June 2016

MI मराठी - आपलं अधिवेशन

कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे, की बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१७ मध्ये होणारे अधिवेशन ग्रॅंड रॅपिड्स, मिशिगन येथे ७, ८, ९ जुलै, या तारखांना करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ग्रॅंड रॅपिड्स हे ठिकाण डेट्रॉइट शहराच्या पश्चिमेला साधारण सव्वा दोन तासाच्या अंतरावर आहे, आणि शिकागोच्या पूर्वेला साधारण अडीच तासाच्या अंतरावर आहे.

'डेट्रॉइट शहरात अधिवेशन करणं योग्य होणार नाही' हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा आम्हालाही जरा आश्चर्य वाटलं. पण त्यामागची कारणेही योग्यच होती. डेट्रॉइटमधे ज्या जागेत आपण अधिवेशन करायचा विचार करत होतो, त्या जागेसाठी वाटाघाटी करताना लक्षात आलं, की करारात खूप अनिश्चितता निर्माण झाली आहे. जागेचं भाडं तर जास्त होतंच, जे प्रायोजकांकडून अधिक निधी उभा करण्याचे प्रयत्न करून आपण एकवेळ जमवूही शकलो असतो. पण करारातल्या अनिश्चिततेमुळे लोकांच्या उपस्थितीवर पैशाची गणिते अवलंबून होती. सेवा-शुल्क (service cost) प्रचंड वाढत होतं. मग आम्ही स्वत:ला एक साधा प्रश्न विचारला- "अधिवेशनाला येणाऱ्या माणसासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं?" - तर त्याला येणारा अनुभव! अधिकाधिक उत्तम मनोरंजनाच्या कार्यक्रमातून मिळणारा आनंद, रुचकर भोजनातून मिळणारा आनंद किंवा प्रेमळ वातावरण निर्मितीतून मिळणारा आनंद त्याचा हा 'अनुभव' तयार करत असतो. आणि तेच सगळ्यात महत्वाचं आहे, असं आम्हाला वाटतं. महागडी जागा घेऊन अधिवेशनात सहभागी होणाऱ्या लोकांच्या त्या 'अनुभवात' तडजोड करण्यापेक्षा ग्रॅंड रॅपिड्सला अधिवेशन केलं तर ते आपल्या सगळ्यांना मनापासून आवडेल असं अधिवेशन होऊ शकेल. डेट्रॉइटकरांचे आदरातिथ्य समस्त मराठी-जनांना दाखवायची हीच संधी आहे, असं आम्हाला वाटलं. आणि त्यामुळेच हा निर्णय स्वयंसेवकांच्या संपूर्ण फौजेने खुल्या दिलाने स्वीकारला.

कधी कधी 'जे होतं ते चांगल्यासाठीच होतं' असा आपल्याला प्रत्यय येतो. ग्रॅंड रॅपिड्सची आपल्या अधिवेशनाची जागा आम्ही जेव्हा बघायला गेलो, तेव्हा अक्षरश: थक्क व्हायला झालं. भरपूर मोठे हॉल्स, जागेला लागून असलेली तीन मोठी हॉटेल्स, निसर्गरम्य परिसर असं त्याचं रूप होतं. १०,००० लोकांना बसायला जागा असलेलं एरिना आणि २५०० लोकांसाठी असलेलं नाट्यगृह (पर्‌फॉर्मन्स थिएटर) बघून तर आम्ही चक्क तोंडात बोटं घातली!

कलाकारांना त्या व्यासपीठावर कार्यक्रम सादर करताना आणि प्रेक्षकांना ते पाहताना होणारा आनंद केवळ अविस्मरणीय असेल! ग्रॅंड रॅपिड्स ही एखाद्या हिल स्टेशनसारखी टुमदार जागा आहे. तिथे संध्याकाळी मित्र-मंडळींबरोबर नदीकिनारी निवांत गप्पा मारत, 'सरबताचे' घोट घेत फिरायची संधी असेल. शांत तरीही चैतन्यमय वातावरणात एकाद्या बाकावर बसून दोन मैत्रिणींना त्यांच्या शाळेच्या आठवणींना उजाळा देता येईल. समोर नदीचं वाहतं पाणी असेल आणि मनात- आठवणींचं! सुदैवाने डेट्रॉइटपेक्षा ही जागा खूपच सुरक्षित आहे. 'एक सुखद अनुभव देणारं अधिवेशन होऊ शकणारी जागा' अशी छबी ग्रॅंड रॅपिड्सने आमच्या मनात बनवली.

आम्ही जेव्हा ही बातमी आमच्या मित्रमंडळींना सांगितली, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता ग्रॅंड रॅपिड्सला एअर पोर्ट आहे का? आम्ही नक्की कुठे उतरायचं? ग्रॅंड रॅपिड्सला? डेट्रॉइटला? की शिकागोला? - तर ग्रॅंड रॅपिड्सला एअर पोर्ट आहे! त्याच बरोबर आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी डेट्रॉइट आणि शिकागोवरून बसेसची सोय करता येऊ शकेल का, ह्यावर आमचे प्रयत्न चालू आहेत. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘bmm2017.org’ या संकेतस्थळावर/वेबसाईटवर मिळतील. ही वेबसाईट आता एका नव्या रूपात आपल्यासमोर आली आहे!

आपले प्रश्न आपण ‘feedback@bmm2017.org’ या इ-पत्त्यावर आम्हांला पाठवा. आम्ही लवकरात लवकर उत्तरे देऊ. आपलं हे अधिवेशन अधिकाधिक चांगलं करण्याचे प्रयत्न आम्ही चालूच ठेवू, याचं तुम्हांला वचन देतो. तुमचा फक्त आशीर्वादाचा, शुभेच्छांचा हात पाठीवर असू द्या, बस्स!

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)