July, 2016

नमस्कार मंडळी,

जून महिना नुकताच सरला, शाळा, कॉलेजेसचं वर्ष संपलं. जून म्हणजे अनेक विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशनचा महिना! आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा पार करून नवी आव्हानं स्वीकारायला सिद्ध झालेली आपली तरुण पिढी ही वाटचाल यशस्वीपणे करते आहे. आपल्यापेक्षा आपली मुलं सर्वार्थाने जास्त समृद्ध होवोत ही सर्व पालकांची इच्छा असते. त्यासाठी आपण सगळेच प्रयत्नशील असतो. गेल्या अधिवेशनापासून श्री. सुनील सूर्यवंशी ह्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीने शालेय परीक्षेत लक्षणीय कामगिरी करून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. तो उपक्रम कार्यरत ठेवून त्यात भर घालण्याचा विद्यमान कार्यकारिणीचा मानस आहे. अर्थात ह्यासाठी एक वेगळा निधी जर आपण संकलित करू शकलो तर ह्या उपक्रमाला एक निरंतर आणि स्थायी स्वरूप आपण निश्चितच प्राप्त करून देऊ शकतो. आमची कार्यकारिणी ह्यावर विचार विनिमय करणारच आहे, परंतु ह्याबद्दल तुमच्या सूचना आणि सल्लादेखील मोलाचा आहे. मी सर्व स्थानिक मंडळांच्या अध्यक्षांना आणि व्यक्तिश: ज्यांना काही सुचवायचे असेल त्या सर्वांना आमच्याशी संपर्क साधण्याची विनंती करतो. ‘Matching Donation’ सारखा एखादा मार्ग ह्यासाठी निश्चितच फलदायी ठरेल, असं मला वाटतं.

२०१७च्या अधिवेशनात उत्तर अमेरिकेतल्या लेखकांसाठी पुस्तक-प्रकाशन, लेखक-मेळावा, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार, मराठी शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध गुणदर्शन, उत्तररंग परिषद ह्या सारखे कार्यक्रम तर आपण यशस्वी करूच, पण ह्याशिवाय आपल्याकडे जर काही नवीन उपक्रम असतील, तर आम्हाला अवश्य कळवा. अधिवेशनाची तयारी जोमाने सुरू आहे. उत्तर अमेरिकेतील कलावंतांना कार्यक्रम सादर करण्याविषयी आवाहन अधिवेशनाच्या संकेतस्थळावर करण्यात आले आहे. भारतातून मोजकेच पण खास कार्यक्रम आमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. अधिवेशनांमधे आजवर आलेल्या सर्व बऱ्यावाईट अनुभवांचा यथायोग्य विचार करून एक उत्कृष्ट अधिवेशन संपन्न करण्याचा आमचा संकल्प आहे. ह्यासाठी आपले सर्वांची साथ अमुल्य आहे.

‘कॅनडा डे’ आणि ‘यु. एस. इंडीपेंडंस डे’ साठी तुम्हा सर्वांना बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद,

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)