June 2016

अध्यक्षीय

नमस्कार मंडळी,

बृहन्महाराष्ट्र मंडळाने (बृ. म. मं.) आयोजित केलेला “गंधर्व” कार्यक्रमाचा यशस्वी दौरा नुकताच संपन्न झाला. सुमारे ५० दिवसांमध्ये ठिकठिकाणी २० मैफिली झाल्या. गावोगावच्या संयोजकांनी अतिशय उत्साहाने आणि परिश्रमाने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला रसिकांनीही भरघोस प्रतिसाद दिला. ह्या दौऱ्याचा एक विशेष म्हणजे अनेक लहान गावांमध्ये जिथे सामान्यत: भारतातले कार्यक्रम तुलनेने कमी होतात, तिथे हा कार्यक्रम सादर झाला (रिचमंड, मॅडिसन, लुईव्हिल, टँपा (दोन कार्यक्रम)), आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला. श्री. आनंद भाटे (गंधर्व) ह्यांचं शिकागोशी आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाशी एक खास नातं आहे. शिकागो येथे १९८४ साली भरलेल्या बृ. म. मंडळाच्या पहिल्या अधिवेशनात, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी, त्यांनी आपल्या गायनाने श्रोत्यांची मने जिंकली आणि आज ३२ वर्षांनंतरही आपल्या अलौकिक गायकीने ते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवताहेत. बालपणापासून बालगंधर्वांची पदे गाणारा आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशींच्या तालमीत तयार झालेला हा कलाकार म्हणजे संगीत सृष्टीतला एक चमत्कारच आहे. आदित्य ओक हा हार्मोनियम वादनाचा वारसा लाभलेला असाच एक कलावंत. “कट्यार काळजात घुसली” ह्या चित्रपटाचे संगीत संयोजन करून त्याने जगभर नाव कमावलं आहे. प्रसाद पाध्ये एक ताज्या दमाचा आणि तडफदार तबला वादक आहे. ह्या त्रयींचे अफाट कौशल्य प्रत्येक कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले. विशेष ऋणनिर्देश म्हणजे ह्या दौऱ्यासाठी पुण्यातल्या बेलवलकर हाऊसिंग ह्या नामवंत संस्थेने प्रायोजकत्व स्वीकारलं, आणि बहुमोल आर्थिक सहाय्य केलं त्याबद्दल श्री. अजित बेलवलकर आणि श्री. सुजीत मोडक ह्यांचे मन:पूर्वक आभार. हा दौरा यशस्वी होण्यासाठी बृ. म. मंडळाच्या कार्यकारिणीचे विलास सावरगांवकर आणि मेघा ओझरकर ह्यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. आमचे ट्रॅव्हल एजंट श्री अतुल परळकर ह्यांचीही खूप मदत झाली. ह्या दौऱ्याचा एकंदर अनुभव फारच सुखद होता. ह्याचं कारण- सर्व संयोजकांचे सहकार्य आणि विशेषत: कलाकारांचे सामंजस्य!

आता एका वेगळ्याच विषयाकडे वळतो. आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं अधिवेशन! महाराष्ट्र मंडळ डेट्रॉइटने अधिवेशनाचा विडा गेल्या वर्षी उचलला आणि अत्यंत उत्साहाने अनेक स्वयंसेवक कामाला लागले पण २०१३ साली आलेल्या बॉस्टन अधिवेशनाच्या अनुभवाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे लवकरच दिसू लागली. अधिवेशन ज्या कोबो सेंटरमधे करण्याचे योजले होते ते अनेक अपरिहार्य कारणांमुळे आणि मुख्यत्वे आर्थिक बाबींमुळे निव्वळ अशक्य भासू लागले. गेले चार महिने अधिवेशनाच्या प्रमुख संयोजिका अंजली अंतुरकर आणि त्यांचे प्रमुख सहकारी ह्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मेयरच्या कार्यालयापासून गव्हर्नरच्या कार्यालयापर्यंत दाद मागूनसुद्धा एकंदर खर्च आपल्या अंदाजपत्रकात बसणारा नाही, ह्याची खात्री झाल्याने शेवटी डेट्रॉइटपासून दोन तासांच्या अंतरावरच्या ग्रॅंड रॅपिड्स ह्या मिशिगन मधल्याच एका प्रमुख गावी आपलं २०१७ सालचं अधिवेशन संपन्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मी स्वत: ते कन्व्हेन्शन सेंटर पाहून आलो. माझ्याबरोबर तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्वयंसेवकांना ते पसंत पडले आहे. शिकागो अधिवेशनाच्या संयोजनाचा अनुभव जमेस धरून मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो, की ही वास्तू आपल्या २०१७च्या अधिवेशनाला सर्वार्थाने यथायोग्य आहे. भव्यता आणि उपयुक्तता ह्या दोन्ही बाबतीत ग्रॅंड रॅपिड्स कन्व्हेन्शन सेंटर कुठेही कमी पडणार नाही अशी माझी खात्री आहे. अधिवेशन संपन्न करायचं म्हणजे कोणत्या दिव्यातून जावं लागतं ते अधिवेशनात प्रत्यक्ष काम करणारे जाणतातच, पण सातासमुद्रापार येऊन ह्या भूमीवर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवणाऱ्या आपल्या मराठमोळ्या मनाला आणि मनगटाला काय अशक्य आहे? “हे अधिवेशन यशस्वी व्हावे ही सर्वांची इच्छा” असाच विचार डेट्रॉइटकर आज करताहेत. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला माझा सलाम! मंडळी आपण सर्वांनी हे अधिवेशन सुफळ संपूर्ण होण्यासाठी आपला सहभाग आणि सहकार्य द्यावं ही नम्र विनंती!

धन्यवाद,

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)