ्यांसाठी करायचा आपण प्रयत्न करू. त्यासाठी 'skills building', 'networking opportunities', 'career guidance/opportunities', 'leadership coaching', अशा गोष्टींचा समवेश करून मराठी माणसांना एकमेकांशी जोडायचा आपला प्रयत्न असेल. 'एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाचे पाय खेचतो.' ही समजूत आपल्याला साफ पुसून टाकायची आहे! अधिवेशानाद्वारे अमेरिकेतल्या मराठी माणसांमध्ये आपल्याला आपुलकीची आणि बंधुत्वाची नाती निर्माण करायची आहेत.

ह्या अधिवेशनात आपल्या सगळ्यांच्या अभिप्रायानुसार कार्यक्रमांच्या स्वरुपात आपण काही बदल करू. प्रत्येक वयोगटातल्या लोकांना आवडतील असे कार्यक्रम असण्यासाठी आपली धडपड चालू आहे. जे जे नवीन आणि चांगलं आहे ते घेऊ, जे जुनं आणि निरुपयोगी आहे ते कातीप्रमाणे मागे सोडू. एका अधिवेशनात वेगळा रस्ता तयार होणार नाही, ह्याची आम्हाला जाणीव आहे, पण नवीन पायवाट तयार करायचा प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतो... आणि आपला हा प्रयत्न निरागस हो!

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)